भजन स्पर्धेच्या पुरूष गटातून सावईवेरेचे लक्ष्मी मंडळ प्रथम

0
21

>> पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती स्पर्धेचा निकाल जाहीर; महिला गटात विद्यावर्धक मंडळाला पहिले बक्षीस; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण

साखळी येथील रवींद्र भवनात कला अकादमीतर्फे आयोजित पंडित मनोहरबुवा शिरगावकर स्मृती अखिल गोवा पातळीवरील भजन स्पर्धेचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाला. पुरुष गटात सावईवेरे-फोंडा येथील लक्ष्मी भजनी मंडळाने पहिले बक्षीस पटकावले. महिला गटात डिचोलीतील विद्यावर्धक मंडळाला पहिले बक्षीस, तर बाल कलाकार गटात बांदोडा-फोंडा येथील शांतादुर्गा बाल भजनी मंडळाला विजेतेपद प्राप्त झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विजेत्या पथकांना बक्षिसे वितरित करण्यात आली. यावेळी कला-संस्कृतीमंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे उपस्थित होते.

पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती राज्यस्तरीय भजन स्पर्धेच्या पुरुष कलाकार गटात 75 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक श्री लक्ष्मी भजनी मंडळाला (सावईवेरे-फोंडा) मिळाले. 50 हजारांचे द्वितीय पारितोषिक दाडेश्वर मुळवीर कला आणि सांस्कृतिक मंडळाला (अमईवाडा, विर्नोडा पेडणे) मिळाले, तर 40 हजारांचे तृतीय पारितोषिक श्री सातेरी केळबाय कला आणि सांस्कृतिक मंडळाला (लाडफे डिचोली) मिळाले. 30 हजारांचे चौथे पारितोषिक श्री आजोबा कल्चरल असोसिएशन (केरी-सत्तरी) पथकाला प्राप्त झाले. उत्तेजनार्थ पारितोषिके (20,000 रुपये) श्री भगवती चिंबलकरीण भजनी मंडळ (चिंबल-तिसवाडी) आणि स्वरब्रम्ह संगीत सांस्कृतिक संस्था (एलमोन्त-वास्को) या पथकांना मिळाली.

यावेळी वैयक्तिक पारितोषिके देखील जाहीर झाली. उत्कृष्ट गायक पहिला अभंग प्रथम पारितोषिक मनोज मुकुंद गावडे (दाडेश्वर मुळवीर कला आणि सांस्कृतिक मंडळ), उत्कृष्ट गायक पहिला अभंग व्दितीय पारितोषिक गौरांग भांडिये (श्री लक्ष्मी भजनी मंडळ), उत्कृष्ट गायक दुसरा अभंग प्रथम पारितोषिक पुंडलिक पालयेकर (श्री भगवती चिंबलकरीण भजनी मंडळ), उत्कृष्ट गायक दुसरा अभंग व्दितीय पारितोषिक आनंद सावळ देसाई (श्री महापुरुष संस्था, बांदोळवाडा-पेडणे), उत्कृष्ट गवळण प्रथम पारितोषिक नामदेव म्हार्दोळकर (श्री भगवती चिंबलकरीण भजनी मंडळ), उत्कृष्ट गवळण व्दितीय पारितोषिक मुकुंद गावडे (दाडेश्वर मुळवीर मंडळ), उत्कृष्ट पखवाजसाथी प्रथम पारितोषिक स्वरुपानंद गावस (श्री आजोबा कल्चरल असोसिएशन), उत्कृष्ट पखवाजसाथी व्दितीय पारितोषिक रजत तिरोडकर (स्वरब्रम्ह संगीत सांस्कृतिक संस्था), उत्कृष्ट संवादिनीसाथी प्रथम पारितोषिक दिपेश पेडणेकर (श्री महापुरुष संस्था), उत्कृष्ट संवादिनीसाथी व्दितीय पारितोषिक सतीश कोंडुसकर (शिवदामोदर भजनी मंडळ फातोर्डा-मडगाव) यांना वैयक्तिक बक्षिसे मिळाली.

अशी स्पर्धा महाराष्ट्रातही होत नाही : मुख्यमंत्री
संस्कारक्षम समाजाची निर्मिती होण्यासाठी व समाज मनावर सुसंस्कारित विचारांचे संस्कार होण्यासाठी भजन स्पर्धेसारख्या उपक्रमाचे आयोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्रात सुध्दा अशी भजन स्पर्धा होत नाही. महाराष्ट्रात संत झाले; मात्र भक्ती करणारे आणि संताचे अभंग गाणारे जास्त कलाकार गोव्यात आहेत. बालक व महिला गायनासोबत पखवाज व हार्मोनियम उत्कृष्टपणे वाजवत असून, हे गोव्याच्या भजन परंपरेचे संचित आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.