ब्रेट लीने उडवली होती रोहितची झोप

0
161

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली त्यावेळी ब्रेट ली याच्या गोलंदाजीचा सामना करायच्या कल्पनेनेच झोप उडायची अशी कबुली टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने काल रविवारी दिली.

सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड याला कसोटीत खेळणे अवघड जात असल्याचे हिटमॅनने मान्य केले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी होऊन भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे झाल्यास कसोटीच्या पूर्वी हेझलवूडचा सामना करण्यासाठी खूप मानसिक तयारी करावी लागणार असल्याचे रोहित म्हणाला. ब्रेट ली प्रमाणेच डेल स्टेनची गोलंदाजी खेळणे कठीण गेल्याचे रोहितने सांगितले.

२००७च्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावेळी ब्रेट ली समोर दिसत होता. ताशी १५० किमी वेगाने सातत्याने चेंडू टाकणार्‍या गोलंदाजाचा सामना करण्याची चिंता सतावत होती, असे रोहित म्हणाला. २००७ साली ब्रेट ली आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. भलेभले फलंदाज त्याच्यासमोर शरणागती पत्करत होता. त्यामुळे त्याची गोलंदाजी उरात धडकी भरवणारी होती, असे सांगत रोहितने ली याची प्रशंसा केली. दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन याच्या गोलंदाजीचेदेखील रोहितने कौतुक केले. गतीशी तडजोड न करता ताशी १४० पेक्षा जास्त वेगाने चेंडू इनस्विंग व आऊटस्विंग करण्यात स्टेनचा हात धरणारा पाहिला नसल्याचे रोहित म्हणाला.
रोहितने १४ वर्षांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत वनडेमध्ये २९, कसोटीत ६ व टी-ट्वेंटीमध्ये ४ शतके झळकावली आहेत. सध्याच्या खेळाडूंमध्ये रोहितला हेझलवूडबद्दल प्रचंड आदर आहे. एकच टप्पा राहून चेंडू आत-बाहेर करण्याची त्याची क्षमता रोहितला भावते.