ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

0
668

– सौ. संगीता वझे, बोरी – फोंडा
भारतभूमी ही संतांची भूमी आहे. प्रपंचाच्या मायेत गुंतून सुख-दुःखात अडकलेल्या मानवाला त्यांच्या अंतिम ध्येयाकडे नेण्यासाठी परमेश्‍वर वेगवेगळ्या संतांच्या रूपात पृथ्वीवर अवतरत असतो. संत हे केवळ मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचतात. अशाच एका महान विभूतीची ओळख आपण आज करून घेत आहोत, ते म्हणजे ‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’! सन १८४५ माघ शुद्ध द्वादशीला सातार्‍या जवळील गोंदवले या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव गणपती असे ठेवण्यात आले. प्रेमाने त्यांना ‘गणू’ या नावाने हाक मारीत.
गणूला लहानपणापासूनच भजन-कीर्तनाची भारी आवड. भजन गात त्यांचे ध्यान लागे. त्यांना सर्व कला अवगत होत्या, जसे पोहणे, पळणे, झाडावर चढणे, घोड्यावर बसणे हे सर्व ते अगदी सहज करीत. या खेरीज उत्तम चित्रेही ते काढीत. सूर्यनमस्कार, दंड यांसारख्या व्यायामाने शेवटपर्यंत त्यांची प्रकृती उत्तम होती. स्वच्छ आणि वळणदार अक्षराची त्यांना खूप आवड, तसेच त्यांचे स्वतःचे हस्ताक्षरही फार सुबक होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी सद्गुरू शोधार्थ घर सोडले. आई-वडिलांनी बरेच शोधल्यानंतर कोल्हापूरला ते सापडले. मुलाच्या डोक्यातील आध्यात्माचे वेड कमी व्हावे म्हणून घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. पण सद्गुरू भेटीची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणूनच विवाहानंतर घरच्यांची परवानगी घेऊन सद्गुरू प्राप्तीसाठी बाराव्या वर्षी ते घरातून निघाले. या त्यांच्या प्रवासात त्यांनी अनेक संतांच्या भेटी घेतल्या. यापैकीच काही म्हणजे स्वामी समर्थ, दत्तावतार श्री माणिक प्रभू, श्री तेलंग स्वामी, कलकत्त्याचे श्री रामकृष्ण परमहंस इत्यादी. संपूर्ण उत्तर भारत पालथा घातल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा दक्षिणेकडे वळविला. तेव्हा समर्थ संप्रदायातील एक सत्पुरुष श्री रामकृष्ण यांनी प्रगट होऊन ‘तुझे गुरु तुला परभणी जिल्ह्यातील नांदेड गावच्या जवळ येहलगाव, येथे भेटतील आणि त्यांचे नाव तुकाराम चैतन्य आहे’ असे सांगितले. खरोखरच येहलगावला गणपतीला तुकाराम चैतन्य म्हणजेच ‘तुकामाई’ यांची भेट घडली आणि त्यांचा शोध संपला. तुकामाईंना प्रथम दर्शनी पाहताच गणपतीला अतीव समाधान लाभले आणि हेच आपले गुरू असल्याची खूण पटली.
पूर्ण एक वर्ष सद्गुरूची सेवा केल्यानंतर तुकामाईंनी गणपतीवर अनुग्रह करून त्यांना आध्यात्माची दीक्षा दिली आणि गुरू-शिष्याचे नाते पूर्णत्वास गेले. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ या त्रयोदशाक्षरी मंत्राबरोबरच गणपतीला ‘ब्रह्मचैतन्य’ ही पदवी देऊन परमार्थातील सर्व अधिकार प्राप्त करून दिले.
आत्म-साक्षात्कार झाल्यानंतर गुरुआज्ञा म्हणून श्री महाराजांनी भारतभर भ्रमण करून नामाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. या त्यांच्या प्रवासात त्यांनी दीन-दुबळ्या गरीब लोकांना कधी प्रेमाने समजावून तर कधी चमत्कार करून त्यांची दुःखे दूर केली आणि प्रभू श्रीरामनामाचा सहज आणि सोपा भक्तिमार्ग दाखवला. त्यांनी केलेल्या चमत्कारांच्या अनेक कथा त्यांच्या चारित्रात आपल्याला वाचायला मिळतात. त्यावेळी श्री महाराजांकडे गावचे कुलकर्णीपद होते. त्या पदाचा वापर त्यांनी गोरगरीब आणि अडचणीत सापडलेल्या लोकांना सोडवण्यासाठी केला. कुठलीही समस्या असली तरी लोक त्यावेळी श्री महाराजांकडे धाव घेत. महाराजही अगदी आनंदाने त्यांच्या समस्या सोडवून त्यांना परमार्थाचे महत्त्व पटवून देत. समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते नेहमीच समानतेची वागणूक देत आणि कुठल्याही विषयाचे स्पष्टीकरण त्यांना समजेल, अशा उदाहरणांनी करीत. म्हणूनच ते सर्वांना आपलेसे वाटत. जगात घडणारी प्रत्येक गोष्ट प्रभू रामरायांच्या इच्छेनेच घडते. नुसता प्रपंच चांगला करणे हे मनुष्यजन्माचे ध्येय नाही. माणसांनी प्रपंच सांभाळत भगवंतांची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली तर प्रपंचातील कष्टांचे सार्थक होईल असे ते सांगतात. नामस्मरणाची गोडी त्यांनी सर्व जनमानसात पसरवली. ‘मुखी रामाचे नाम| बाह्य प्रपंचाचे काम| ऐसा राम जोडा मनी॥ ही त्यांची शिकवण आपले निरुपण ऐकून एक श्रोता जरी नाम घेण्यास प्रवृत्त झाल तरी माझ्या जन्माचे सार्थक होईल असे त्यांना वाटे. असे संपूर्ण जगाला प्रेम देणार्‍या या अवलियाला प्रापंचिक सूख मात्र कमीच लाभले. प्रथम पत्नी सौ. सरस्वती आणि पुत्र यांच्या मृत्यूनंतर त्यांनी केवळ आईच्या इच्छेखातर दुसरे लग्न केले. तेही एका अंध मुलीशी आणि तिचेही नाव सरस्वतीच ठेवले. घरी आल्यानंतर ‘तुझी ही सून तुझ्याकडे कधीच डोळे वर करून बघणार नाही असे ते आपल्या आईला म्हणाले. यावरून त्यांच्या स्वभावातील मिश्किलपणा लक्षात येतो. श्री महाराजांचा कर्मकांडांवर अजिबात विश्‍वास नव्हता. ते सांगत, सत्ययुगात-ध्यान, त्रेतायुगात-हवन आणि द्वापारयुगात-पूजा अर्चा केल्याने परमेश्‍वर प्राप्त झाला. पण या कलियुगात नुसते नाम घेतल्यानेच माणसाला भगवंताचे दर्शन होणार आहे, कारण भगवंताच्या नामात त्याचे स्मरण साठवलेले आहे. नामस्मरणाने मनुष्याचे शरीर व मन दोन्हीही निरोगी राहतात. प्रत्येक काम करताना उठता-बसता, येता-जाता प्रत्येक क्षणी नाम घ्यावे. मनापासून घेतलेले नाव संपूर्ण शरीरात पसरत जाते. यालाच ‘अजपाजप’ असे म्हणतात. श्री महाराजांचे शरीर नामस्मरणाने राममयच झाले होते. सोमवार २२ डिसेंबर १९१३ या दिवशी या महान संताने सिद्धासनात समाधी घेतली. नामाचे महत्त्व सांगण्यासाठीच त्यांनी जन्म घेतला होता. गोंदवले गावी श्रीमहाराजांचे समाधीस्थान आहे. आजही या ठिकाणी भक्तगण मिळून नामजप सप्ताह साजरे करतात. पुण्यतिथीउत्सव प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असतो. त्यांच्या अमृतवाणीतील काही कण आपल्यासमोर ठेवू इच्छितेः-
१) परमेश्‍वर सहजसाध्य आहे, सुलभ-साध्य नाही. कुठलीही फळाची आशा न करता कर्म करणे, आणि केलेल्या कर्माचा अहंकार नसेल त्यालाच भगवंत सहज प्राप्त होतो.
२) प्रत्येकाचे जीवन साखरेप्रमाणे गोड व्हावे म्हणजे रामनामाची मुंगी सहज तुम्हाला शोधत येईल.
३) रेल्वेतील प्रवासी, मग ते कुठल्याही डब्यातील असोत, ते शेवटच्या स्टेशनावर पोहोचणारच. तसेच आपल्या जीवनातील प्रवासात सत्संगानेच परमेश्‍वरप्राप्ती होऊ शकते.
४) ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे रामनामाने शरीरातील सर्व दोष आपोआपच दूर होतात.
५) दिवसातून एकदा तरी त्या प्रभूरामाला कळकळीने अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटेल.
६) चित्त एकाग्र होण्याकरता नाम आपल्या कानांनी ऐकावे म्हणजे एकाग्रता होण्यास मदत होईल. भगवंताच्या नामाला शरीराचे कसलेच बंधन नाही. ज्या बैठकीत आपल्याला सोयीस्कर वाटेल ती बैठक घेऊ अखंड नाम घ्यावे.
७) मनुष्याला वासनेनेच जन्म येतो, कर्माने नाही. म्हणूनच कर्म टाळायचे नसते. त्यामागची वासना टाळावी. राम कर्ता आहे ही भावना ठेवून नाम घेत रहावे म्हणजे वासनेची नांगी मोडलीच म्हणून समजा.
८) मनुष्य जीवन हे क्षणभंगुर आहे. त्या दक्षतेने प्रपंच करा, प्रयत्न सोडू नका. पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून आहे त्या परिस्थितीत समाधानात रहावे.
९) पैसा हा भगवंताची निष्ठा कमी करतो. पैसा आला की तळमळ, लोभ, असमाधान हेही येतेच. सुख, समाधान हे पैशावर अवलंबून नसते. म्हणूनच पैसा साठवावा पण, त्याचा आधार वाटू नये. तसेच अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये.
१०) जिथे नाम आहे तिथेच मी आहे.
प्रभू श्रीरामावर एवढे प्रेम करणारा श्री महाराजांप्रमाणे एखादाच या जगात असेल. आज प्रपंचाचा गाडा ओढताना एक क्षणसुद्धा माणसाजवळ नाही. त्यांच्यासाठी नामस्मरणाचा साधा आणि सोपा मार्ग श्रीमहाराजांनी सांगितलेला आहे. अशा या माझ्या सद्गुरूला माझे विनम्र अभिवादन! जयजय श्रीराम!