बोटमालक मंजुनाथ हरिकांत यांच्या हत्याप्रकरणाचा तपास आगशी पोलिसांनी यशस्वीरीत्या पूर्ण करताना दोन संशयित कामगारांना नागपूरमधून अटक करण्यात आली आहे. रोख रकमेच्या हव्यासापोटी हा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला
आहे.
मंजुनाथ हरिकांत हे काही दिवसांपूर्वी आपल्या मच्छीमारी बोटीवरून कामगारांसह मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. गेल्या रविवारी समुद्रात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने मच्छीमार क्षेत्रात खळबळ उडाली होती. प्राथमिक ओळख पटल्यानंतर हा मृतदेह मंजुनाथ हरिकांत यांचाच असल्याचे समोर आले. त्यानंतर आगशी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतानाच बोटीवरील कामगारांनी मंजुनाथ यांचा खून केला व मृतदेह समुद्रात फेकून देण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर संशयितांनी तीच बोट किनाऱ्यावर आणून उभी केली आणि तिथून पलायन केले.
तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर येथे हे दोन संशयित कामगार लपल्याची माहिती मिळवत तिथे छापा टाकला व त्या दोघांनाही ताब्यात घेतले.
मंजुनाथ हरीकांत यांच्याकडे मोठी रोख रक्कम होती, ती लुटण्याच्या उद्देशानेच हा खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांची सध्या आगशी पोलीस कसून चौकशी करत आहेत. यातून हत्येचे नेमके कारण आणि आणखी कोणी यात सामील आहे का, याचा लवकरच उलगडा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास आगशी पोलीस करत आहेत.

