समाजकल्याण खात्याच्या सामाजिक योजनांचा गैरफायदा घेतलेल्या 21 हजार बोगस लाभार्थ्यांकडून सुमारे 60 कोटी रुपये वसूल करण्यात यश आले आहे. राज्यात सध्या 1 लाख 52 हजार लाभार्थी आहेत. आणखी 18 हजार लाभार्थ्यांना योजनेत सामावून घेतले जाऊ शकते. खात्याने केलेल्या सर्वेक्षणामुळे महिन्याला सामाजिक योजनांचे सुमारे 4.3 कोटी रुपये वाचविण्यात यश प्राप्त झाले आहे, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेत समाजकल्याण खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल सांगितले. दरम्यान, राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या मानधनामध्ये वाढ करण्यावर विचार केला जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या चर्चेवेळी बोलताना काल दिली.

