बोगस मतदारांवरून भाजपची केवळ स्टंटबाजी : मनोज परब

0
4

भाजप परप्रांतीय मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बिहार, राजस्थान, ओरिसा असे दिवस साजरे करीत आहे, तर दुसऱ्या बाजूने परप्रांतीयांची नावे वगळण्याची मागणी करीत आहे. भाजपची परप्रांतीय मतदारांची नावे वगळण्याची मागणी केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. भाजपने परप्रांतीय मतदारांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून त्यांची नावे मतदार यादीतून वगळून दाखवावी, असे आव्हान रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे (आरजीपी) प्रमुख मनोज परब यांनी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिले.
आरजीपीने सुमारे 1 लाख बनावट तथा स्थलांतरित मतदारांची यादी राज्यभरातील मामलेदार कार्यालयांना सादर केली आहे. त्यामुळ ती नावे भाजपने वगळून दाखवावीत, असे मनोज परब यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजस्थान दिवस कार्यक्रमात बोलताना मारवाड्यांना गोमंतकीयांना नोकऱ्या द्याव्यात, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्याच्या त्या वक्तव्याला नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे लक्ष वळवण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून परप्रांतीय मतदारांची नावे वगळण्याची मागणी केली आहे, असा दावा मनोज परब यांनी केला.
बोगस मतदारांच्या विषयावरून भाजप दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपने मतदारयादीबाबत स्टंटबाजी थांबवावी. थिवी मतदारसंघातील गोठणीचा व्हाळ, मुशीर, सांताक्रूझ मतदारसंघातील चिंबल व अन्य अनेक ठिकाणी मतदारयादीत स्थलांतरित मतदारांचा भरणा आहे. थिवीतील एका प्रभागात 1051 मतदारांपैकी 950 पेक्षा अधिक परप्रांतीय मतदार आहेत. ‘लाला की बस्ती’ येथे एकाच घर क्रमांकावर 160 मतदारांची नोंद आहे. काही ठिकाणी 160 पेक्षा अधिक मतदारांचा घरक्रमांक नोंद नाही. परप्रांतीय मतदार ही काही राजकारण्यांची व्होट बँक आहे, असा आरोपही मनोज परब यांनी केला.