25 C
Panjim
Saturday, October 24, 2020

बॉलिवूडला ड्रग्सचे ग्रहण

  • बबन विनायक भगत

एखाद्या मोठ्या अजगराने एखाद्या हरणाला विळखा घालावा तसा अमली पदार्थांचा विळखा बॉलिवूडला पडला असून, या विळख्यामुळे बॉलिवूडमधील किती कलाकारांचे प्राण जातील ते या घडीला सांगणे कठीण आहे. तसेच हा विळखा कोण सोडवेल हाही लाख मोलाचा प्रश्‍न आहे.

बॉलिवूडमधील एक लोकप्रिय व यशस्वी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा १४ जून २०२० रोजी संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये जी वावटळ उठली ती बसण्याचं अजून नाव घेत नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली की त्याची कुणीतरी हत्या केली या चर्चेला ऊत आला. सुशांतच्या वडिलांनी सुशांतने आत्महत्या केली नसून, त्याची कुणीतरी हत्या केल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनीही हे प्रकरण लावून धरले. त्यामुळे मुंबई पोलीस व बिहार पोलिसांनंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे काम सीबीआयकडे सोपवण्यात आले असले तरी गेल्या साडेतीन महिन्यांत सीबीआयही ही आत्महत्या की हत्या हे अजून सांगू शकलेली नाही.

मात्र या मृत्युप्रकरणाच्या चौकशीदरम्यान बॉलिवूडमधील बर्‍याच भानगडी चव्हाट्यावर आल्या. बॉलिवूडमधील गटबाजी व घराणेशाही, तेथील जीवघेणी स्पर्धा व त्यातून कलाकारांना येणारं नैराश्य, तेथील पार्ट्या, नशापान, अमली पदार्थांचे सेवन व स्वैराचार अशा सगळ्या भयानक गोष्टी प्रकाशात आल्या. यातील सगळ्याच गोष्टी या सामान्य लोकांसाठी नव्या होत्या असं नव्हे; मात्र बॉलिवूडला अमलीपदार्थांचा पडलेला विळखा ही सगळ्यांना धक्का देणारी अशी बाब होती.
सुशांतसिंह हा मानसिक रुग्ण होता, तो अमली पदार्थांचे सेवन करीत होता व त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही त्याला अमली पदार्थ आणून देत असे, अशी माहिती सुशांतसिंह याच्या मृत्यूच्या चौकशीदरम्यान उघड झाल्यानंतर या तपासाला आणखी एक फाटा फुटला. हा फाटा होता बॉलिवूडच्या ड्रग्स कनेक्शनचा. आता या ड्रग कनेक्शनची चौकशी ‘नार्कोटिक्स इंटेलिजन्स ब्युरो’ करीत असून बॉलिवूडमधील मोठी कलाकार मंडळी त्यांच्या रडारवर आहे.

दीपिका, सारा, श्रद्धा व रुकुल
या अमली पदार्थ चौकशीप्रकरणी सध्या सर्वात जास्त चर्चेत आहेत त्या बॉलिवूडमधील तारका म्हणजे दीपिका, सारा, श्रद्धा व रुकुल प्रित सिंग. एनआयबी सध्या या तारकांची ड्रग्सप्रकरणी चौकशी करीत आहे. २७ सप्टेंबर रोजी एनआयबीने दीपिका पडुकोण हिची तब्बल सहा तास चौकशी केली. यावेळी तिच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करण्यात आली. तिच्यासोबत श्रद्धा कपूर व सारा अली खान यांनाही समन्स पाठवण्यात आले होते. चौकशीसाठी त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय एनआयबीने जया, साहा व फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांचेही मोबाईल जप्त केले आहेत. दीपिकासह या सर्वांचे मोबाईल फॉरेंसिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. या तारकांनी आपल्या मोबाईलवरील डिलिट केलेल्या चॅट मॅसेजिस चौकशीसाठी मिळवल्या जाणार आहेत.

रिया चक्रवती
एनआयबीने सर्वांत प्रथम ड्रग्स कनेक्शनप्रकरणी चौकशी केली ती सुशांतसिंहची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची. रियावर ड्रग्स तयार करणे, बाळगणे, खरेदी करणे, विक्री करणे, त्यांची वाहतूक करणे, वापर करणे, सेवन करणे, निर्यात करणे आदी आरोपांसह कित्येक आरोप ठेवण्यात आले असून हे आरोप सिद्ध झाल्यास तिला कमीत कमी १० वर्षांची व जास्तीत जास्त २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तिच्याकडून एनआयबीने गांजाही जप्त केला होता. मात्र, तो केवळ ५९ ग्राम एवढा कमी असताना एनआयबीने तिच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ ए खाली गंभीर स्वरूपाचे जे आरोप ठेवले आहेत, ती एनआयबीची चूक असल्याचा आरोप तिचे वकील ऍड्. सतीश मानशिंदे यांनी केला आहे. या गंभीर आरोपांमुळे रियाला जामीन मिळू शकलेला नसल्याने तिच्यावर कोठडीत राहण्याची पाळी आली आहे.

रियाने ड्रग्सप्रकरणी सारा अली खान व रुकुलप्रित सिंग यांची नावे घेतली होती. साराने सुशांतसिंहबरोबर ‘केदारनाथ’ या चित्रपटात काम केले होते. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी तो ड्रग्सचे सेवन करीत असे, असे साराने आपल्याला सांगितले होते अशी माहिती रियाने एनआयबीला दिली होती. तर दीपिका व श्रद्धा कपूर यांची नावे सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा यांच्या वॉट्‌सऍप चॅटमध्ये सापडली होती. याप्रकरणी जया साहा यांचीही चौकशी केली जात आहे.
रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक याचीही एनआयबीने ड्रग्सप्रकरणी चौकशी केली आहे. रियाने आपण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची माहिती दिली आहे अशी माहिती उघड झालेली असली तरी ती कितपत खरी आहे याविषयी प्रश्‍नचिन्हच आहे. तर दीपिका, सारा, श्रद्धा या त्रिकुटाने आपण ड्रग्सचे सेवन करीत नसल्याचेच चौकशीत सांगितले आहे, अशी माहिती उघड झालेली आहे.

‘धर्मा प्रॉडक्शन्स’ही वादात
करण जोहर यांची ‘धर्मा प्रॉडक्शन्स ही कंपनीही ड्रग्स कनेक्शन्सप्रकरणी वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. धर्मा प्रोडक्शन्स कंपनीचे एक माजी कर्मचारी क्षितिज रवी प्रसाद याला २५ सप्टेंबर रोजी एनआयबीने अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करीप्रकरणी अटक केली. मात्र धर्मा प्रॉडक्शनचे प्रमुख व नामवंत चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांनी ‘मी नाही त्यातला’ अशी भूमिका घेत मी कधीही अमली पदार्थांचे सेवन केलेले नाही, असे स्पष्ट केले आहे.
दीपिकाने आपण ड्रग्ससंबंधी मोबाईलवरून चॅट केले असल्याचे मान्य केले; मात्र आपण सेवन कधीही केलेले नाही अशी भूमिका घेतली आहे.

सुशांतसिंहच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीपेक्षा आता जास्त चर्चा आहे ती बॉलिवूडच्या ड्रग्स कनेक्शन्सच्या चौकशीविषयी. त्यामुळे वृत्तवाहिन्यांनीही आता आपले कॅमेरे त्या चौकशीकडे वळवले आहेत. बॉलिवूडचे कोणते कोणते मोठे मासे ड्रग्सचे सेवन करीत आहेत अथवा करीत असावेत, याविषयीची रसभरीत चर्चा सध्या सगळीकडेच ऐकू येऊ लागली आहे. दीपिका, सारा, श्रद्धा, रुकुल प्रित सिंह, करण जोहर आदी मंडळी ही सध्या चर्चेत आहेत ती त्यामुळेच.

बॉलिवूडमधील एकूण चर्चा व एनआयबीकडून सध्या अमली पदार्थप्रकरणी चालू असलेली चौकशी व तपास पाहिल्यास या मायानगरीत ड्रग्सची पाळेमुळे अगदी खोलपर्यंत रुजली असावीत असे प्रथमदर्शनी कुणालाही वाटावे अशीच स्थिती आहे. ड्रग्सप्रकरणी सध्या या तारकांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जाऊ लागली आहे. मी बरा, मी प्रामाणिक, मी चारित्र्यवान- दुसरे वाईट! त्यांच्यामुळे मी त्रासात पडलो अशी सारवासारव करण्याचा हा प्रकार आहे हे कुणीही सांगू शकेल. रिया चक्रवर्ती हिच्यावर अमली पदार्थप्रकरणी गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवलेली एनआयबी आता बॉलिवूडमधील बड्या धेंडांविरुद्ध कोणती भूमिका घेते हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.
करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शन्स कंपनीचे एक कार्यकारी निर्माते क्षितिज प्रसाद यांचे ड्रग्स माफियांशी संबंध असल्याचे एनआयबीने म्हटले आहे. त्याला गेल्या शनिवारी आयएनबीने अटक केली असून यासंबंधी अटक करण्यात आलेले ते विसावे आरोपी होते. बॉलिवूडमधील कलाकारांना ड्रग्सचा पुरवठा करणार्‍या काही ड्रग पॅडलर्सना यापूर्वीच एनआयबीने अटक केली असून, अजून काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे.

करण जोहरची अद्याप चौकशी नाही
करण जोहर यांचे बॉलिवूडमधील ड्रग्सप्रकरणी नाव घेतले जात असले तरी हा लेख लिहून पूर्ण होईपर्यंत तरी त्यांची याप्रकरणी चौकशी करण्यात आली नव्हती. करण जोहर यांनी २०१९ रोजी आयोजित केलेल्या एका पार्टीचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर वायरल होऊ लागला असून या पार्टीला हजेरी लावलेल्या कलाकारांनी पार्टीत ड्रग्सचे सेवन केले होते अशी चर्चा आहे. या व्हिडिओचा फॉरेन्सिक अहवाल एनसीबीच्या हाती आला आहे.
आपल्या घरी गेल्या वर्षी झालेल्या या पार्टीसंबंधी आपण गेल्या वर्षीच खुलासा केला आहे. माझ्यावर झालेले आरोप खोटे असून आपणाला बदनाम करण्यासाठी सदर पार्टीत ड्रग्सचा वापर व सेवन झाल्याचे आरोप आपणावर करण्यात आल्याचे आपण स्पष्ट केले असल्याचे जोहर यांनी म्हटले आहे.

मात्र, करण जोहरच्या पार्टीचा सदर व्हिडिओ हा खूप काही सांगून जाणारा असून या पार्टीत सहभागी झालेल्या एका-एका कलाकाराच्या लिला पाहिल्यास त्या पार्टीत या कलाकार मंडळीने नेमके काय सेवन केले असेल याचा अंदाज बांधता येतो. या पार्टीत दीपिका, रणबीर कपूर, विकी कौशल, शाहीद कपूर, मलायका अरोरा खान, अर्जुन कपूर, वरुण धवन, आयन मुखर्जी असे कित्येक बडे कलाकार सहभागी झाले होते. ते सगळे या व्हिडिओतून दिसत असून व्हिडिओतील त्यांची देहबोली खूपच वेगळी व बघण्यासारखी आहे. याशिवाय दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत हाही आपल्या फार्म हाऊसवर पार्ट्यांचे आयोजन करीत होता व त्या पार्ट्यांमध्येही अमली पदार्थांचे सेवन केले जात असे अशी माहिती उघड झाली आहे. या पार्ट्यांना सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्यासह काही अभिनेत्री हजेरी लावायच्या अशी माहिती उघड झालेली आहे. बॉलिवूडमध्ये आता आयोजित केल्या जाणार्‍या ड्रग्स पार्ट्यांची ही काही उदाहरणे आहेत. गर्भश्रीमंत व वजनदार लोकांमध्ये आता अशा ड्रग्स पार्ट्यांचे नवे फॅड निर्माण झाले असून ज्या फिल्म इंडस्ट्रीत आता पैशांचा धो-धो पाऊस पडत असतो त्या इंडस्ट्रीतील लोक आता ड्रग्स पार्ट्यांकडे एक स्टेट्‌स सिम्बॉल म्हणून पाहत असल्याचीही चर्चा आहे.

‘हरे रामा हरे कृष्णा’
१९७२ साली देव आनंद यांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं- ‘हरे रामा हरे कृष्णा.’ देव आनंदच्या अत्यंत हिट व गाजलेल्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना होते. अमली पदार्थ हा या चित्रपटाच्या कथेचा विषय होता. ‘दम मारो दर, मीट जाए गम’ हे या चित्रपटातलं गाणं संगीत शौकीन अजूनही आवडीने ऐकत असतात. त्या काळातील ‘हरे कृष्णा’ या आंतरराष्ट्रीय चळवळीची पार्श्‍वभूमी या चित्रपटाला असून किनारपट्‌ट्यांवर अमली पदार्थांचे सेवन करीत नशेत जगणार्‍या हिप्प्यांचे विश्‍व या चित्रपटातून रंगवण्यात आले आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेली बहीण व तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी धडपडणारा भाऊ अशी कथा या हिप्पी संस्कृतीच्या पार्श्‍वभूमीवर गुंफण्यात आलेली आहे. आजच्या घडीला बॉलिवूडमधील तरुण कलाकार मंडळी ‘दम मारो दम’ करायला लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर या सुंदर अशा चित्रपटाची आठवण झाली म्हणून हा उल्लेख.

दोन-चार वर्षांपूर्वी आलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून पंजाब राज्याला अमली पदार्थांचा कसा विळखा पडलेला आहे याचं सुंदर चित्रण करण्यात आलेलं आहे.
बॉलिवूडमध्ये दरवर्षी ७०० ते ८०० चित्रपटांची निर्मिती होत असते. त्यात प्रेमपटांबरोबरच वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरील चित्रपटांचाही समावेश असतो. तर अशा सुंदर सुंदर कथा घेऊन लोकांचे मनोरंजन करणार्‍या बॉलिवूडला अमली पदार्थांचा विळखा पडावा ही अत्यंत दुर्दैवी अशीच बाब म्हणावी लागेल.

आपली ओळख न दाखवता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडशी संबंधित एका अज्ञात महिलेने जी माहिती दिली ती अंगावर काटा उभा करणारी आहे. ती जर खरी असेल तर बॉलिवूडला अमली पदार्थांचा घट्ट विळखा पडलेला असून तो आता सुटणे कठीण आहे असेच म्हणावे लागेल. सदर महिलेच्या म्हणण्यानुसार बॉलिवूडमधील काही आघाडीची कलाकार मंडळी ही अमली पदार्थ व्यवहारात गुंतलेली आहे. हे कलाकार अधूनमधून ड्रग्स पार्ट्यांचे आयोजन करीत असतात. त्यांच्या घरीही अमली पदार्थांचा मोठा साठा असतो. आणि अन्य कलाकार मित्रांनाही ड्रग्स पार्ट्यांचे आयोजन करण्यासाठी ते ड्रग्स पुरवीत असतात. हे कलाकार लोक आपल्या अत्यंत जवळच्या व मर्जीतील कलाकार मित्रांनाच या पार्ट्यांना बोलावत असतात. त्यासाठी आलिशान बंगले भाडेपट्टीवर घेतले जातात. विकएण्डला दिवस-दिवसभर अशा पार्ट्या होत असतात. बॉलिवूडमधील आघाडीच्या ललनांचाही (अभिनेत्रींचा) या पार्ट्यांत सहभाग असतो. ही कलाकार मंडळी या पार्ट्यांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन करते, अशी बरीच माहिती सदर महिलेने दिलेली आहे. बॉलिवूडमधील अमली पदार्थांसंबंधीचे जे एक-एक किस्से व घटना आता उघड होऊ लागल्या आहेत त्या पाहिल्यास सदर महिलेने दिलेल्या माहितीत बरेच तथ्य असावे असे दिसत आहे.

संजय दत्त व अमली पदार्थ
८० च्या दशकात बॉलिवूडमधील केवळ एकच अभिनेता अमली पदार्थांच्या बाबतीत चर्चेत होता. त्या अभिनेत्याचे नाव होते संजय दत्त. सुनिल दत्त व नर्गिस या बॉलिवूडमधील नामवंत व आदरणीय अशा दाम्पत्याचा हा पुत्र अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे उघड झाल्यानंतर ८० च्या दशकात तो भारतभरात चर्चेचा विषय ठरला होता. १९८१ साली संजय दत्त याचा ‘रॉकी’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन सुपरहिट ठरला होता. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सुनिल दत्तची पहिली पत्नी व संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांचे कर्करोगाने निधन झाले होते. त्यामुळे संजय दत्त प्रचंड तणावाखाली होता. अशातच रॉकी चित्रपटात नायिकेची भूमिका केलेल्या टिना मुनीम हिच्याबरोबरचे त्याचे संबंध बिघडून त्याचा प्रेमभंगही झाला होता. त्यामुळे संजय दत्त अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. संजयला अमली पदार्थांंच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी सुनिल दत्तला त्यावेळी अथक कष्ट घ्यावे लागले होते.

ममता कुलकर्णी आणि दाऊद कनेक्शन
९०च्या दशकातील प्रसिद्ध मॉडेल व बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी ही अमली पदार्थप्रकरणी वादग्रस्त ठरलेली आणखी एक बॉलिवूड तारका. विकी गोस्वामी याच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर ती अमली पदार्थ व्यवहारात ओढली गेली. अमली पदार्थांचा व्यवहार करीत असल्याच्या आरोपांखाली ती पोलिसांना हवी असली तरी गेल्या कित्येक वर्षांपासून ती आपला पती विकी गोस्वामी याच्यासह फरार असून पोलिसांना सापडू शकलेली नाही. पूर्वी ती दोघं दुबईला राहत असत व तेथून अमली पदार्थांचा व्यवहार सांभाळत असत. तर आता ती दोघं केनियाला राहत असल्याचं वृत्त आहे. ४८ वर्षीय ममता कुलकर्णीने करण अर्जुन, आशिक आवारा, बाजी, चायना गेट, सबसे बडा खिलाडी, छुपा रुस्तम, नसीब अशा कित्येक गाजलेल्या चित्रपटांतून अभिनय केला आहे. मात्र, अभिनयापेक्षा अंगप्रदर्शनामुळेच ती जास्त चर्चेत होती.
२०१६ साली तिचे पती विकी गोस्वामी यांच्यावर पोलिसांनी २ हजार कोटी रु.च्या ड्रग्स रॅकेटप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणी ममता कुलकर्णी ही एक प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणी ममता कुलकर्णी न्यायालयात हजर राहिली नसल्याने न्यायालयाने तिला फरार घोषित करीत मुंबईतील तिच्या तीन आलिशान सदनिका (सुमारे २० कोटी रु.च्या) जप्त करण्याचा आदेश दिला होता.

विकी गोस्वामी व ममता कुलकर्णी ही दोघंही विदेशात असल्याने अद्याप त्यांना अटक करणे पोलिसांना शक्य झालेलं नाही. विकी गोस्वामी हा मूळ अहमदाबाद येथील रहिवाशी असून तेथे असताना तो वेगवेगळ्या वस्तूंचा बेकायदेशीररीत्या व्यापार करीत असे. नंतर दाऊद इब्राहिमच्या ‘डी’ कंपनीशी हातमिळवणी करून तो त्याच्यासाठी अमली पदार्थांचा व्यवहार करू लागला. आणखी एक भूतपूर्व बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिचा पती अली पुनजानी हाही दाऊदसाठी काम करीत असून विकी गोस्वामी व तो हे दोघेही दाऊदचे अमली पदार्थ बॉलिवूडला पुरवीत असल्याचे मुंबईतील अमली पदार्थ विरोधी विभाग पोलिसांचे म्हणणे आहे. गोस्वामी व पुनजानी हे दोघेही विदेशात राहत असून केनियामध्ये राहत असलेल्या अली पुनजानी याचे तेथील राजकीय नेत्यांशी अत्यंत जवळचे संबंध असल्याने अमली पदार्थ व्यवहारात तो गुंतलेला असल्याचे पुरावे असतानाही केनियामध्ये त्याला शिक्षा होऊ शकली नाही. तेथे त्याच्यावर ड्रग्सप्रकरणी खटलाही चालू होता. पुनजानी याचा केनियातील मोसांबा या शहरात प्रचंड मोठा बंगला असून त्यावर छापा टाकला असता अमली पदार्थांचा मोठा साठा सापडला होता. मात्र असे असतानाही तेथील राजकीय नेत्यांनी त्याला अटक केली जाऊ नये यासाठी वजन वापरले. केनियामध्ये ‘फंड रेझिंग’साठी पुनजानी यांनी करोडो रुपये दिले होते, त्यामुळे तो राजकीय नेत्यांचा लाडका बनल्याचे तेथील मीडियाचे म्हणणे आहे.

विकी गोस्वामी हाही सध्या केनियामध्येच असून दाऊदचे हेच साथीदार बॉलिवूडला अमली पदार्थांचा पुरवठा करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. काही भारतीय नेत्यांकडूनही या ड्रग्स माफियांना अभय मिळत असावे हे आणि वेगळे सांगायला नको.
एखाद्या मोठ्या अजगराने एखाद्या हरणाला विळखा घालावा तसा अमली पदार्थांचा विळखा बॉलिवूडला पडला असून, या विळख्यामुळे बॉलिवूडमधील किती कलाकारांचे प्राण जातील हे या घडीला सांगणे जसे कठीण आहे तसेच हा विळखा कोण सोडवेल हाही लाख मोलाचा प्रश्‍न आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

वजाबाकी

आयआयटी प्रकल्पावरून झालेल्या आरोप - प्रत्यारोपांनंतर अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अर्थात, सत्तावीस आमदारांचे...

एटीएम चोरी : दिल्लीत तिघांना अटक

>> दिल्ली पोलिसांची धडक कारवाई >> संशयितांकडून रोख रकमेसह पिस्तूल जप्त आंबिर्ण सुकूर येथील युनियन बँकेचे...

देशभरात ४ एटीएमची टोळक्याकडून चोरी

पर्वरीतील एटीएम चोरीप्रकरणी अटक केलेल्या टोळक्याने देशभरात चार एटीएमची चोरी केल्याचे उघड झाले आहे. पर्वरी गोवा येथे एटीएम चोरी प्रकरणातील मुख्य संशयित...

खनिज वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आलेल्या एका बैठकीत राज्यातील खनिज माल वाहतुकीसाठी नवीन दर निश्‍चित करण्यात आला आहे. खनिज...

लाडली लक्ष्मी योजनेची उत्पन्न मर्यादा ३ लाख

राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजनेत दुरुस्ती केली असून या योजनेची उत्पन्न मर्यादा वार्षिक ८ लाखांवरून ३ लाख रुपयांवर आणण्यात आली आहे. यामुळे...

ALSO IN THIS SECTION

‘कोरोना’चा लढा कितपत यशस्वी?

प्रमोद ठाकूर राज्याची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पर्यटन व्यवसायाला हळूहळू चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात देशी पर्यटकांची संख्या...

मी तुझी मावशी तुला न्यावया आलें!

डॉ. सोमनाथ कोमरपंत ‘महाराष्ट्र-रसवंती’मधील लक्ष्मीबाई टिळकांची ही कविता भावनाप्रधान तर आहेच; पण ती त्या काळाच्या संदर्भात अधिक काहीतरी...

रेल्वेस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार

शशांक मो. गुळगुळे केंद्रसरकारने भारतीय रेल्वेचे टप्प्याटप्प्याने खाजगीकरण करण्याचा व भारतातील असंख्य रेल्वेस्थानकांपैकी पहिल्या प्रयत्नात सुमारे ५० रेल्वेस्थानकांचा...

तोरण

मीना समुद्र आपण फारसे पुढारलेले नसलो तरी चालेल; मनात मात्र तोरण अवश्य हवे. आपल्या सुसंस्कारांची, सुविचारांची फुले-पाने त्यात...

झुला… नवरात्रीचा

पौर्णिमा केरकर आज महामारीमुळे मंदिरांना भाविकांअभावी सुन्नता आलेली आहे… सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. असे असले तरी ऋतुचक्र...