‘सुवर्णसौध’ इमारतीच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींच्या आगमनाच्या निषेधार्थ सीमावासीयांनी बेळगावात काल बंद पाळला. मात्र, पोलिसांनी आपल्या दडपशाही वृत्तीचे दर्शन घडवीत तेथे वार्तांकन करणार्या मराठी पत्रकारांना वार्तांकनास मज्जाव करून काही तास स्थानबद्धतेत ठेवले. आयबीएन लोकमत या वाहिनीचे ब्यूरो चीफ दिनेश केळुसकर हे बेळगावातील सीमावासीयांच्या प्रतिक्रिया घेत असता, पोलिसांनी त्यांचा माइक हिसकावून घेतला. प्रसिद्धी माध्यमांच्या झालेल्या या मुस्कटदाबीचा सर्व थरांतून निषेध होत आहे.
सीमाभागातील बंदच्या समर्थनार्थ शिवसेनेने काल कोल्हापुरात मोठी रॅली काढून कर्नाटक सरकारचा निषेध केला. शहरात बंदही पाळण्यात आला. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी आंदोलकांचे नेतृत्व केले. या बंदवेळी काही एसटी बसेसवर दगडफेक झाली, तर काही रिक्षांचीही मोडतोड करण्यात आली. एका पेट्रोल पंपची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोघा शिवसैनिकांना ताब्यात घेतले.
‘बेळगावी’चा फलक
राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण झालेल्या सुवर्णसौध संकुलाच्या फलकावर बेळगाव ऐवजी ‘बेळगावी’ असे नामकरण करून कर्नाटक सरकारने आपल्या मराठीद्वेष्ट्या नीतीचेच जणू दर्शन घडवले. बेळगावचे बेळगावी असे नामकरण अद्याप अधिकृतरीत्या झालेले नाही. सर्व्हेअर जनरलपुढे हा विषय प्रलंबित असताना आणि केंद्र सरकारनेही त्याला अद्याप रुकार दिलेला नसताना ‘बेळगाव’ ऐवजी ‘बेळगावी’ कसे करण्यात आले असा सवाल सीमावासीय करीत आहेत.