बेफिकिरीतून संकट

0
151

देशातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या बघता बघता दोन लाखांवर जाऊन पोहोचली आहे. सतत गेले पाच दिवस रोज दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते आणि गेले नऊ दिवस ही संख्या रोज एक लाखाहून अधिक होती. म्हणजेच भारतातील दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची संख्या अवघ्या दहा दिवसांत दुप्पट होत रोजच्या एक लाखावरून दोन लाखांवर गेली आहे. ही स्थिती चिंताजनक आहे, कारण जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या अमेरिकेमध्ये देखील दैनंदिन रुग्णसंख्या एका लाखावरून दोन लाखांवर जायला तब्बल २१ दिवस लागले होते. भारतात मात्र अवघ्या दहा दिवसांत ही संख्या दुप्पट झाली आणि दोन लाखांचा टप्पा गाठला गेला.
आज कोरोनाच्या जागतिक क्रमवारीत अमेरिकेपाठोपाठ भारत आहे. म्हणजेच ब्राझीलला मागे टाकून आज भारत कोरोना रुग्णांच्या बाबतीत दुसर्‍या स्थानावर जाऊन पोहोचलेला आहे. ह्या उद्रेकाचे परिणामही तितकेच भीषण असणे स्वाभाविक आहे. उत्तरेतील बहुतेक राज्यांमध्ये आज इस्पितळांत रुग्णांना खाटा उपलब्ध नाहीत. इस्पितळांमागून इस्पितळे संपूर्णतः कोविड रुग्णांसाठी आरक्षित केली जात आहेत. खाटा नसल्याने रुग्णांना खुर्चीतच प्राणवायू देण्याची वेळ ओढवली आहे. सातत्याने दहन करून विद्युतदाहिन्या जळाल्या आहेत. महाराष्ट्रात पंधरा दिवस संचारबंदी तर लागू झाली आणि आता इतर राज्येही हळूहळू कडक निर्बंधांकडे अपरिहार्यतेमुळे वळताना दिसत आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या तेथे नोंदवली गेल्याने कडक निर्बंधांशिवाय तेथील सरकारला प्रत्यवाय उरलेला नाही.
एकीकडे परिस्थिती अशी झपाट्याने अधिकाधिक बिघडत चालली असताना दुसरीकडे बेफिकिरीही तितकीच दिसते. उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्यात हजारो भाविक कोरोनाग्रस्त होऊन देखील प्रशासनाने कुंभमेळा तीस एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशात तेलगु नववर्षाच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दीत सोहळे झाले. पाच राज्यांतील निवडणूक प्रचारात तर कोरोनाची तमाच कोणाला दिसली नाही. एकूणच सार्वजनिक जीवनातील ही बेशिस्त आणि बेफिकिरीच आज भारतामध्ये ह्या महामारीचा नवा उद्रेक निर्माण होण्यास कारणीभूत ठरली आहे.
गोव्यामध्येही काही वेगळे चित्र नाही. नेत्यांपासूनच ही बेफिकिरी कशी सुरू होते हे आम्ही सप्रमाण दाखवून दिले, परंतु अजूनही ती सुरूच दिसते. यथा राजा, तथा प्रजा. आजही सार्वजनिक कार्यक्रमांमधून ‘मास्क, सॅनिटायझेशन आणि सामाजिक अंतर’ ह्या सोप्या त्रिसूत्रीचे पालन देखील होताना दिसत नाही. रोज वर्तमानपत्रांत झळकणारी छायाचित्रे पाहिली, तरी ह्या महामारीतही मास्क न लावता स्वतःच्या छब्या झळकवण्याचा हव्यास पाहून हसावे की रडावे कळत नाही. समाज एवढा बेदरकार असल्यावर कोरोनाने हात पाय पसरले तर नवल ते काय?
विविध राज्यांना लसीकरणावर भर देण्यास पंतप्रधानांनी सांगितले. त्यानुसार ‘टिका उत्सव’ सर्वत्र सुरू झाले आहेत. हे कार्यक्रम पक्षपातळीवर आयोजित करून आणि आमदारांकडे त्याची सूत्रे देऊन राजकीय श्रेय उपटण्याचा जो काही प्रकार चालला आहे तो अजबच म्हणायला हवा. लसीकरणाचेही श्रेय कसले घेताय? ते कर्तव्य आहे. ती जबाबदारी आहे! कोरोना हा राजकारणापलीकडचा विषय आहे आणि असायला हवा. केंद्र सरकारने स्पुतनिक लशीला नुकतीच मंजुरी दिली. विदेशी उत्पादकांच्या कोरोना लशींनाही आयात करण्याचाही निर्णय सरकारने घेतला. वास्तविक ही सूचना राहुल गांधींनी केलेली होती. तेव्हा राहुल फार्मा कंपन्यांसाठी ही मागणी पुढे करीत असल्याची टीका रविशंकर प्रसादांनी त्यांच्यावर केली होती. आता तोच निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची खरी गरज आहे. ही महामारी वय, जात, धर्म, वर्ण, प्रांत असे काहीही भेद पाहात नाही. मग राजकीय भेदाभेद तरी कशासाठी? ह्या महामारीचे निमित्त साधून एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी खटपटी लटपटी करण्याऐवजी सर्व राजकीय पक्षांनी, नेत्यांनी ह्या महामारीविरुद्ध एकत्र येणे जरूरी आहे, कारण हे अवघ्या मानवजातीवरील संकट आहे. त्याचा मुकाबला तेवढ्याच निर्धारपूर्वक आणि एकजुटीने झाला पाहिजे. कोरोनाच्या नव्या उद्रेकास कारणीभूत असलेल्या सामाजिक बेफिकिरीविरुद्ध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक नेतृत्वाने उभे ठाकण्याची आणि समाजाला सजग करण्याची आज खरी जरूरी आहे. तुम्ही स्वतःच मास्क न लावता गर्दीत वावराल तर जनता तुमचे कसे ऐकेल? सुरुवात तर तुमच्यापासूनच व्हायला हवी!