जनिता सोमवारपासून बेपत्ता होती. काल तिचा मृतदेह घरापासून दोनशे मीटर अंतरावर सावर्डे पुलाच्या खाली कुजलेल्या अवस्थेत मिळाला. तिचे शरीर ओळखण्याच्या पलीकडे होते. पण तिने घातलेल्या कपड्यांवरून तिचा मृतदेह ओळखता आला. संध्या. ४.३० वाजता मृतदेह मिळाला. त्यानंतर वाळपई पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉ बांबोळी येथे पाठविला.
जनिताची आत्महत्या हा संशय बळावणारी घटना असून मृतदेह सापडला असला तरी तिच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. ती पीलार येथे चार वर्षे एका कुटुंबाकडे कामाला होती. रविवारी अचानक तिला या कुटुंबियांनी धावे तार येथे आणले व तिच्या आईवडिलांना तुमच्या मुलीची वागणूक सारखी नाही असे सांगून तिचा ३३ हजार रुपये पगार आई-वडिलांच्या हातात दिला. एरवी हे कुटुंब जनिता जेव्हा घरी यायची त्यावेळी ती घरी पोहोचली की नाही याची नीट खात्री करून घ्यायची. पण अचानक तिच्याबद्दल वाईट वाटायला या कुटुंबाला झाले तरी काय असा प्रश्न जनिताच्या आईवडिलांना पडला आहे. तिने आत्महत्या करतेवेळी चिठ्ठी सुद्धा लिहिली नाही. त्यामुळे आत्महत्या करण्यामागचे कारण आता स्पष्ट होण्यासाठी पोलिसांना बराच तपास करावा लागणार. तिच्या आत्महत्येचे योग्य कारण संबंधित कुटुंबाकडे असू शकेल. कारण त्या कुटुंबाकडे जनिताने चार वर्षे काम केले. चार वर्षात तिच्याविषयी एकही तक्रार नाही. पण रविवारीच अशी काय घटना घडली की संबंधित कुटुंब तिला घरी पोहचायला आली. जनिताच्या आत्महत्येचे कारण आता गूढ बनले आहे. तिच्या कुटुंबाची मागणी आहे की पोलिसांनी तिच्या आत्महत्येचे कारण शोधावे. जनिताने आत्महत्या केल्याने तिच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे. ती काम करत होती त्या पगारावर कुटुंबाला मोठा आधार होता. वाळपई पोलिसांसमोर जनिताच्या आत्महत्येचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.