Home बातम्या बेतूलमधील बॉक्साईट खाण बंद

बेतूलमधील बॉक्साईट खाण बंद

0

भांडणे चालूच राहिल्याने जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

बेतूल येथील गेस्सालिया यांच्या खाणीवरील बॉक्साईडची वाहतूक करणार्‍या नाकेरी ट्रक व सालसेत ट्रक मालक संघटनेच्या ट्रकचालकांमध्ये आर्ले येथे मारहाणीचे प्रकार काल झाल्यानंतर जिल्हाधिकारी एन. डी. अगरवाल यांनी सदर बॉक्साईड खाण बंद करण्याचे आदेश दिले. तसेच आवश्यक कागदपत्रें, परवाने सादर करण्याचा आदेशही गोसालिया कंपनीला दिला.

गेल्या तीन दिवसांपासून आर्ले बगल रस्त्यावर सालसेत ट्रक मालकांतर्फे नाकेरी येथील ट्रक अडविण्यात येत होते. काल आर्ले येथे खणगिणी येथून बॉक्साईड भरून वास्को येथे नेत असताना संजय देसाई व भाऊ अजय नाईक यांची, फिरोज व पोब्र यांनी नाकेरीचे ट्रक अडविले. त्यावेळी श्रीकांत उत्तम नाईक देसाई किटल फातर्पा याला अडवून लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केले. त्याच्या गळ्यांतील ४५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून घेतली व आनंद देसाई याला मारहाण करून खिशांतील एमपीटी स्लीपस् व १० हजार रुपये काढून घेतले अशी तक्रार मडगांव पोलिस स्टेशनवर नोंदविली आहे. नाकेरी येथील ट्रक मालकांनी मारहाण करणार्‍यांना अटक करावी अशी मागणी केली होती.

अखेर दोन दिवसांआधी बैठक घेऊनही ट्रकवाल्यांचे भांडण चालूच राहिल्याने, जिल्हाधिकार्‍यांनी खाण बंद करण्याचा आदेश दिले. ही खाण चालू असल्याने कित्येक ट्रक मालक व चालकांना रोजगार मिळत होता तोही आता बंद झाला आहे.