Home बातम्या बेती येथे चोरट्यांना मुद्देमालासह अटक

बेती येथे चोरट्यांना मुद्देमालासह अटक

0

व्हालान्त-बेती येथील अब्दुल सत्तार या गाडा मालकाने आल्त बेती येथील आपले गाडेवजा दुकान फोडून आतील सुमारे चाळीस हजाराचे सामान चोरून नेल्याची तक्रार दि. २३ रोजी पर्वरी पोलिस स्थानकात नोंदविली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयिताना अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनुसार दि.२१ (रात्री ११.३०) ते दि. २२(सकाळी ९.३०) दरम्यान सत्तार यांचे दुकान चोराने फोडून आतील मोबाईल संच, सिगारेट पाकिटे, निरनिराळ्या कंपनीचे रिचार्ज वाउचर्समिळून सुमारे चाळीस हजार रुपयांचा माल चोरून नेल्याची तक्रार पर्वरी पोलिसांत नोंदविली होती. निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी चोरांनी पळविलेल्या मोबाईल संचावरून ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते चोर प्रथम कळंगुट येथे व नंतर रामनगर(बेती )येथे असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. हवालदार उल्हास नार्वेकर यांनी शिपाई रिकी फर्नांडीस, सतीश सावंत, अशोक गावडे, विनायक सावंत यांच्या मदतीने रामनगर (बेती ) येथे दोन संशयिताना ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिली. त्याना भा.दं.सं. ३५७ व ३८० कलमाखाली गुन्हा नोंदवून पोलिसांनी अटक केली. महम्मद युसुफ जाफर (२४ ) आणि हुसेन उस्मान कुरेशी (२३) अशी संशयित चोरांची नावे असून ते रामनगर (बेती) येथे वास्तव्यास असल्याचे कळते. चोरांकडून पळविलेला माल पोलिसांनी हस्तगत केला असून म्हापसा येथील न्यायदंडाधिकार्‍यासमोर त्यांना हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.