बेकायदा घरे नियमितीकरणासाठीचे 3 कायदे शनिवारपासून होणार लागू

0
17

महसूल खात्याकडून अधिसूचना जारी; घरांसाठीचे शुल्क आणि विहित अर्जाचे नमुनेही अधिसूचित

राज्यातील माझे घर योजनेखाली सरकारी, कोमुनिदाद, खासगी जमिनीतील बेकायदा घरे नियमित करण्यासाठी राज्य सरकारने सुधारणा केलेल्या तीन कायद्याची अंमलबजावणी शनिवार दि. 4 ऑक्टोबरपासून केली जाणार आहे. यासंबंधीची अधिसूचना महसूल खात्याने जारी केली आहे. घरे नियमित करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क आणि विहित अर्जाचे नमुने सुध्दा अधिसूचित करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने सरकारी, कोमुनिदाद आणि खासगी जमिनीतील बेकायदा घरे नियमित करण्यासाठी गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तीन विधेयके संमत केली होती. या विधेयकांना राज्यपालांनी मान्यता दिल्यानंतर त्या विधेयकांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यानंतर महसूल खात्याने बेकायदा घरे नियमित करण्यासाठी नियमांचा मसुदा जारी केला होता. आता, महसूल खात्याने सरकारी, खासगी आणि कोमुनिदाद जमिनीतील घरे कायदेशीर करण्यासाठीचे कायदे 4 ऑक्टोबरपासून लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राज्य सरकारच्या ‘माझे घर’ योजनेचा शुभारंभ 4 ऑक्टोबरला केला जाणार आहे. माझे घर योजनेखाली 28 फेब्रुवारी 2014 पूर्वीची सरकारी, कोमुनिदाद जमिनीतील बेकायदा घरे नियमित केली जाणार आहेत.

कोमुनिदाद जमिनीतील बेकायदा घरे नियमित करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोमुनिदाद जमिनीतील घर नियमित करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. पेडणे, तिसवाडी आणि फोंडा या तीन तालुक्यांसाठी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-1, बार्देश तालुक्यासाठी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-2, डिचोली आणि सत्तरी तालुक्यासाठी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-3 यांची नियुक्त केली आहे.

मुरगाव तालुक्यासाठी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-1, सासष्टी तालुक्यासाठी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-2, धारबांदोडा, काणकोण, सांगे आणि केपे या तालुक्यांसाठी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-3 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारी जमिनीतील बेकायदा घरे नियमित करण्यासाठी तालुक्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्जदाराला घर नियमित करण्यासाठी त्या त्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.

अर्जदाराला प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार
महसूल खात्याने घर नियमित करण्यासाठीचे अर्ज अधिसूचित केले आहेत. या अधिसूचनेत घर नियमित करण्यासाठी सादर करावे लागणाऱ्या कागदपत्रांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच, घरे नियमित करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क अधिसूचित केले आहे. या अर्जासोबत अर्जदाराला प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. या प्रतिज्ञापत्राचा नमुना अधिसूचित करण्यात आला आहे.