या पक्षाचे प्रवक्ते ताम्हणकर यांना काल पत्रकार परिषदेत छेडण्यात आले असता त्यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचे टाळले. बेकायदा खाण प्रकरणी १५१ जणांविरुद्ध पणजी पोलीस व गुन्हा अन्वेषण विभागात गुन्हे नोंदवून सहा आठवड्यांच्या आत कारवाई करण्याचा आदेश गेल्या २२ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सरकार व पोलिसांना दिले आहेत.
कालच्या पत्रकार परिषदेवेळी हा विषय उपस्थित झाल्यावेळी पत्रकारांनी ताम्हणकर यांना कॉंग्रेसची भूमिका काय असा प्रश्न केला होता.
सडा-वास्को येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी चौकशी करण्यास अपयशी ठरलेल्या संबंधित पोलीस अधिकार्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे देण्याची मागणी कॉंग्रेस प्रवक्ते सुदिन तामणकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली. पुरावे नष्ट करण्यास जबाबदार असलेल्यांवर पोलिसांनी अद्याप का कारवाई केली नाही, असा प्रश्न ताम्हणकर यांनी केला.
कॉंग्रेस सरकारच्या काळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रत्येक प्रश्नावर सत्ताधार्यांवर तुटून पडत होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. चालू विधानसभा अधिवेशनात विरोधी कॉंग्रेसने प्रथमच वरील प्रश्नावरून सरकारला धारेवर धरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
समीर मापारी खून प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्यास उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर या प्रकरणी युक्तिवाद करण्यासाठी अनुभवी वकील नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली. बेकायदेशीर खाण प्रकरणी उच्च न्यायालयाने संबंधित असलेल्या १५१ जणांवर गुन्हे नोंदवण्याचा जो आदेश दिलेला आहे त्यावर कॉंगे्रसची भूमिका काय, असा प्रश्न करून पत्रकारांनी ताम्हणकर यांना बरेच छेडले. मात्र त्यावर स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले. संबंधित १५१ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचे झाल्यास वरील प्रकरणाची चौकशी करणारे न्यायमूर्ती एम. बी. शहा यांनाही बोलावून त्यांची जबानी घ्यावी लागेल, असे ताम्हणकर यांनी सांगताच पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
शिक्षण माध्यम प्रश्नावरही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एमओआयवाल्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप ताम्हणकर यांनी केला. त्यावर पत्रकरांनी त्यांना कॉंग्रेस सरकारनेही या प्रश्नावर जनतेचा विश्वासघात केला नव्हता काय, असे विचारले असता ते गडबडले. गुड फ्रायडे हा राज्यातील ख्रिश्चन बांधवांचा दुखःचा दिवस त्यामुळे आज पेडणे येथे आयोजित केलेला सरकारी शिमगोत्सव पुढे ढकलण्याची मागणी ताम्हणकर यांनी यावेळी केली.

