बॅडमिंटन विस्ताराची ‘जीबीए’ची योजना

0
674

गोवा बॅडमिंटन असोसिएशनने २०२०-२४ या कालावधीत राज्यात बॅडमिंटन या खेळाच्या विस्ताराची नवी योजना काल १६ रोजी झालेली वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर केली. खांडेपार-कुर्टी येथे ही सर्वसाधारण सभा झाली. गोव्यातील बॅडमिंटनचा दर्जा वाढवण्यासाठी वीस कलमी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जीबीए राबवणार आहे. नियोजनबद्धरित्या वास्तववादी व व्यावहारिक पद्धतीने खेळाचा दर्जा व लोकप्रियता वाढवण्यासाठी संघटना काम करणार आहे.

या सभेत नूतन अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी संघटनेच्या योजनेविषयी सविस्तर माहिती देताना आपले विचारही मांडले. ते म्हणाले की, ‘बॅडमिंटन या खेळाचा देशात व राज्यात खूप विस्तार झाला आहे. गोव्यातील हा प्रगतीशील खेळ आहे. गोव्यातील काही बॅडमिंटनपटूंनी राष्ट्रीय स्तरावर पोहोचून आपली क्षमता दाखवून दिली असून आगामी दोन वर्षे जीबीएसाठी महत्त्वाची आहेत. या दोन वर्षांत आम्हाला नवीन टॅलेंटचा शोध घेऊन त्यांच्यातील प्रतिभेला पैलू पाडायचे आहेत’
‘तनिशा क्रास्टो व अनुरा प्रभुदेसाई यांच्या पावलावर पाऊल टाकून देशाला अधिकाधिक बॅडमिंटनपटू देण्याचे काम गोव्याला करायचे आहे. जीबीएच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे आम्हाला एक दिशा मिळणार आहे. आगामी चार वर्षांत आम्हाला प्रशिक्षण, खेळाडूंचा विकास यांवर भर देतानाच स्वतःची अकादमी उभारण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे,’ असे सलग दुसर्‍यांदा ‘जीबीए’चे अध्यक्ष झालेल्या ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले.

लोकप्रिय इंडियन प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या धर्तीवर व्यावसायिक बॅडमिंटन लीग आयोजनासाठी ‘जीबीए’ पावले उचलणार आहे. ही स्पर्धा संघटनेच्या कॅलेंडरचा भाग असणार आहे. त्यामुळे भविष्यात दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. लहान-लहान शहरांमध्ये मिनी लीग घेण्याचा विचारही जीबीए करत आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने नुकताच जाहीर केलेला ‘एअर बॅडमिंटन’ या बॅडमिंटनच्या ‘आऊटडोअर’ प्रकाराचा वापर खेळाला गावागावांत पोहोचवण्यासाठी करण्याचा संघटनेचा मानस आहे.
कार्यशाळा आयोजित करणे, तांत्रिक अधिकार्‍यांचा विकास घडवणे, बॅडमिंटनचे ग्रंथालय उभारणे, शालेय क्रीडा स्पर्धा तसेच राज्यस्तरीय स्पर्धांची दोन गटात विभागणी करणे आदींचा समावेश जीबीएच्या योजनेत आहे.

‘जीबीए’च्या योजनेतील सर्व गोष्टी तत्काळ सुरू करणे शक्य नाही. कोरोना विषाणूंमुळे संघटनेच्या कार्याला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे संघटनेकडून शक्य होईल तशा योजना राबवल्या जातील. गोव्यातील बॅडमिंटन क्षेत्रात नवी क्रांती घडवण्यासाठी संघटना सज्ज झाली असून गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने खेळाला नवीन उंचीवर आणून ठेवण्याचा संघटनेचा प्रयत्न असेल, असे संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी सांगितले.

तत्पूर्वी, निवडणूक अधिकारी मनोज पाटील यांनी सर्व सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. विद्यमान विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची मुख्य आश्रयदाते म्हणून निवड करण्यात आली. माजी प्रमुख वनसंरक्षक रिचर्ड डिसोझा व अग्निशामक व आपत्कालीक सेवा संचालक अशोक मेनन यांची मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली. जस्टो डी कॉस्टा, अनिकेत शेणई, दिलीप हळर्णकर, मयुश्री आजगावकर व एडविन मिनेझिस यांची जीबीएची योजना यशस्वी करण्याची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. वेटलिफ्टिंग असोसिएशन ऑफ गोवाचे सचिव जयेश नाईक व सागचे सहाय्यक सचिव (कार्यक्रम) महेश रिवणकर या सभेला अनुक्रमे गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे व गोवा क्रीडा प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.