भारताचा अव्वल तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि डावखुरा सलामीवीर शिखर धवन यांची बीसीसीआय यावर्षीच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
बुमराहने गोल्या ४ वर्षात टीम इंडियासाठी आकर्षक कामगिरी केलेली आहे. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्याने टीम इंडियाला अनेक सामन्यांत विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचललेले आहे. त्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी तो एक सर्वांत सक्षम उमेदवार आहे. गेल्या वर्षीही बीसीसीआयने त्याच्या नावाची शिफारस केली होती. परंतु निवडीच्या निकषांप्रमाणे खेळाडूने अव्वल स्तरावर कमीत कमी ३ वर्षे कामगिरी केलेली असावी लागते. त्यामुळे त्याची निवड झाली नव्हती. बुमराहने आतापर्यंत १४ कसोटी सामने, ६४ वनडे सामने आणि ५० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ६८ विकेट्स, वनडेत १०४ विकेट्स आणि टी२०त ५९ विकेट्स घेतल्या आहेत. अशाप्रकारे त्याने टीम इंडियासाठी खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
बुमराह निश्चितच उत्कृष्ट उमेदवार आहे. तो आयसीसीच्या क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज होता. तसेच एकमेव आशियाई गोलंदाज आहे, ज्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजमध्ये डावात ५-५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे, असे एका सूत्राने सांगितले.
भारताचा डावखुरा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन याच्या नावाची शिफारसही बीसीसीआय करणार आहे. यापूर्वी २०१८मध्ये बीसीसीआयने त्याच्या नावाची शिफारस केली होती. परंतु त्याला हा पुरस्कार मिळाला नव्हता. यंदाही त्याच्या नावाची शिफारस करण्यामागे त्याचा अनुभव असणे हेदेखील एक कारण आहे.