243 जागांसाठी दोन टप्प्यात पार पडणार मतदान; निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबरला होणार जाहीर
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) वरून चर्चेत असलेली बिहार विधानसभेची निवडणूक अखेर काल जाहीर झाली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार बिहारची निवडणूक या दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, राज्यातील अंतिम मतदारयादी मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे.
सध्याच्या विधानसभेची मुदत येत्या 22 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला 22 नोव्हेंबरपूर्वी निवडणूक घ्यायची आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने येत्या नोव्हेंबर महिन्यात बिहारची विधानसभा निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, आम्ही बिहारच्या राजकारण सक्रिय असलेल्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांच्या सूचना घेतल्या आणि निवडणुकीचा आराखडा तयार केला. आम्ही बिहारच्या जनतेला सांगू इच्छितो की यावेळी बिहारची निवडणूक केवळ बिहारमधील मतदारांसाठीच सोपी नसेल, तर अधिकाऱ्यांसाठी देखील सुलभ असेल. कायदा व सुव्यवस्थेवर पूर्ण लक्ष ठेवले जाईल. यावेळची निवडणूक ही पूर्णपणे पारदर्शक व शांततापूर्ण वातावरणात पार पडेल. ही आजवरची सर्वात चांगली विधानसभा निवडणूक असेल.
निवडणुकीच्या काळातील फेक न्यूजवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही ज्ञानेश कुमार यांनी दिला. सर्व मतदान केंद्रांवर हिंसाचारावर शून्य सहनशीलतेचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व अधिकारी निष्पक्षपणे काम करतील, असेही त्यांनी नमूद केले.
विधानसभेतील 40 जागा राखीव
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. यापैकी 203 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत, तर 38 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी 2 जागा राखीव आहेत.
राज्यात 7.43 कोटी मतदार
राज्यात 7.43 कोटी मतदार असून, त्यामध्ये 3.82 कोटी पुरुष व 3.50 कोटी महिला मतदार आहेत. यासह 1,725 तृतीयपंथी मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी 4 लाख मतदारांचे वय 85 पेक्षा जास्त आहे. राज्यात 14.01 लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, तर 1.63 कोटी मतदार हे 20 ते 28 वर्षे वयोगटातील आहेत.
आप सर्व जागा लढवणार
आम आदमी पक्ष बिहारमधील सर्व जागा लढणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत आपने 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
अर्ज प्रक्रिया कधीपासून?
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 10 ते 17 ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 18 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 13 ते 20 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 21 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्जांची पडताळणी पार पडेल. अर्ज मागे घेण्यासाठी 23 ऑक्टोबर ही अंतिम तारीख असेल.
आठ जागांवर पोटनिवडणुका जाहीर
बिहार निवडणुकीसह सहा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या आठ जागांवर पोटनिवडणुका होणार असून, त्या ठिकाणी 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम आणि नागरोटा, राजस्थानच्या अंता, झारखंडमधील घाटसिला, तेलंगणातील जुबली हिल्स, पंजाबमधील तरनतारन, मिझोरममधील दंपा ओडिशातील नुआपाडा येथे पोटनिवडणूक होणार आहे.

