दुसऱ्या टप्प्यात 122 मतदारसंघांत उद्या होणार मतदान
बिहार राज्यातील निवडणुकीचा प्रचार संपला आहे. निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या मंगळवारी होणार आहे. 14 नोव्हेंबरला बिहार निवडणुकाचा निकाल लागणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान जाहीर केले होते. त्यातील पहिल्या टप्प्यासाठी दि. 6 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये 65 टक्के मतदान झाले होते. उद्या 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे तर 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. बिहार राज्यात एकूण 243 मतदारसंघ असून त्यातील पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी 6 रोजी मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात 122 मतदारसंघांत 14 रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली आहे. तब्बल 4 लाखांहून अधिक सुरक्षा जवान विविध मतदान केंद्रांवर तैनात करण्यात येणार आहेत. नेपाळची सीमा 11 नोव्हेंबरपर्यंत सील करण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 45,339 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी 4,109 केंद्रे संवेदनशील घोषित केली असून त्यातील 4,003 बूथ ‘अतिसंवेदनशील’ आहेत. नक्षलग्रस्त भागांचा विचार करून, कटरिया, बेलहर, चैनपूर, कुटुंबा, औरंगाबाद, शेरघाटी यांसारख्या विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदान सायंकाळी 4 वाजेपर्यंतच तर इतर ठिकाणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे.

