बिहारमध्ये तिरंगी लढत

0
20

होणार, होणार म्हणून गेले वर्षभर जिची प्रतीक्षा होती, ती बिहार राज्याची विधानसभा निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. एकूण 243 जागांसाठी सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत ही निवडणूक होणार आहे. ह्या निवडणुकीविषयी आजवर बरेच लिहून झाले आहे. मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू, भाजप आणि मित्रपक्षांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस व डावे यांची ‘इंडिया’ आघाडी ह्यांच्यात सरळ सामना होईल अशी पूर्वी अपेक्षा होती, परंतु आता ह्यामध्ये आणखी एक तिसरी शक्ती बिहारच्या रणांगणात उतरली आहे, ती आहे प्रख्यात निवडणूकतज्ज्ञ प्रशांत किशोर. आजवर अनेक नेत्यांना आणि पक्षांना निवडणुका जिंकण्यासाठी योग्य दिशा दाखवत आणि आकडेमोड करीत आलेले प्रशांत किशोर आता मुख्यमंत्री नीतिशकुमार यांना थेट आव्हान देत रणांगणात उतरले आहेत. त्यांचा जनसुराज पक्ष सत्ताधारी आणि विरोधक ह्या दोन्हींची मते फोडील अशी शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच्या सर्व 243 मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा प्रशांत किशोर यांचा मानस आहे. त्यांच्या उदयामुळे बिहारमधील निवडणुकीत विलक्षण चुरस निर्माण झाली आहे. बहुतेक मतदारसंघांमध्ये थोडाफार मतांचा फरकही निकाल फिरवू शकत असल्याने प्रशांत किशोर यांच्या ह्या आव्हानाचा परिणाम सत्ताधारी आघाडीवर होणार की विरोधकांवर हा प्रश्न उपस्थित झाला आहे. नीतिशकुमार गेली अनेक वर्षे सत्तेत आहेत. निव्वळ सत्तेसाठी तत्त्वे गुंडाळून ठेवून माकडउड्या मारण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नाही. ‘पलटूराम’ अशीच त्यांची ख्याती आहे. पण तरीही प्रशासकीय कारभाराचा गाठीशी असलेला दीर्घ अनुभव, चांगल्या शासकाची असलेली प्रतिमा, त्यांनी राज्यात राबवलेल्या विविध कल्पक कल्याणयोजना, केंद्र सरकारच्या पाठबळावर निर्माण केलेल्या साधनसुविधा, केंद्रातील भाजप सरकार त्यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेत असल्याने त्याची परतफेड म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पात बिहारच्या वाटेला आलेले भरघोस दान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिळालेले भक्कम पाठबळ, ह्या सगळ्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा सामना करून आपण पुन्हा सत्तेत येऊच हा विश्वास नीतिशकुमार यांना आहे. भाजपाही बिहारमध्ये आपला टक्का वाढवण्याची संधी ह्या निवडणुकीत घेईल. मैथिली ठाकूर वगैरेंना दिला जाणारा भाजपप्रवेश त्याचेच निदर्शक आहे. दुसरीकडे नीतिशकुमार यांना सत्तेवरून पायउतार करण्यासाठी लालुप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यांनी कंबर कसली आहे. पित्याचा राजकीय वारसा आणि यादव मुस्लीम पारंपरिक मतपेढीचा भक्कम आधार आणि त्यात तरूण नेतृत्वाची प्रतिमा यामुळे तेजस्वी यांनी नीतिशकुमार यांच्यापुढे नक्कीच आव्हान निर्माण केले आहे. काँग्रेसला त्यांनी सोबत घेतले आहे, खरे, परंतु त्यातून केवळ आपसातील मतविभाजन टाळण्यापुरताच त्यांना फार तर लाभ संभवतो. राज्यातील बेरोजगारी, त्यामुळे होणारे स्थलांतर, नीतिशकुमार यांच्या सत्तेसाठीच्या कोलांटउड्या आदी विषय प्रचारात आणून तेजस्वी सतत तोफ डागत राहिले आहेत, परंतु नीतिशकुमार यांना सत्तेवरून पायउतार करण्याइतपत वातावरणनिर्मिती ते राज्यात निर्माण करू शकतील का हे पाहावे लागेल. आधीच निवडणूक आयोगाने बिहारमध्ये केलेल्या मतदार पडताळणी मोहिमेतून वातावरण कलुषित झाले आहे. लक्षावधी मतदारांची नावे मतदारयाद्यांतून वगळण्यात आलेली आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला सत्ता हस्तगत करता आली नाही तर पराभवाचे खापर त्यावर फोडले जाणार हे निश्चित, परंतु किमान सत्ता मिळवण्यासाठी, नीतिशकुमार यांचे सरकार खाली खेचण्यासाठी जनतेचा भरघोस पाठिंबा ती मिळवणार का हा प्रश्न आहे. प्रशांत किशोर यांनीही तिसरा पर्याय होण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी पदयात्रा काढली. जातीय राजकारणाकडून प्रचाराची दिशा त्यांनी राज्याच्या विविध प्रश्नांकडे वळवण्यात चतुराईने यश मिळवले आहे. त्यामुळे बेरोजगारी, स्थलांतर, प्रशासनातील त्रुटी, भ्रष्टाचार असे विषय ऐरणीवर आलेले आहेत. केवळ जातीच्या गणितांवर निवडणूक लढवता येणार नाही असे चित्र त्यामुळे निर्माण झालेले आहे. प्रशांत किशोर यांच्या ह्या राजकीय पदार्पणात त्यांना कितपत यश मिळते, त्यावर सत्तेची समीकरणे कशी उलटीपालटी होतात हे अवलंबून असेल. सत्ताधारी रालोआ विरोधकांचा धुव्वा उडवते की ह्या तिरंगी लढतीमुळे सत्ता गमावते हे पाहणे खरोखरच औत्सुक्याचे आहे. किमान त्रिशंकू स्थिती निर्माण करून प्रशांत किशोर किमान स्वतःला किंगमेकरच्या स्थितीत आणू शकतात का हेही पाहावे लागेल. एकूण बिहारची निवडणूक एकतर्फी नसेल, तर चुरशीची ठरेल असे चित्र दिसू लागले आहे.