पहिल्या टप्प्यासाठी 121 जागांवर निवडणूक
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 121 जागांवर आज 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यात सर्वात महत्वाच्या सात लढती आहेत. त्यात माजी उमुख्यमंत्री महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव, लालूंचेच मोठे पूत्र आणि जनशक्ती जनता दलाचे अध्यक्ष तेजप्रताप यादव, बिहार भाजपमधील सर्वात मोठा चेहरा सम्राट चौधरींसह मैथिली ठाकूर, काँग्रेसचे शशांत शेखर यांचा समावेश असून या उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार असून त्यातील पहिल्या टप्प्यासाठी आज दि. 6 रोजी मतदान होईल. 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे तर 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. बिहार राज्यात एकूण 243 मतदारसंघ असून त्यातील पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी आज गुरूवारी मतदान होणार आहे.
तरापूर हा नितीशकुमार यांचा सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ असून तो त्यांनी यावेळी भाजपला दिला आहे. या मतदारसंघात सम्राट चौधरी (भाजप) विरुद्ध अरुण शाह (राजद) यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघात गेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने उमेदवार दिलेला नव्हता. राघोपूर येथील मतदारसंघात तेजस्वी यादव (राजद) विरुद्ध सतीश कुमार (भाजप) अशी सरळ लढत होत आहे. तेजस्वी यादव हे महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. महुआ मतदारसंघात तेजप्रताप यादव (जनशक्ती जनता दल) विरुद्ध मुकेश कुमार रोशन (राजद) अशी लढत होणार आहे. तेजप्रताप यादव हे लालूंचे मोठे पुत्र असून त्यांची राजदमधून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी जनशक्ती जनता दलाची स्थापना केली आणि त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या महुआमधून उमेदावारी अर्जही भरला आहे. अलीनगर मतदारसंघातून भाजपतर्फे लोकगायिका मैथिली ठाकूर विरुद्ध बिनोद मिश्र (राजद) यांच्यात लढत होत आहे. मैथिली यांना पक्षात घेवून उमेदवारी दिल्याने त्यांना पक्षातूनच विरोध झाला होता. मात्र मैथिली ठाकूरसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी प्रचारसभा घेतली. हे अत्यंत महत्त्वाचे मतदारसंघ आहेत.

