वीज खात्याच्या ट्रॅक्स व टिप्पर अशा दोन वाहनांना वेळीपवाडा बाळ्ळी येथील पुलावर अपघात होऊन वीज खात्याचे ११ जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे.
काल सायंकाळी जीए ०९ यु ३६५० क्रमांकाचा टिप्पर केपे येथून बाळ्ळीच्या दिशेने येत होता. तर वीज खात्याचा ट्रॅक्स काणकोण येथून कुडचडे येथे निघाला होता. वीज खात्याचे कर्मचारी काणकोण येथे क्रिकेट खेळून परतले होते. जीए ०८ जे ००२३ क्रमाकांच्या ट्रॅक्समध्ये १२ जण होते. दोन्ही वाहने भरवेगाने निघाली होती. वेळीपवाडा पुलावर दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली व त्यात वीज खात्याचे लोक जखमी झाले. जखमीमध्ये वल्लभ चंद्रकांत पंचवाडकर, महमद खान, सुशांत गावकर, सर्वेश कालेकर, संजय फडते, विवेकानंद खाडेकर, सागर शिरोडकर, गुरू गावडे, किरण व मळीक तसेच प्रवीण जखमी झाले. त्यातील प्रवीण याची प्रकृती गंभीर आहे. त्याला गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल केले असून इतर दहा जणांवर हॉस्पिसियो इस्पितळात उपचार चालू आहेत. कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिकेतून मडगाव येथे हॉस्पिटलात नेण्यात आले.