Home बातम्या बाळासाहेब नावाचा कॅलिडोस्कोप

बाळासाहेब नावाचा कॅलिडोस्कोप

0

– नंदकुमार टेणी

-प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा बाळ हा ज्येष्ठ चिरंजीव. बाळासाहेबांचा जन्म पौषातला. त्यांची आजी म्हणजे आईची आई नेहमी म्हणायची की, ‘रमे, तुझा हा कार्टा पौषात जन्माला आला बरं! पौषात जन्मलेला पुत्र आईबापाच्या सगळ्या कामगिरीला पुसून टाकतो. घरादाराची समृद्धी पुसून टाकतो. याला जरा सांभाळूनच वाढव बरं!’ आणि लहानगा बाळ आईकडे कावर्‍याबावर्‍या नजरेने बघायचा. तेव्हा त्याची आई त्याला उराशी घट्ट कवटाळून मटामटा मुके घ्यायची. बाळला कळायला लागले तेव्हा आजीने ही वाक्य उच्चारली की बाळ म्हणायचा, ‘आई तू काही काळजी करू नकोस, माझा जन्म पौषातला असला तरी मी पुसून टाकेन ते ठाकरे घराण्याचं दारिद्य्र. ठाकरे कुटुंबियांची गरिबी दूर करून माझ्या कर्तृत्वाचा असा काही झेंडा रोवेन की, आपलं घराणं त्यामुळे ओळखलं जाईल.’ लहानपणी उच्चारलेले ते शब्द बाळासाहेबांनी आयुष्यात खरे करून दाखवले.

बाळासाहेबांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. ही चित्रकला व्यंगचित्रांच्या जातकुळीतील होती. अभ्यास करायच्या नावाखाली लहानपणी बाळ अभ्यासाच्या पुस्तकात चित्रकलेची वही दडवायचा आणि व्यंगचित्रं रेखाटत बसायचा. एकदा अशा चित्रांची ही वही बाळच्या आईच्या हाती लागली. त्यांनी ती बाळच्या पिताश्रींना दाखवली आणि सांगितले, ‘आपला दिवटा चिरंजीव बघा कशी वेडीवाकडी आणि घाणेरडी चित्रं काढतो आहे.’ ती वही पाहिल्यानंतर केशवराव हसत हसत म्हणाले, ‘अहो ही घाणेरडी वेडीवाकडी चित्रं नाहीत. याला व्यंगचित्रं म्हणतात -‘कार्टून’! ही कला महाकठीण असते. आपल्या बाळच्या हाताला ती गवसली हे त्याचं भाग्य म्हणलं पाहिजे. करू दे त्याला काय करायचं ते. तुम्ही त्याला बोलू नका.’

भिवंडीहून प्रबोधनकारांनी आपले कुटुंब दादर आणि माहीमच्या सीमेवर असलेल्या मिरांडाच्या चाळीत आणले. बाळ आर्यन हायस्कूलमध्ये दाखल झाला. त्या काळी आर्यन हायस्कूल म्हणजे अगदी तळागाळातल्या समाजाची शाळा समजली जायची. इथे बाळला भाई भगत नावाचा मित्र लाभला. एक दिवस भाईने बाळला विचारले, ‘आपण हस्तलिखित काढू या का?’ बाळने होकार दिला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. बाळची आशयचित्रे आणि व्यंगचित्रे व कलात्मक अशी सजावट आणि भाईच्या रेखीव हस्ताक्षरातून हा अंक साकारला. त्या काळी आचार्य अत्रे राज्य पातळीवर शालेय हस्तलिखितांची स्पर्धा भरवत असत. या स्पर्धेत बाळ आणि भाईच्या या हस्तलिखित अंकाला पहिले पारितोषिक मिळाले होते. बाळ मॅट्रीक झाला तेव्हा व्यंगचित्रकार म्हणून नुकतेच नाव कमवू लागला होता.

आचार्य अत्रेंच्या साप्ताहिक ‘नवयुग’ तसेच साप्ताहिक ‘ज्योत्स्ना’ अशा साप्ताहिकातून त्याची व्यंगचित्रे झळकत होती. अशा स्थितीत ‘नवशक्ती’ व ‘ङ्ग्री प्रेस’ दैनिकाचे मॅनेजर नाडकर्णी प्रबोधनकारांच्या भेटीस आले होते. आपला बाळ काय करतो असा प्रश्‍न त्यांनी केला असता प्रबोधनकार म्हणाले, ‘मॅट्रीक झालाय आणि व्यंगचित्रे काढतो आहे. नोकरीच्या शोधात आहे.’ नाडकर्णींनी ताबडतोब सांगितले ‘बाळ, उद्या मला ऑङ्गिसात भेट आणि लगेच रुजू हो.’ अशा रितीने बाळासाहेबांना त्या काळात क्रमांक एकवर असलेल्या ‘नवशक्ती’ आणि ‘ङ्ग्री प्रेस’साठी व्यंगचित्रे रेखाटण्याची संधी लाभली. त्यावेळी त्यांच्यासमवेत आर. के. लक्ष्मणदेखील स्टाङ्ग कार्टुनिस्ट म्हणून कार्यरत होते. बाळची आणि त्यांची तिथे जी मैत्री जमली ती आजही कायम आहे. थोड्याच दिवसांनी बाळासाहेबांना केबिन मिळाली. एकदा या वृत्तसमुहाचे मालक ए. बी. नायर सहज बाळासाहेबांच्या केबिनमध्ये डोकावले आणि त्यांनी चौकशी केली. ‘इतकी स्वच्छ आणि नीटनेटकी केबिन कोणाची आहे.’‘अपना नया कार्टुनिस्ट बाल ठाकरे की है,’ हे कळल्यावर त्यांना प्रश्‍न पडला की, केबिन इतकी स्वच्छ ठेवणारा माणूस व्यंगचित्रे काढतो की नाही? कारण बाकीच्या कार्टुनिस्टची केबिन्स शाई आणि रंगाचे डाग, सर्वत्र पसरलेले कागद, कागदाचे बोळे, कॅनव्हास अशा पसार्‍याने भरून गेलेली असायची. परंतु इतकी स्वच्छ केबिन ठेवणारा नवा कार्टुनिस्ट सर्वात जास्त कार्टून काढतो हे नायर यांना कळले तेव्हा तेही चकीत झाले. कोणत्याही विषयावरचे कार्टून काही मिनिटांमध्ये रेखाटणार्‍या बाळासाहेबांचा हात आर. के. सुद्धा धरू शकत नव्हते.

बाळासाहेबांनी कधीही आपलं कार्टून दुरूस्त केलं नाही. त्यांचं प्रत्येक कार्टून हे ङ्गायनलच असायचं. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकासाठी आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या ‘समाजवादी युवक पत्रिके’साठी ‘मावळा’ या टोपणनावाने बाळासाहेब कार्टून काढायचे. ‘मला कुणीही मी कार्टून कोणाचे काढावे, कसे काढावे अथवा काढू नये हे सांगायचे नाही. माझे कलावंत म्हणून असलेले स्वातंत्र्य मी अबाधित ठेवणार. पटत असेल तर कामावर ठेवा नाही तर या क्षणापासूनच तुमच्या नोकरीला रामराम,’ असा बाळासाहेबांचा बाणेदारपणा होता. कॉंग्रेसचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष स. का. पाटील यांची कार्टून काढू नका किंवा काढली तरी सौम्यतेने रेखाटा, अशी सूचना मालक असलेल्या नायर यांनी करताच बाळने घरी राहणे पसंत केले होते. त्यावेळी ‘ङ्ग्री प्रेस’चे संपादक पी. एस. सदानंद हे बाळासाहेबांना घरी बोलवायला गेले होते. व्यंगचित्रकाराने नोकरीचा राजीनामा दिल्यावर संपादक मनधरणी करण्यासाठी त्याच्या घरी जातो असे हे भारतीय पत्रकारितेतील एकमेव उदाहरण असावे.

बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पहिल्या अंकाच्या प्रकाशनासाठी कोणाला बोलवावे असा मुद्दा आला. प्रबोधनकार म्हणाले, ‘अरे आपल्या यशवंतराव चव्हाणांना बोलव. ते मुख्यमंत्री आहेत.’ ‘आजवर मी माझ्या व्यंगचित्रातून ज्यांची प्रचंड खिल्ली उडवली ते यशवंतराव माझ्या साप्ताहिकाच्या प्रकाशनाला येतील काय?’ असा प्रश्‍न बाळासाहेबांनी केला असता. प्रबोधनकारांनी तत्काळ यशवंतरावांना ङ्गोन लावला. यशवंतराव म्हणाले, ‘अरे बाळच्या साप्ताहिकाच्या प्रकाशनाला मी येणारच. माझा तो आवडता व्यंगचित्रकार आहे. लेखणीचे ङ्गटकारे तो मला देत असतो. पण त्याचे ते कामच आहे. त्या ङ्गटकार्‍यातूनही आम्हाला खूप शिकायला मिळते.’

बाळासाहेब आणि त्यांचे पिताश्री प्रबोधनकार यांच्यातही पितापुत्राच्या नात्यापलीकडचा वेगळाच भावबंध होता. प्रबोधनकारांनी सांगावे आणि बाळासाहेबांनी ऐकावे हा शिरस्ताच होता. ‘बाळ, मराठी माणसाची ङ्गार कुचंबणा होत आहे. ती थांबवण्यासाठी काही तरी केले पाहिजे.’ असे प्रबोधनकारांनी म्हणताच बाळ म्हणाला, ‘तुम्ही आदेश द्या, मी अंमलात आणतो.’ मग ‘वाचा आणि स्वस्थ बसा’ हे

‘मार्मिक’मधले सदर सुरू झाले. त्यातूनच शिवसेनेचा जन्म झाला. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी संघटना काढायची असे बाळासाहेबांनी ठरवले आणि नाव काय द्यावे असा प्रश्‍न पिताश्रींना केला असता ते म्हणाले नाव एकच द्यायचे- ‘शिवसेना’. तिच्या उद्घाटनाचा सोहळा कुठे घ्यावा याची चर्चा सुरू झाली तेव्हा अनेकांनी वेगवेगळ्या जागा सुचवल्या. पण बाळासाहेबांनी ‘शिवाजी पार्क’ हीच जागा निश्‍चित केली. एवढे मोठे मैदान भरले नाही तर नाचक्की होईल त्यापेक्षा छोटा हॉल बघा असे सल्ले दिले. परंतु बाळासाहेब आपल्या निर्णयावर ठाम राहिले. संपूर्ण शिवाजी पार्क शिवसेनेच्या उद्घाटनाच्या वेळी भरून गेले तेव्हा भारावलेले प्रबोधनकार म्हणाले, ‘हे मराठी माणसांनो, इतके दिवस ठाकरे कुटुंबांचा पुत्र असलेला माझा हा बाळ आजपासून मी महाराष्ट्राला अर्पण करून टाकला आहे.’

बाळासाहेबांनी आपल्या पिताश्रींचे हे शब्द त्या क्षणापासून आजपर्यंत शब्दश: खरे करून दाखवले. सुरुवातीच्या काळात हातात बॅटरीवर चालणारा लाऊडस्पिकर घेऊन बाळासाहेब चौकाचौकात सभा घ्यायचे. त्यांनाही मोठा प्रतिसाद लाभायचा. मूलत: अत्यंत अबोल असलेले बाळासाहेब शिवसेना आणि मराठी माणसाची गळचेपी या विषयांवर प्रखरतेने बोलायचे. शिवसेनाप्रमुखांचे शब्द इतके ज्वालाग्रही असायचे की, त्यातून शिवसेना नावाचा अंगार ङ्गुलत गेला. पाहता पाहता शिवसेना भरारी घेती झाली. शिवसेनच्या पहिल्या राजकीय सामर्थ्याची चुणूक कृष्णा देसाईंच्या हत्येनंतर परळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत दिसून आली. कृष्णा देसाईंचा खून शिवसेनेने केला, अशी टीका चोहोबाजूंनी होऊ लागली तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने वामनराव महाडिकांना उमेदवारी दिली. शिवसेनेला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसपासून डाव्या पक्षांपर्यंत सगळे पक्ष एकत्र आले आणि कृष्णा देसाईंच्या सौभाग्यवतींना उमेदवारी दिली. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व पक्षांनी आणि त्यांच्या विरुद्ध शिवसेनेने जंग जंग पछाडणारा प्रचार केला आणि या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक प्रचंड बहुमताने निवडून आले. त्यांच्या विजयाची मिरवणूक आठ ते दहा किलोमीटर लांबीची होती. मुख्य म्हणजे तिच्यात प्रत्येक शिवसैनिक आणि मराठी माणूस स्वयंस्ङ्गूर्तीने सहभागी झाला होता त्या पाठोपाठ ठाणे पालिकेची निवडणूक शिवसेनेने जिंकली आणि मुंबई महापालिकेतही तिचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले.

बाळासाहेबांच्या जिवाला असलेला धोका वाढला तसे ‘भगवा गार्ड’ नावाचे पथक बाळासाहेबांच्या संरक्षणासाठी साकार करण्यात आले. तिथून बाळासाहेबांचा करिश्मा सतत वाढतच गेला. राजकारणात बाळासाहेबांनी कोणाचा मुलाहिजा ठेवला नाही. आचार्य अत्रे आपल्या ‘मराठा’मधून ठाकरेंवर तुटून पडले, तेव्हा ठाकरेंनी आपल्या ‘मार्मिक’मध्ये आपल्या ब्रशच्या टोकाला एक मेलेले डुक्कर उलटे टांगलेले असल्याचे दाखवले त्याचे तोंड अत्रेंसारखे दाखवले, आणि त्याखाली कॅप्शन लिहिली, ‘वरळीचा हा डुक्कर ङ्गारच मातला होता. म्हणून त्याचा असा समाचार घ्यावा लागला.’ असे असले तरी आचार्य अत्रे बाळासाहेबांशी गप्पा मारायला आणि प्रबोधनकारांबरोबर चहा प्यायला घरी येत असत. स. का. पाटील यांच्या वाढदिवसाला पहिला बुके बाळासाहेबांकडून जात असे. बॅरिस्टर अ. र. अंतुले १९९५ ची लोकसभा निवडणूक रायगड मतदारसंघातून लढवत होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे अनंत तरे उभे होते. अंतुलेंनी गडबड करून विजय पदरात पाडून घेतला, परंतु तरेंनी रिकाऊंटींगची मागणी केली व ती मान्य झाली. त्यामध्ये ते विजयी होणार अशी चिन्हे दिसत असताना अंतुलेंनी शिवसेनाप्रमुखांना साकडे घातले. ही माझ्या आयुष्यातली अखेरची निवडणूक आहे. त्यानंतर मी निवृत्त होणार आहे. तुम्ही अनंताला त्याचं रिकाऊंंटींग ऍप्लिकेशन मागे घ्यायला लावा. आपल्या उमेदवाराचा विजय होणार हे माहीत असताना केवळ अंतुलेंशी असलेल्या मैत्रीला जागून बाळासाहेब तरेंना हार मान्य करायला लावली. रिकाऊंटींग थांबवायला लावले. कालांतराने या निष्ठेची पावती म्हणून तरेंना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली.

शिवसेनाप्रमुखांवर शिवसैनिक प्रेम का करतात हे आजही अनेकांना न उलगडणारे गूढ आहे. परंतु ज्यांनी शिवसेना प्रमुखांना अगदी प्रारंभाच्या काळात संघटना बांधताना पाहिले आहे त्यांना हे गूढ सहज उलगडू शकते. बाळासाहेबांनी एका एका दिवशी वीस-वीस सभा घेतल्या आहेत. अन्न-पाणी-तहान-भूक विसरून त्यांनी त्या घेतल्या. एकदा तर पहाटेच्या चहाच्या कपवर निघालेल्या बाळासाहेबांना कोकणामध्ये अनेक सभा घ्याव्या लागल्या आणि परतताना उसंत मिळाली तेव्हा सगळे ढाबे, हॉटेल, ठेले बंद झाले होेते. एका नाक्यावर भुजार्‍याचे दुकान होते. त्याच्याकडे ङ्गक्त दोन पसा चुरमुरे, एक कांदा आणि एक मिरची उरली होती. दत्ताजी साळवी आणि बाळासाहेब या दोघांनी त्यातले एक-एक मूठ चुरमुरे खाल्ले, अर्धी अर्धी मिरची चावली आणि त्याला अर्ध्या कांद्याचा आधार दिला. ही गोष्ट १९७० च्या सुमारासची. १९९० मध्ये शिवसेनाप्रमुख मराठवाड्याच्या दौर्‍यावर होते त्यावेळी बीड येथे सभा होती. सहा लाखाचा समुदाय सभेला होता. तिथून जालन्याला सभा होणार होती. आता जेवणाचा घाट घालू नका, असे साहेबांनी बजावल्यामुळे कांदा-पोहे पिशवीत बांधून त्याची पार्सलं केली गेली आणि प्रत्येकाच्या हातात दिली गेली. सगळ्यांनी त्यावर ताव मारला. जालन्याला गेल्यावर लक्षात आले, पथ्यपाण्याच्या स्वयंपाकासह येणारा साहेबांचा डबा आला नाही. सभेच्या गर्दीमध्ये चुकामूक झाली आणि साहेब तसेच जालन्याच्या दिशेने निघाले. सोबत असलेल्या थर्मासमधला गरम पाण्याचा घोट घेऊन रिकाम्या पोटी साहेब व्यासपीठावर एक तासाचे भाषण करण्यासाठी सिद्ध झाले.

साहेबांचे कुटुंबवत्सल म्हणून जे व्यक्तिमत्त्व आहे. ते तर अज्ञातच राहिले. बाळासाहेबांचा नुकताच विवाह झाला होता. त्यांचे मेहुणे त्यावेळी लहान होते. दिवाळीच्या दिवसात या छोट्या मेहुणेराजांनी त्याकाळी नवलाईची असणारी दिव्याची माळ आरास म्हणून दाराला लावली होती. ती पाहण्यासाठी त्यांनी बाळासाहेबांना बोलावले. बाळासाहेब गेले तर मेहुण्यांनी बटण दाबताच ती माळ लागली पण तिची उघडझाप काही झाली नाही. पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न व्यर्थ झाले. तेव्हा बाळासाहेब म्हणाले ‘अरे चंदू कशाला उगाच मेहनत करतोस. त्यापेक्षा मीच माझ्या डोळ्यांची उघडझाप करून घेतो.’ त्यासरशी चिमुकल्या चंदूचा चेहरा खुशीनं उजळून निघाला. बाळासाहेबांच्या मिश्किलतेचे किस्से किती सांगावेत? मी ‘सामना’चा पहिला वृत्तसंपादक होतो आणि माझी सौभाग्यवती सामनाच्याच डीटीपी सेंटरमध्ये ऑपरेटर होती. माझी केबिन आणि डीटीपी डिपार्टमेंट यात ङ्गक्त काचेचे पार्टीशन होते. ‘सामना’ सुरू झाल्यानंतर बाळासाहेब दुसर्‍याच दिवशी ऑङ्गिसमध्ये आले होते. आधी ते कार्यकारी संपादक पडबिद्री यांच्या केबिनमध्ये गेले. तिथून माझ्या केबिनमध्ये आले. शुभेच्छा दिल्यानंतर डीटीपीच्या केबिनमध्ये गेले. सगळ्यांशी ओळख करून घेतली आणि माझ्या मिसेसची ओळख करू घेत असताना जोरात हशा उसळला. तिथून ते बाहेर पडले आणि परत माझ्या केबिनमध्ये आले आणि म्हणाले, ‘आत काय जोक घडला तो तुला कळाला का?’ मी नाही म्हणालो. तेव्हा ते म्हणाले, ‘मी तुझ्या बायकोला म्हणालो, तो तिकडे आणि तू इकडे अशी स्थिती असली तरी मध्ये काच आहे याचे भान ठेवा.’ शिवसेनेचे प्रमुख नेते प्रमोद नवलकर हे ‘भ्रमंती’ हा दिवाळी अंक काढायचे. त्यांनी एक अंक तृतीयपंथी समाजावर काढला आणि त्यात असे वाक्य लिहिले की, ‘स्त्रियांतील तृतीयपंथी सुंदर स्त्रियांपेक्षाही सुंदर असतात. ते बाळासाहेबांच्या वाचनात आले. तेव्हा त्यांनी नवलकरांच्या सौभाग्यवती वंदना यांना ते वाक्य वाचायला लावले. त्यानंतर त्यांनी नवलकरांची जी काही खरडपट्टी काढली तिला तोड नव्हती. राजचा जन्म झाला तेव्हा शिवसेनाप्रमुखांना झालेला आनंद अवर्णनीय होता. त्यांचे राजवर इतके प्रेम होते की रोज रात्री राज त्यांच्याच खांद्यावर आणि त्यांच्याच थोपटण्याने निद्राधीन होत असे. बाळासाहेबांच्या कलानगरमधल्या ‘मातोश्री’च्या गच्चीवर राजला आभाळात उडणारी विमाने दाखवणे हा बाळासाहेबांचा आवडता छंद होता. त्या काळी म्हणजे राज पाच-सहा वर्षांचा झालेला असेल. तेव्हाची ही गोष्ट. एका रविवारी बाळासाहेब श्रीकांतजींकडे आणि दुसर्‍या रविवारी श्रीकांतजी बाळासाहेबांकडे सहकुटुंब जात असत आणि त्यावेळी नॉनव्हेजचा बेत होत असे. एका रविवारी चांगला कढईभर चिकनचा बेत केला होता. चिकनच्या उकळत्या रश्याने भरलेली कढई उचलून श्रीकांतजींचा नोकर ती बाहेर नेत होता. एवढ्यात आपल्याच नादात पळत सुटलेला राज त्याला येऊन धडकला. आणि उकळता चिकनचा रस्सा राजच्या सर्वांगावर पडला. बाळासाहेब लुंगी आणि बनियनवर कार्टून काढत होते. ते तश्या अवस्थेत ‘मातोश्री’वरून धावत आले. राजला डॉक्टरांकडे नेले आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ आठ महिने राजच्या शरीराचा प्रत्येक ङ्गोड स्पीरीटने स्वच्छ धुवून त्याला बरनॉल लावण्याचे काम बाळासाहेबांनी केले.