बार्देश तालुक्यातील कांदोळी व किटला हळदोणा येथील बार ऍण्ड रेस्टॉरंट व घराला काल सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आग लागून सुमारे ५ लाखाहून अधिक किंमतीच्या वस्तू जळून खाक झाल्याची माहिती पिळर्ण व म्हापसा अग्निशामक दलाने दिली.
याबाबत पिळर्ण अग्निशामक दलाने दिलेल्या माहिती नुसार काल सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास कांदोळी आरोग्य केंद्राजवळ असलेल्या पायस गार्डन या बार ऍण्ड रेस्टॉरंटला आग लागून आतील वॉटर कुलर, टेबल, खुर्च्या तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्या. त्यामुळे या बार ऍण्ड रेस्टॉरंटचे मालक वेरॉन रॉड्रिगिस यांना सुमारे ३४ लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवानांनी घटनास्थळी पाण्याच्या बंबसहीत जाऊन आग विझविली.
दुसर्या घटनेत किटला हळदोणा येथील कायतान आलेमाव यांच्या घराला काल सकाळी ८.४० च्या सुमारास आग लागली.
या आगीत घरातील कपडे, धुण्याचे मशिन, क्रीडा, लॅपटॉप, टेबल खुर्च्या, सोफासेट व इतर वस्तू मिळून सुमारे २ लाख रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशामक दलाने आग विझविली. वरील दोन्ही आगी कशा लागल्या या समजू शकले नसल्याचे अग्निशामक दलाने सांगितले.

