बाराही तालुक्यांत ‘स्वयंपूर्ण चतुर्थी’ बाजार

0
16

>> २० ऑगस्टपासून प्रारंभ; मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्य सरकारने स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाखाली १२ तालुक्यांमध्ये ‘स्वयंपूर्ण चतुर्थी’ बाजाराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २० ऑगस्टपासून चतुर्थी बाजाराला प्रारंभ केला जाणार आहे. पारंपरिक मिठाई, माटोळी, सजावट साहित्य, फुलांची विक्री करणार्‍या स्थानिकांना विनामूल्य स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

राज्यातील स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी बारा तालुक्यांमध्ये खास मंडप उभारून स्टॉल्स तयार केले जाणार आहेत. तसेच, कदंब बसस्थानकावर सुध्दा स्टॉल्स सुरू करण्यास मान्यता दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हस्तकला, मिठाई, मोदक, नेवर्‍या, माटोळी साहित्य आणि चतुर्थीला लागणार्‍या इतर वस्तूंची विक्री स्वयंपूर्ण चतुर्थी बाजारातून केली जाणार आहे. नागरिकांचा बाजारातील तयार पदार्थांच्या खरेदी करण्याकडे जास्त कल दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनी तयार केलेल्या नेवर्‍या, मोदक, माटोळीचे साहित्य नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्त्वावर स्टॉल्सचे वाटप केले जाईल. चतुर्थी बाजारात स्टॉल सुरू करण्यासाठी इच्छुकांनी आपापल्या पंचायत क्षेत्रातील स्वयंपूर्ण मित्रांशी संपर्क साधावा, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.