Home बातम्या बाय बाय सचिन!

बाय बाय सचिन!

0

– श्रद्धानंद वळवईकर

किती वर्णावा तेंडुलकरी महिमा|

अडीच दशके तू विकेटवरी उभा॥

फटक्यांचा निर्माता तू| डावांचा सावरता॥

तंत्राचा अंतर्ज्ञानी तू| मेरूमणी महानतेचा॥

शतकांचा राजा तू| धावांचा महाराजा॥

विक्रमांचा अधिपती तू| क्रिकेटचा जगपती॥

विजयांचा महामेरू तू| प्रतिस्पर्ध्यांचा कर्दनकाळ॥

 हा तेंडुलकरी महिमा वर्णावा तरी किती? या महान खेळाडूवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करावा तरी किती? प्रतिष्ठेचा पद्मविभूषण, भारतीय खेळ क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट ‘खेलरत्न’, २०१० सालचा आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठीचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार, २०१२ साली राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती आणि भारतीय सेनेतील ‘कर्नल’शी साम्य असलेल्या ग्रुप कॅप्टनपदी हवाई दलातर्फे निवड, तसेच २००१ साली विस्डेनकडून कसोटीत सर डॉन ब्रॅडमननंतरचा आणि वनडे क्रिकेटमध्ये सर व्हीव्हीएन रिचर्डस् यांच्यानंतरचा दुसरा सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून गौरव. जागतिक क्रिकेट क्षेत्रात सचिनने प्राप्त केलेला हा ‘महागौरव’ या विक्रमादित्याला विद्यमान क्रिकेटपर्वातील एक महान क्रिकेटपटू बनवितो. विश्‍वविक्रमी क्रिकेट पर्वाची निर्मिती करूनही त्याने एक आदर्शवत आणि शिस्तबद्ध खेळाडू अशीच आपली प्रतिमा राखली. आपला तोल कधीही ढळू दिला नाही की यशाची धुंदी डोक्यात चढू दिली नाही. म्हणूनच तर ‘तेंडुलकरी महिमा वर्णावा किती’ असेच पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते.

२४ एप्रिल १९७३ साली मुंबईत दादर येथील निर्मल नर्सिंग होममध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला हा सचिन भविष्यात क्रिकेट विश्‍वात स्वतःचे महानत्व आणि असामान्यत्व निर्माण करील अशी कुणी कल्पनाही केली नसेल. साहित्य सहवासच्या चार भिंतीआड सचिनचे प्रारंभिक बालपण गेले. बांद्रा (पूर्व) येथील साहित्य सहवास गृहनिर्माण सोसायटी हे त्याचे बालपणीचे निवासस्थान. येथून जवळच असलेले भारतीय शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल हे सचिनचे पहिले विद्यालय.
सचिनचे वडील रमेश तेंडुलकर प्रसिद्ध मराठी साहित्यिक. मुलगा सचिनही आपल्याच पावलाने पुढे येईल अशी अपेक्षा त्यांनी बाळगली होती. पण घराण्यात क्रीडासंस्कृतीचा अंशही नसताना दृढनिश्‍चयी सचिन क्रिकेटविश्‍वाचा ‘विक्रमादित्य’ सिद्ध झाला. वडीलबंधू अजित तेंडुलकर यांनी १९८४ साली म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी त्याला क्रिकेटच्या अमर्याद बंधनात अडकविले. दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर त्याचे क्रिकेटगुरू रमाकांत आचरेकर यांच्याशी त्याचा परिचय झाला.
सचिनच्या फलंदाजी-तंत्राने प्रभावित झालेल्या सर आचरेकरांनी ‘लिटल मास्टर’ला दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरच्या इंग्लिश विद्यालयात भरती होण्याचा सल्ला दिला. सर्वोत्तम क्रिकेट संघाच्या निर्मितीत या विद्यालयाची आघाडीच्या संघांत गणना व्हायची. सचिन स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये चमकावा, त्याच्या प्रतिभेला बहर यावा या मुख्य उद्देशाने गुरू आचरेकर यांनी हा सल्ला दिला होता. याशिवाय भारतीय क्रिकेटसाठी या विद्यालयाचे योगदानही उल्लेखनीय होते. सचिनने या गुरूमंत्राचा सन्मान राखताना सकाळ-सायंकाळ गुरू आचरेकरांच्या नेट्‌समध्ये प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ केला.
सचिनच्या तंत्रशुद्ध कौशल्यावर गुरू आचरेकर फिदा झाले होते. मधून एखादप्रसंगी ते सचिनच्या अभेद बचावाची चाचणीही घ्यायचे. त्याला नेट्‌समध्ये फलंदाजी करायला लावून स्टंपवर एका रुपयाचे ते नाणे ठेवत. गोलंदाजांना चेंडू टाकण्यास सांगत. यात सचिनची विकेट घेण्यात यश मिळाले तर ते नाणे त्या गोलंदाजाला मिळे. पण गोलंदाज अपयशी ठरला तर निश्‍चितच ते नाणे सचिनच्या खिशात जाई. अशा प्रकारे सचिनने अखेरीस तेरा नाणी प्राप्त करून आपले क्रिकेट भवितव्य उज्ज्वल असल्याचे सरांना दाखवून दिले. ही तेरा नाणी आजही सचिनने सन्मानाने सांभाळली आहेत.
शारदाश्रम विद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना सचिन माटुंगाच्या गुजराती सेवा मंडळ चषक स्पर्धेत नियमित खेळला. याशिवाय जॉन ब्राईट क्लबतर्फे खेळताना त्याने मुंबईतील प्रेसिडेंट क्लब क्रिकेट स्पर्धा, कांगा लीग व क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या स्पर्धांतूनही बर्‍यापैकी चमक दाखविली. क्रिकेटमधून उज्ज्वल भवितव्य साकारण्याची त्याची उमेद आता मोठ्या प्रमाणात जागली होती. पण वेगवान गोलंदाज बनून फलंदाजांची त्रेधा उडविण्याचे स्वप्नही तो सतत बघायचा. बालमनातील याच विचाराने त्याला वयाच्या १४ व्या वर्षी तत्कालीन मद्रास आणि आजचे चेन्नई येथील स्थित एमआरएफ पेस अकादमीपर्यंत नेले. ऑस्ट्रेलियाचे महान स्विंग गोलंदाज सर डेनिस लिली या अकादमीचे प्रमुख असल्याने सचिनने नेट्‌समध्ये वेगवान गोलंदाजी करून त्यांना प्रभावित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सचिन प्रथमच निराश झाला, पण सर लिली यांनी त्याच्या फलंदाजीची मुक्तकंठाने प्रशंसा केल्याने त्याच्या चेहर्‍यावर सुहास्य खेळले. सर लिली यांनी त्याला निव्वळ फलंदाजीवरच पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा जो सल्ला दिला तो त्याने सन्मानाने स्वीकारला.
१९८७ च्या भारतीय उपखंडातील रिलायन्स विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात दिसला. पण येथे तो खेळाडू मुळीच नव्हता, तर मुंबईतील भारत-इंग्लंड सामान्यात हा बालक्रिकेटर सीमापार ‘बॉलबॉय’चे काम करण्यात भलताच व्यस्त होता. १९८८ सालचा क्रिकेट मौसम सचिनने आपल्या प्रेक्षणीय खेळांनी गाजवला.
या मोसमात खेळलेल्या जवळपास प्रत्येक डावात त्याने शतकी खेळी साकारून फलंदाजीतील आपल्या श्रेष्ठ तंत्राची झलक पेश केली. त्याचे शतकी डाव पाहण्यासाठी क्रिकेट रसिक गर्दी खेचू लागले. याच वर्षी मुंबईतील लॉर्ड हॅरिस आंतर-शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट झेव्हियर्सविरुद्ध खेळताना सचिनने आपला परम मित्र विनोद कांबळीच्या जोडीने विक्रमी ६६४ धावांची भागीदारी करून शारदाश्रम विद्यालयासाठी वैयक्तिक ३२६ धावांची नाबाद त्रिशतकी खेळी साकारली.
सचिनच्या या अद्भुत पराक्रमाने शालेय तथा देशी क्रिकेटमध्ये एकच सनसनाटी पसरली. शिवाय या स्पर्धेत त्याने एकूण हजार धावांचा विक्रमी टप्पाही सहजतेने पार केला. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे १९८७ साली सचिनला मुंबईतर्फे रणजी पदार्पणाची संधी चालून आली होती. पण ऐनवेळी त्याला अंतिम अकरात स्थान देण्याचे धाडस संघव्यवस्थापनाने केले नाही. पण गप्प बसला तर तो ‘विक्रमादित्य’ कसला? सचिनने पुढील मोसमात चोख प्रत्युत्तर देताना गुजरातविरुद्ध थाटात चमकदार नाबाद शतक ठोकून रणजीत पदार्पण केले. रणजी पदार्पणात शतक ठोकणारा सर्वांत युवा भारतीय फलंदाज बनण्याचा बहुमानही त्याने प्राप्त केला.
१९८८ साली न्यूझिलंड क्रिकेट संघ भारत दौर्‍यावर असताना त्यांचा एक सामना मुंबईत आयोजिण्यात आला होता. या प्रसंगी विक्रमवीर कपिलदेव निखंज यांची तेज गोलंदाजी मुंबईच्या नेट्‌समध्ये खेळण्याची संधी सचिनला लाभली. ‘कर्नल’ दिलीप वेंगसरकर बारकाईने ‘लिटल मास्टर’च्या फलंदाजी तंत्राची चाचपणी करीत होते. आणि काय आश्‍चर्य? या लिटल मास्टरने कपिलची तेज गोलंदाजी सहजतेने खेळून काढताना चौफेर फटकेही लगावले.
१९८८-८९ च्या क्रिकेट मौसमात या ‘वंडरबॉय’ने मुंबईतर्फे सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम रचला. १९८९-९० च्या मोसमात शेष भारतातर्फे दिल्लीविरुद्ध खेळताना त्याने शतकी पारी खेळून आपल्या धावांचा धबधबा कायम ठेवला. १९९२ साली इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्याचे निमंत्रण त्याला यॉर्कशायरकडून प्राप्त झाले. या संघासाठी करारबद्ध झालेला तो पहिला परदेशी खेळाडू ठरला आणि या संधीचा सुयोग्य लाभ घेताना सचिनने इंग्लंडच्या धरतीत १६ सामन्यांतून हजार धावांचा टप्पा सर केला. त्याने एकूण १०७० धावांची नोंद केली.
१९८९ साली अवघा एकच रणजी मोसम खेळून सचिनने आपले कारकिर्दीतील महान ‘लक्ष्य’ साधले. १६ वर्षे व २२३ दिवस या कोवळ्या वयात सचिनची पाकिस्तान दौर्‍यासाठी भारतीय संघात वर्णी लागली याचे बरेचसे श्रेय बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांना द्यावे लागेल. ऐन भरातील पाकचे वेगवान गोलंदाज त्रिकूट कप्तान इम्रान खानसह वासिम अक्रम आणि वकार युनूस यांच्या तीक्ष्ण मार्‍याला सचिन व्यवस्थित सामोरा जाईल का? अनेक क्रिकेटतज्ज्ञ याच विवंचनेत होते.
कसोटी पदार्पणात सचिन अवघ्या पंधरा धावांवर बाद झाला. पूर्ण मालिकेतही तो अधिकतर धावा फटकावू शकला नाही. सियालकोटच्या चौथ्या कसोटीत वकारने त्याला ‘टार्गेट’ करताना शरीरवेधी वेगवान गोलंदाजी करण्यावर भर दिला. असाच एक तेजतर्रार बाऊंसर सचिनचा बचाव भेदून त्याच्या नाकावर आदळला. पण धैर्यशील सचिनने कोणतेही वैद्यकीय उपचार न घेता आपला डाव कायम ठेवला.
पेशावरच्या प्रदर्शनीय सामन्यात सचिनने तत्कालीन सर्वोत्तम लेगस्पिनर अब्दुल कादिरची गोलंदाजी झोडपून काढताना षटकात २७ धावा फटकावताना अवघ्या १८ चेंडूत ५३ धावांची खणखणीत खेळी केली. जागतिक क्रिकेट क्षेत्रातील विविध क्रिकेट राष्ट्रांसाठी हा जणू धोक्याचा इशाराच होता. मिस्टर जिनियसने या दौर्‍यात ३५.८३ च्या सरासरीने एकूण २१५ धावा केल्या. पुढील न्यूझिलंड दौर्‍यात त्याने एकूण ११७ धावा फटकावताना सर्वोच्च ८८ धावांची खेळीही साकारली. १९९० चा इंग्लंड दौरा मिस्टर जिनियससाठी स्मरणीय ठरला. ओल्ड ट्रॅफोर्ड कसोटीत नाबाद ११९ धावांची शतकी खेळी करणारा सचिन असा पराक्रम करणारा जागतिक क्रिकेटमधील अवघा दुसरा सर्वांत युवा क्रिकेटपटू सिद्ध झाला. या शतकी खेळीत त्याने बॅकफूटवरून ऑफकडे फटकावलेले चौकार डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
पाच फूट पाच इंच उंचीचा हा ‘महान’ क्रिकेटपटू जणू क्रिकेटीय पराक्रमांसाठीच जन्मला असावा. १९९२ सालच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात मर्व्ह ह्युज, ब्रुस रिड आणि क्रेग मॅक्‌डरमॉट या नावाजलेल्या वेगवान त्रिकुटाचा सचिनने पूर्ण एकाग्रतेने सामना करून सिडनीत नाबाद १४८, तर पर्थच्या सर्वात वेगवान ट्रॅकवर ११४ धावांची शतकी खेळी रचली.
१९९४ साली न्यूझिलंड दौर्‍यात ऑकलंडमध्ये त्याच्यावर सलामीला खेळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. भारतात या दिवशी ‘होळी’चा सण असताना सचिनने किविज गोलंदाजांची ‘होळी’ करताना अवघ्या ४९ चेंडूंत आकर्षक ८८ धावा फटकावल्या. मात्र वनडेतील पहिले शतक ठोकण्यासाठी त्याला ७९ सामन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली, हे एक आश्‍चर्यच. १९९६ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत त्याने दोन शतकांसह सर्वाधिक धावा फटकावल्या. १९९८ सालचा कांगारूंचा भारत दौरा त्याने ठोकलेल्या सलग तीन शतकांनी गाजला. त्यापुढच्या शारजा येथील स्पर्धेतही त्याने पुन्हा एकदा सलग दोन शतके ठोकून आपला दरारा कायम राखला.
१९९८ सालच्या ढाका-बांगलादेश येथील आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेत त्याने स्वतःच्या कर्तबगारीने भारताला एकहाती विजेतेपद मिळवून दिले. याच वर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील ब्रिस्बेन कसोटीत द्विशतकी विक्रम साजरा करताना त्याने नाबाद २०४ धावांची खेळी केली. ही खेळी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील काही सर्वोत्तम खेळींपैकी एक असल्याचे तो मानतो. १९९९ साली इंग्लंडमधील विश्‍वकरंडक स्पर्धेदरम्यान त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचे देहावसान झाले. हा त्याला बसलेला जबर धक्काच होता. पण क्रिकेटवरील अतोनात प्रेमाने त्याला क्रिकेटपासून दूर केले नाही. याच वर्षी पाठदुखीच्या समस्येने त्याला बरेच हैराण केले, पण तरीही त्याने स्पर्धात्मक क्रिकेटपासून स्वतःला दूर होऊ दिले नाही.
एप्रिल २००० साली रणजी क्रिकेटमधील अंतिम फेरीत एका सर्वोत्तम द्विशतकी खेळीची (नाबाद २३३) नोंद करणारा मि. जिनियस हे भारतीय क्रिकेटचे म्हणूनच ‘महारत्न’ ठरावे. २००३ सालच्या दक्षिण आफ्रिकेतील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मि. जिनियस सचिनने ‘स्पर्धावीर’ पुरस्कार पटकावताना ११ सामन्यांतून सर्वाधिक ६७३ धावा फटकावण्याचा विक्रम रचला.
वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केलेला तो पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला. विश्‍व क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी, लिस्ट-ए, कसोटी, वनडे, टी-२० अशा स्वरूपाच्या सर्व स्पर्धांतून सरासरी ५०,००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो जगातील १६ वा आणि पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. त्याची फलंदाजी जेवढी तंत्रशुद्ध तेवढीच उपयुक्त त्याची गोलंदाजी. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, गुगली अशी मिश्रित मंदगती गोलंदाजी करून कसलेल्या फलंदाजांना बाद करण्यात त्याने अनेकदा यश मिळवलेय. अफाट बुद्धिमत्ता लाभलेला हा खेळाडू फलंदाजीच्या आघाडीवर यशस्वी ठरलाच, पण कप्तानपदाच्या भूमिकेत मात्र तो अपेक्षित परिणाम देऊ शकला नाही.
एकूण सहा विश्‍व करंडक स्पर्धांत खेळण्याचा बहुमान त्याने मिळवला. वनडेत १८,४२६ (४८ शतके) आणि कसोटीत १५,८२५ (१९९ कसोटीपर्यंत) मिळून ९९ शतके आणि एकूण शंभर शतकांची नोंद करणारा सचिन जागतिक स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये अशी अद्भुत कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरतो. विक्रमादित्याचा हा विश्‍वविक्रम भविष्यात कुणी पार करू शकेल का? खुद्द त्यालाच हा प्रश्‍न विचारण्यात आला. मुंबईतील एका विशेष कार्यक्रमात यावर उत्तर देताना त्याने सरळ तेथे उपस्थित असलेल्या विराट कोहली आणि रोहीत शर्मा या टीम इंडियाच्या ‘यंग ब्रिगेड’चा उल्लेख केला. आपला विक्रम या दोघांपैकी एकाने पार करावा असे आपल्याला वाटते असे वैयक्तिक मत त्याने मांडले.
हा ‘विक्रमादित्य’ किमान हा मोसम तरी मुंबई रणजी संघासाठी उपलब्ध व्हावा अशी मुंबई क्रिकेट असोसिएशनची इच्छा आहे. पण २०१२ साली वनडेमधून आणि मे २०१३ साली आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारलेल्या सचिनने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील वैयक्तिक २०० व्या कसोटीनंतर निवृत्तीची घोषणा केलेलीच आहे. त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटचा दीर्घ पडाव येथे संपुष्टात येत असला तरी यंदाचा रणजी मोसम खेळावा अथवा नाही यासंदर्भात कदाचित तो फेरविचार करीलही. या ‘महान’ क्रिकेटपटूची दुसरी पिढी अर्जुन तेंडुलकर याच्या स्वरूपात आकार घेऊ लागलीय. शालेय क्रिकेटमध्ये ‘अर्जुन’ उत्तम अष्टपैलू योगदान देत आहे. सचिन ‘विश्‍वविक्रमवीर’ ठरला मग अर्जुनने खर्‍या अर्थाने ‘अर्जुन’ का होऊ नये? सचिनला भावी आयुष्यासाठी सदिच्छा!