29 C
Panjim
Saturday, March 6, 2021

बायोस्कोप मुखवटे आणि मुखवटे

  • प्रा. रमेश सप्रे

कोरोना- कोविडचे मास्क जातीलही. पण हे मुखवटे? पूर्वी नाट्यरंगमंचावर असलेले लोकांचं मनोरंजन जे मुखवटे करायचे, ते आज जीवनाच्या रंगमंचावर नित्याचे बनलेले आहेत. इतके की कोरोनाचा मास्क नकोसा होऊन हनुवटीला घालता येतो, नव्हे घातला जातो, पण या खर्‍या (खरं तर) खोट्या मुखवट्यांचं काय?

एक अतिशय मार्मिक प्रसंग. रामायणातला. ढाराढूर झोपेतून महत्प्रयासानं उठवलेला कुंभकर्ण रावणाला सल्ला देतो. ‘सीतेला वश करायचंय ना? मग त्या विद्युत्‌जिव्हाला बोलाव ना. तो जिवंत मुखवटे तयार करतो. अगदी हुबेहूब! त्याला रामाचा मुखवटा करायला सांग. राम कसा दिसतो हे भगिनी शूर्पणखा सांगेलच. तो मुखवटा घालून सीतेकडे जा. तू दूर असतानाच सीता स्वतः ‘नाथ!’ म्हणत तुझ्याकडे धावत येईल.’
हे सारं ऐकून घेतल्यावर मेघगर्जनेसारखा रावण गरजला- ‘मूर्खा, तुला काय वाटतं, मी हा प्रयोग करून पाहिला नाही? पण काय घडलं माहीत आहे? तो रामाचा मुखवटा एवढा जिवंत होता की रामाचे गुणही त्यात उतरले आणि सीतेच्या ठिकाणी मला सीतामाई दिसू लागली. आपल्या आईचंही दर्शन घडलं. मग काय? मी गेल्या पावली परत आलो.’.. त्या सजीव मुखवट्याच्या डोळ्यात रामाची मातृमंगल दृष्टी प्रकट झाली होती.

म्हणजे मुखवट्यालाही भावना असू शकतात. नव्हे मुखवट्यातून भावभावना व्यक्त करता येतात. कथ्थक नर्तकांचे मोठे मोठे मुखवटे आठवा. नाहीतरी मुखवट्याला जसा ‘मास्क’ हा इंग्रजी शब्द आहे तसाच ‘पर्सोना’ हाही शब्द आहे. ग्रीक नाटकातली पात्र आपापल्या स्वभावानुसार मुखवटे घालून रंगमंचावर येत. राक्षस, भुतं, खलनायक किंवा खलनायिका यांचे मुखवटे त्यांच्या नाटकातील व्यक्तिमत्वानुसार, स्वभावानुसार बनवलेले असत. व्यक्तिमत्त्वासाठी पर्सनॅलिटी हा शब्द असाच बनलाय.
याचा एक अर्थ इतरांशी वागताना, समाजात विविध व्यवहार करताना आपण अनेकदा मुखवटे घालूनच वावरतो. ‘दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं’. ‘चकाकतं ते सर्वच सोनं नसतं’. अशा म्हणीतून हाच आशय व्यक्त होतो. असो.

‘कोरोना – कोविड’ संदर्भात जे मास्क वापरले जातात त्यांना मुखवट्यासारखा ‘मुखावरण’ हा शब्दही वापरतात. पण ‘मास्क’ शब्द सार्वभाषिक बनलाय.
परवा मजेदार प्रसंग घडला. एका किणकिणणार्‍या (किनर्‍या नव्हे तर मंजूळ) आवाजात दुकानदाराला विचारलं गेलं, ‘काका, तुमच्याकडे ‘मॅचिंग मास्न्स’ आहेत?’ तत्परतेनं ‘हो, आहेत ना.’ असं म्हणताना निरनिराळ्या रंगांचे, नक्षी असलेले, आकार असलेले मास्न्स दाखवले गेले. प्रत्येक गठ्‌ठ्यात सात- सात मास्क होते. कशासाठी.. तर आठवड्याच्या सातही दिवशी घातल्या जाणार्‍या वेशभूषांना मॅचिंग होतील असे मास्क. याला सौंदर्यदृष्टी म्हणायची की रसिकता म्हणायची की एक क्रेझ, फॅशन समजायची ते तुम्हीच ठरवा.
त्याचवेळी मास्कची खासीयत असलेल्या त्या दुकानात एक प्रौढ महिला आली. तिनं काळे कपडे घातले होते. जवळची नातलग व्यक्ती गेल्यावर वर्षभर किंवा काही काळ शोक व्यक्त करण्यासाठी (मोर्निंग) असे कपडे वापरतात. तिची मागणीही तीच – काळ्या रंगाचे निरनिराळ्या आकार- प्रकारचे मोर्निंग मास्क तिला हवे होते. ऐकून जरा विचित्र वाटलं.

शोकावेग आणि शोकवेग यांची संगती काही लागेना पण विशेष म्हणजे त्या महिलेनं जो काळा वेश घातला तोही फॅशनेबल होता. जाळीदार झालर, आकर्षक घड्या (प्लीट्‌स) असा तो करंट ट्रेंडी ड्रेस होता. तोही डिझायनर ड्रेस!
हा खरा मुखवटा. दुःखाचं नाटक नि शोकाचं प्रदर्शन!
गंमत म्हणजे दुकानात काळ्या रंगाचेही विविध रचना, आकार, नक्षी असलेले मास्क होते. असो.
आपल्यासमोर ठेवलेला रेकॉर्डर पाहून एका सत्पुरुषानं विचारलं, ‘हे काय आहे? इथं कशाला ठेवलंय?’ यावर उत्तर आलं, ‘आपलं प्रवचन रेकॉर्ड करण्यासाठी हे यंत्र ठेवलंय.’ सत्पुरुष एकदम उद्गारला, ‘आमचं आत एक, बाहेर एक किंवा आत्ता एक, नंतर एक असं नसतं. उघड्या पुस्तकासारखं असतं आमचं जीवन’. याचा अर्थ आम्ही अंतर्बाह्य सच्चे असतो. मुखवटे घालत नाही. घालावेही लागत नाहीत.’

जगता येईल का सर्वांना असं? हे जमलं तर जग बर्‍यापैकी शांत होईल. नातेसंबंध प्रामाणिकपणाच्या पायावर आधारले जातील. प्रेमाचं, सौहार्दाचं वातावरण निर्माण होईल. स्वार्थ, खरी किंवा खोटी सामाजिक प्रतिष्ठा, महत्त्वाकांक्षा, अतिरिक्त स्पर्धा, हेवेदावे, मत्सर हे सारं मुखवट्यांच्या जगाच्या मुळाशी असतं.
मुखवट्यांचीही आवश्यकता असते. आपण जसे असतो तसे जगाला दिसू नये. जगाला- समाजाला जे आदर्श वाटतं तसं दिसावं हे मुखवट्यामागचं मानसशास्त्र आहे. पण ‘मुखवटे’ घालून वावरणं ही आपली मानसिकता (माइंड सेट) बनू नये यासाठी आपल्या भावना, मनात दडपलेले विचार, कल्पना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक धर्मानं, संस्कृतीनं विशेष व्यवस्था केलेली आहे. उदा.- आपल्याकडे शिमग्याची बोंब, धुळवडीतली मस्ती, रंगपंचमी (होली)ची मजा हे सण समारंभ मुद्दाम तयार केलेयत. प्रतिष्ठित मंडळींना एखादा दिवस मनमुक्तपणे वागता यावं, मनमुराद जगता यावं यासाठी ही व्यवस्था आहे.

ख्रिस्ती लोकांचा कार्निव्हल, किंग मोमोचं स्वैराचाराचा परवाना देणारं राज्य ही अशीच देहाला, भोगांना धरून असलेल्या खालच्या पातळीवरील वासना, इच्छा यांची पूर्ती करण्यासाठी केलेल्या योजना आहेत. वर्षाच्या अखेरीस मुखवटे घालून, विदुषकी टोप्या (क्लाउन कॅप्स) घालून केलेली समूह नृत्यं (बॉल डान्स) हे प्रकारही एका अर्थी माध्यमं असतात आपल्या निसर्गदत्त (नैसर्गिक) प्रेरणा व्यक्त करण्यासाठी.
कोरोना – कोविडचे मास्क जातीलही. पण हे मुखवटे? पूर्वी नाट्यरंगमंचावर असलेले लोकांचं मनोरंजन जे मुखवटे करायचे, आज जीवनाच्या रंगमंचावर नित्याचे बनलेले आहेत. इतके की कोरोनाचा मास्क नकोसा होऊन हनुवटीला घालता येतो, नव्हे घातला जातो, पण या खर्‍या (खरं तर) खोट्या मुखवट्यांचं काय?
आपण स्वतःला सांगू या… मी मला ‘अनमास्क’ करीन. काही मुखवटे तरी फेकून देईन.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आमोण्याची ज्ञानगंगा ः रामदास विद्यालय

डॉ. विठ्ठल ठाकूर त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक...

शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य

चेतन कवळेकर(राज्यपुरस्कारप्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षक) शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक...

एक अगम्य चाहता… कधीच न भेटलेला!

ज. अ. रेडकर. मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती...

गूढ वाढले

जगातील आठव्या क्रमांकावरील आणि आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ ह्या सत्तावीस मजली आलिशान निवासस्थानापासून पाच - सहाशे मीटरवर...

सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी...

ALSO IN THIS SECTION

पित्तशामक ‘लिंबू’

डॉ. मनाली म. पवारसांतईनेज-पणजी लिंबू तसा सर्वांनाच परिचित आहे, पण तरीही लिंबाचे योग्य गुणधर्म व उपयोग माहीत असणे...

आयुर्वेद आणि स्वयंपाक पद्धत

वैद्य स्वाती अणवेकर एखादा पदार्थ हा केळीच्या पानात किवा मग मातीचे आवरण लावून चुलीमध्ये भाजला जातो. असे केल्याने...

तत्त्वज्ञान समजून आचरण करावे योगसाधना – ४९५ अंतरंग योग – ८०

डॉ. सीताकांत घाणेकर जीवनाची गमावलेली खोली प्राप्त करण्यासाठी मानवाने प्रतीकांची उपासना केली पाहिजे. त्यांच्यामागे लपलेला दिव्य अर्थ समजून...

त्रिफळा ः महा, अमृततुल्य औषध

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) त्रिफळा हे फक्त बद्धकोष्ठतेचे औषध नसून त्याचा उपयोग अगदी केसांपासून ते पायांपर्यंत होतो,...

॥ बायोस्कोप ॥ ऑन् लाइन्… ऑफ् लाइन् …

प्रा. रमेश सप्रे शिक्षकांनी विचार करायला हरकत नाही, ‘आपण विद्यार्थ्यांसाठी फक्त एक रेघ आहोत, रेषा? जस्ट् अ लाईन?...