बायणात महिलेची हत्या

0
20

संशयित आरोपीस मुरगाव पोलिसांकडून तात्काळ अटक

बायणा येथील नायक इमारतीमध्ये एका 64 वर्षीय महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल रविवारी दि. 21 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. बायणा-वास्को येथील नायक बिल्डिंगमध्ये हा प्रकार रविवारी दुपारी घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, महिरुन्निसा (64) या महिलेचा मृतदेह त्यांच्याच तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने अनेक वार करुन त्यांची हत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिरुन्निसा या एकट्याच राहत होत्या. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली जात आहे. हत्येमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली आहे की, यामागे वैयक्तिक वैमनस्य आहे, याचाही पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दार ठोठावत असल्याबद्दल सदर महिलेने जाब विचारल्यामुळे हा प्रकार घडला असा कयास आहे. संशयित व्यक्ती या इमारतीच्या गच्चीवर जाऊन विनाकारण दरवाजा ठोठवत रहिवाशांना हैराण करत होती. मैहरुन्निसा यांनी सदर संशयिताला जाब विचारत पोलिसांना बोलावण्याचा इशारा दिला होता. मुरगाव पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.