आरोग्याच्या कारणामुळे नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या खात्याच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.
कचरा समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे आणखी जागा शोधणे शक्य नाही. वारसा स्थळापासून प्रकल्पाची जागा बरीच दूर, म्हणजे सुमारे ७०० मिटर अंतरावर आहे. त्यामुळे वारसा स्थळांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे पर्रीकर यांनी सांगितले. सतरा क्रमांकाचा महामार्ग स्वच्छ करण्याची मोहीम बर्याचप्रमाणावर यशस्वी झाली आहे. मे अखेरपर्यंत या मार्गावर लोकांनी कचरा टाकू नये म्हणून पोलिसांना गस्ती घालण्यास सांगणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रस्त्यालगत हेल्मेट विकणार्यांवर बंदी
रस्त्याच्या बाजूला बसून हेल्मेट विकणार्यांवर बंदी घालण्यात येणार असून भाजी व फळे विकणार्यांना तात्पुर्ती मान्यता दिली आहे. परंतु त्यांना तेथे झोपड्या उभारता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही ठिकाणी प्रकल्प उभारल्यास विरोध करणारे असतातच, असे ते म्हणाले.
डिसेंबरपर्यंत शहरातील भंगार अड्डे हटवणार
कोणत्याही परिस्थितीत रस्त्याच्या बाजूला तसेच शहरी भागात असलेले भंगार अड्डे डिसेंबरपर्यंत काढून टाकणार असून बेकायदेशीरपणे अड्डे उभारणार्यांवर कारवाई करून तीन वर्षांसाठी तुरुंगात पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी सर्व आमदारांना त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शहरे बकाल होऊ लागल्याचे पर्रीकर म्हणाले. डिसेंबरपर्यंत सर्वच प्रश्नांवर उपाय शोधून काढण्याचे प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांच्या काळात पालिका मंडळांना ३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. परंतु हवा तसा वापर झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.
औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रमात बदल घडविण्याची सरकारची तयारी असून आयटीआयमधील विद्यार्थ्यांचे विशेष कौशल्य विकसीत करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सचिवालय, उच्च न्यायालय
परिसराचा पणजीत समावेशाचा विचार
पर्वरी येथे मंत्रालय असल्याने सचिवालय व उच्च न्यायालयाची इमारत असलेला भागाचा समावेश पणजीत करण्याचा आपला पूर्वीपासूनच विचार होता. मेपर्यंत हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. सांत आंद्रेचे आमदार विष्णू सुर्या वाघ यांनी यासंबंधिचा विषय उपस्थित करून मंत्रालय राजधानीतच असते, असे सांगितले होते. विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी संपूर्ण पर्वरी भागाचाच पणजीत समावेश करण्याची सूचना केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पर्वरीच्या आमदारांची तयारी असल्यास त्यावरही विचार करणे शक्य असल्याचे सांगितले.

