बायंगिणी जुने गोवे येथील एका बोगस कॉल सेंटरचा गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने पर्दाफाश केला असून, 7 जणांना अटक केली आहे. या कॉल सेंटरमधून ‘पेडे’ नावाच्या बनावट कंपनीचे कर्ज एजंट असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात होती.
सायबर गुन्हा विभागाने 12 डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी या बोगस कॉल सेंटरवर छापा घातला. पोलिसांनी सहा लॅपटॉप आणि चार मोबाईल फोन जप्त केले.
या बोगस कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना कर्ज आणि तात्काळ पैशांचे खोटे आश्वासन देऊन सेफोरा, मेसी, ग्रीन डॉट मनी पॅक, ॲपल गिफ्ट कार्ड, रेझर गोल्ड आणि एक्सबॉक्स सारख्या गिफ्ट कार्डाद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे देण्यास प्रवृत्त करून त्यांची फसवणूक केली जात होती. या प्रकरणात हिमांशू सिंग चौहान (गुजरात), अभिषेक चौधरी (प.बंगाल), बासुदेव चक्रवर्ती (पश्चिम बंगाल), मोहसिनहुसेन मन्सुरी (गुजरात), स्वयंम पांडे (झारखंड), सय्यद साकिब (झारखंड), विलास उतेकर (महाराष्ट्र) यांना अटक केली.