28 C
Panjim
Tuesday, September 22, 2020

बापूजींस….

 

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

बापूजी, तुमच्यावर आम्हा भारतवासीयांनी जीवापाड प्रेम केले. पण तुमच्या स्वप्नांवर? याचे उत्तर नकारार्थीच. तुमचे जीवनादर्श तुमच्या जाण्यानंतर या देशातून निघून गेले. साधनशुचितेची चाड कुणालाच राहिली नाही. सत्तेची चटक सगळ्यांनाच लागली. स्वातंत्र्य मिळून एकोणसत्तर वर्षे झाली, पण अन्न, वस्त्र आणि निवारा याबाबतीत आम्हाला अजूनही स्वावलंबी होता आले नाही. आपला राष्ट्रीय आत्मा जोपर्यंत तुम्ही बाळगलेल्या स्वप्नांच्या ध्यासाने भारावला जात नाही, तोपर्यंत राष्ट्र स्वाश्रयी होणार नाही.

 

आदरणीय बापूजींस,
सविनय प्रणाम.
२ ऑक्टोबर १८६९ रोजी तुम्ही पोरबंदरला जन्मलात. भारतभूमीचे थोर सुपुत्र अशी प्रतिमा तुम्ही स्वकर्तृत्वाने निर्माण केली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तुमचा जन्म झाला. त्यालाही आता एकशे सत्तेचाळीस वर्षे लोटली. पण कालपटलावरील आपली तेजस्वी मुद्रा अजूनही कायम आहे. तुमच्या जन्मकाली स्वातंत्र्याचा लढा देशात वेगवेगळ्या मार्गांनी चाललेलाच होता. ठिणग्या उसळत होत्या. पण स्फुल्लिंग प्रज्वलित झालेला नव्हता. लोकमान्य टिळकांच्या रूपाने या राष्ट्राला प्रारंभीच्या काळात खंबीर नेतृत्व लाभले. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर तुम्ही १९२० ते १९४७ या कालखंडात राष्ट्राचे नेतृत्व केले. विसाव्या शतकाच्या मध्यावधीपर्यंत स्वातंत्र्यसंग्रामाचे जे महाभारत निर्माण झाले त्याचे तुम्ही अध्वर्यू ठरलात. हे अंतिम पर्व होते. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. या कालावधीत तुमच्यासारख्या ऋषितुल्य आणि धीरोदात्त महापुरुषाच्या नेतृत्वामुळे सारा भारतवर्ष नव्या तेजाने झळाळला. सामान्यांतल्या सामान्य माणसाला तुम्ही या लढ्यात सामावून घेतले. त्याच्या आत्म्याला नवी जाग आणली. देशाचे स्वातंत्र्य हा तुमच्या जीवितकार्यातील एक टप्पा! दरिद्रीनारायणाची सेवा हा दुसरा टप्पा. संपूर्ण मानवतेविषयीची कणव हा तुमचा ध्यास. अंतःप्रेरणेने स्वीकारलेले व्रत तुम्ही निर्धाराने पाळले. सत्य, अहिंसा आणि शांती या त्रयीवर अधिष्ठित असलेली विचारधारा स्वीकारून समर्पित वृत्तीने या लढ्यात उतरलात. आजच्या लोकशाहीच्या युगात तुम्ही स्वीकारलेल्या मार्गाविरुद्ध मते व्यक्त होऊ शकतात. मतभिन्नता हे लोकशाहीच्या जिवंतपणाचे लक्षण होय. पण तुमच्या प्रामाणिकपणाविषयी कुणीही शंका घेऊ शकणार नाही.
एकोणऐंशी वर्षांचे आयुष्य तुम्हाला लाभले. ते होते अखंडित भ्रमंतीचे, संघर्षमय. तरीदेखील ते विधायकतेचे आणि सृजनशीलतेचे कसे करता येईल याचा तुम्ही ध्यास घेतला. आपले जीवन हा अभिनव पुरुषोत्तम योग. भारतवासीयांच्या वाट्याला तो आला. ‘चंदनाचे हात, पायही चंदन’ ही तुकारामांची उक्ती तुम्हाला तंतोतंत लागू पडते. दधिची ऋषीने देवदानवांच्या युद्धात देवांचा पक्ष स्वीकारून आपल्या अस्थीदेखील शस्त्रासाठी प्रदान केल्या अशी कथा सांगितली जाते. शेवटी ती प्रतीककथा आहे. आपल्या अंतरात्म्याला जागून आधुनिक काळात तुम्ही सत्‌सदृश्य कार्य केले म्हणून तर आल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या शास्त्रज्ञाने उद्गार काढले ः ‘‘जनरेशन्स टू कम विल स्कॅर्स बिलिव्ह दॅट सच ए वन् एज धिस एव्हर इन फ्लेश एण्ड ब्लड वॉक्ड अपोन धिस अर्थ.’’ (पृथ्वितलावर असा रक्ता-मांसाचा माणूस होऊन गेला यावर भावी पिढ्या क्वचितच विश्‍वास ठेवतील.)
१९६९ मध्ये तुमच्या जन्माची शताब्दी भारतवासीयांनी मोठ्या थाटात साजरी केली. त्यानंतरचा काळ सातत्याने नव्या आव्हानांचा, आर्थिक आघाडीवरील संकटांचा आणि वाढत्या विघटनात्मक शक्तींच्या उदयाचा होता. अशा या जटिल समस्यांच्या काळात तुमच्यासारख्या अहिंसेच्या पुजार्‍याची, साधनशुचितेचा मंत्र अंतर्यामी जोपासणार्‍या सात्त्विक वृत्तीच्या महामानवाची आठवण होणे हे अत्यंत स्वाभाविक. आताच्या काळात आणि येणार्‍या काळात तुमच्या विचारांचा प्रकाश हवा याची जाणीव आम्हाला व्हावी आणि कृतज्ञतेची भावना प्रकट करावी म्हणून तुमच्यासारख्या थोर राष्ट्रपुुरुषाशी हा सलगीचा संवाद.
बापूजी, ‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाने रे’ ही नरसिंह मेहता यांची रचना ही तुमची आवडती. तुमच्या समर्पित जीवनाला ती चपखल लागू पडणारी आहे. राष्ट्रप्रेमाची ज्योत १९२० च्या सुमारास प्रज्वलित केली. पण तुमच्या आयुष्यातील संघर्षपर्वाला त्याअगोदरच प्रारंभ झाला होता. १८९५ मध्ये भारतीयांना मताचा अधिकार असावा म्हणून दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या वतीने तुम्ही लढा सुरू केला होता. तेव्हापासून तुमच्या जीवनाची तेजोशलाका भारतभूमीत, अवघ्या विश्‍वात तळपत राहिली. १८९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेत भारतीयांच्या व्यापाराच्या अधिकारावर जाचक बंधने लादण्यात आली तेव्हा तुम्ही भारतीयांचे प्रतिनिधित्व करून अन्यायाला वाचा फोडली. शांतीचा पुरस्कार करणारे नेते अशी जनमानसांत तुमची प्रतिमा असली तरी तुमचे जीवन ही धगधगती ज्वाला होती. राष्ट्र तुमच्या पाठीशी उभे राहिले, कारण अन्यायाच्या परिमार्जनासाठी प्रामाणिकपणे झुंजणारा देशभक्त तुमच्यामध्ये त्यांनी पाहिला. तुमची शस्त्रे निराळी होती. पण नाठाळ सत्तेला नमविण्यासाठी ती प्रभावी ठरली. १९०५ मध्ये बंगालची फाळणी झाली. वंगवासीयांच्या व्यथेशी समरस होऊन तुम्ही तीव्र निषेध नोंदविला. १९०६ मध्ये होमरूल चळवळीस पाठिंबा दिला.
आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार आला तो भारतीय परंपरेच्या दृढ संस्कारांमुळे. पण देशविदेशांतील प्रज्ञावंतांकडून विचारांची स्फूर्ती घेणे हा तुमचा स्थायिभाव. जॉन रास्किनच्या ‘अन टु दि लास्ट’ या ग्रंथाचा संस्कार तुमच्यावर झाला. टॉल्स्टॉय या महान रशियन प्रतिभावंताचा प्रभाव तुमच्यावर पडला. हेन्री डेव्हिड थोरो या अमेरिकन विचारवंताकडून तुम्ही संस्कार घेतले. आपल्या विचारांना नैतिक अधिष्ठान मिळवून दिले. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्यासारख्या नेत्याकडून तुम्हाला मार्गदर्शन लाभले.
तुमच्या समर्पित जीवनातील कोणकोणत्या घटना आठवाव्यात? आधुनिक भारताच्या इतिहासकारांनी गौरवाने त्या घटनांची नोंद घेतलेली आहे. इतिहासाच्या प्रवाहाला आपल्या कर्तृत्वाने गतिमानता प्राप्त करून देणारे, परिवर्तन घडवून आणणारे नेते म्हणून जग तुम्हाला ओळखते. तुमच्याविषयीची जी आत्मीयतेची आणि आदराची भावना त्यांच्या अंतःकरणात वसत आहे, ती भाबडेपणातून निर्माण झालेली नसून ती तुमच्या जीवनमूल्यांच्या निष्ठेमुळे, यात तीळमात्र शंका नाही. आयुष्य हे स्थंडिल मानून तुम्ही समिधा अर्पण करीत राहिलात.
१९१९ मध्ये जालियनवाला बाग येथे अमानुष्य स्वरूपाचे हत्याकांड झाले. त्याविरुद्ध तुम्ही जळजळीत निषेध व्यक्त केला. १९२० मध्ये सदनशीर व शांततामय मार्गाने स्वराज्य मिळविण्याच्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या ध्येयाचा उच्चार नागपूर अधिवेशनात केला. १९२१ मध्ये मुंबईला परदेशी कापडावर बंदी घालण्यासाठी अभूतपूर्व आंदोलन झाले. तुम्ही अग्रभागी राहून धीरोदात्तपणे या लढ्याचे नेतृत्व केले. भारतीयांच्या सामूहिक शक्तीचा प्रत्यय ब्रिटिश सत्तेला आला. १९३० मधील तुमच्या दांडीयात्रेचे विस्मरण भारतीयांना कसे होईल? ९ ऑगस्ट १९४२ ला ‘छोडो भारत’ या तुम्ही दिलेल्या मंत्रानुसार संपूर्ण देशात उग्र आंदोलन सुरू झाले. मुंबईच्या गवलिया टँकवर लक्षावधी लोक एकत्र आले. क्रांतिकारक हे यज्ञकुंड धगधगते ठेवून कार्यरत होतेच. आबालवृद्ध त्यात आपापल्या परीने आहुती टाकत होते. प्रत्येकाचे मार्ग भिन्न होते. पण सार्‍यांच्या ध्येयाचा ध्रुवतारा एकच होता. मातृभूमीचे स्वातंत्र्य हे त्यांचे एकमेव ध्येय होते. सार्‍यांच्याच पायतळी अंगार होता. या त्यागमय जीवनाला तात्त्विक अधिष्ठान मिळाले ते तुमच्या अष्टावधानी व्यक्तिमत्त्वामुळे. अखेर देश स्वतंत्र झाला, पण फाळणीचे दुःख घेऊन. ते सार्‍यांच्याच जिव्हारी लागले. हे पाहून तुमच्या मनाला अनंत यातना झाल्या. स्वातंत्र्योत्तर काळात धार्मिक विद्वेषाच्या अग्निज्वाला भडकल्या. त्या विझविण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न केला. पण त्यात तुम्हाला यश मिळाले नाही. अखेर तुम्हाला प्राणाहुती पत्करावी लागली.
बापूजी, या राष्ट्राच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या अंतिम पर्वाचे आपण साक्षीदार. शिवाय समांतरपणे राष्ट्राच्या अस्मितेला आकार देणारे तुम्ही कृतिशील विचारवंत हे तुमचे दुसरे विलोभनीय रूप. या देशाच्या कृषिसंस्कृतीचे महत्त्व ओळखून स्वावलंबी समाजाची उभारणी करण्याचे आवाहन तुम्ही सातत्याने करीत राहिलात. सर्वोदयाची कल्पना या देशात तुम्ही रुजविली. शिक्षणाविषयीच्या मूलभूत कल्पना मांडल्या. समाजातील दुबळ्या घटकांची सेवा करीत राहिलात. ‘आदर्श कर्मयोगी’ हे तुमचे दुसरे उदात्त स्वरूप सर्वांना भावले. तुमची सारी स्वप्ने या देशातील दीनदुबळ्या जनतेच्या अभ्युदयाभोवती गुंफलेली होती.
बापूजी, तुमच्यावर आम्हा भारतवासीयांनी जीवापाड प्रेम केले. पण तुमच्या स्वप्नांवर? याचे उत्तर नकारार्थीच. तुमचे जीवनादर्श तुमच्या जाण्यानंतर या देशातून निघून गेले. साधनशुचितेची चाड कुणालाच राहिली नाही. सत्तेची चटक सगळ्यांनाच लागली. स्वातंत्र्य मिळून एकोणसत्तर वर्षे झाली, पण अन्न, वस्त्र आणि निवारा याबाबतीत आम्हाला अजूनही स्वावलंबी होता आले नाही. आपला राष्ट्रीय आत्मा जोपर्यंत तुम्ही बाळगलेल्या स्वप्नांच्या ध्यासाने भारावला जात नाही, तोपर्यंत राष्ट्र स्वाश्रयी होणार नाही. गतिमान काळात तुमचे सगळेच विचार आम्हाला आज स्वीकारता येणार नाहीत हे खरे आहे; परंतु राष्ट्रीय संचिताचे मंथन करून विचारांचे जे नवनीत तुम्ही आम्हाला दिलेले आहे ते मौलिक स्वरूपाचे आहे. लक्षावधी खेड्यांमध्ये विभागलेला आपला समाज जोपर्यंत लोकशाहीतील मूल्यांच्या दीप्तीने उजळणार नाही, तोपर्यंत आपल्या स्वातंत्र्याला काही मूल्य राहणार नाही.
राष्ट्राच्या सुख-दुःखांशी समरस होऊन तुम्ही झटलात. येथील दरिद्री नारायणाचा वेष तुम्ही धारण केला. साधी राहणी पण उच्च विचारसरणी तुम्ही अंगीकारली. तुमची सारी शक्ती राष्ट्रपुरुषासाठी वेचताना सर्व प्रकारचे हलाहल पचविले. पण मनाचा समतोल ढळू दिला नाही. भगवद्गीतेतील अनासक्तीयोग तुम्ही आचरला. स्वातंत्र्य मिळालेले तुम्हाला पाहता आले, पण स्वातंत्र्यानंतरच्या नव्या भारताची वाटचाल तुम्हाला पाहता आली नाही.
बापूजी, तुम्ही केलेल्या असामान्य त्यागाबद्दल भारत सदैव कृतज्ञ राहील.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

ALSO IN THIS SECTION

युद्धसज्जता आणि मुत्सद्दीपणा

प्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...

गद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण

(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...

दिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल?

शशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार?...

अनलॉक

पौर्णिमा केरकर ‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो! ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा...

कावा

दत्ताराम प्रभू-साळगावकर अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’! आपण महत्त्वाचे निर्णय...