पोलिसांनी जादा कुमक आणली वा गस्त वाढविली तरी चोरट्यांनी दक्षिण गोव्यात आपला धुमाकूळ चालूच ठेवला आहे. काल पहाटे बाणावली व मडगाव येथे दोन चोरीच्या घटना घडल्या व चोरांनी एकूण ७ लाख रुपयांचा ऐवज पळविला.
बाणावली येथे सनसेट इमारतीतील श्रीमती मंगल दिलीप पांडे यांचा फ्लॅट फोडून रोख ५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ७ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. पहाटे ४ ते ६ या वेळेत चोरट्यांनी शिडी लावली व फ्लॅटच्या गॅलरीपर्यंत गेले. गॅलरीच्या ग्रील्स कापून फ्लॅटात प्रवेश केला. व कपाट फोडून सर्व दागिने पळविले. त्यावेळी घरातील मंडळी गाठ झोपेत होती. सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कोलवा पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदविली आहे.
दुसर्या घटनेत आके रेल्वे स्टेशनसमोर अजित मोहनलाल माजीतिया यांचे दुकान फोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना गस्तीवरील पोलिसांनी शिवा हनुमंत चव्हाण याला पकडून चोरी करण्यासाठी आणलेले सामान जप्त केले.