बाणस्तारी अपघात ः 2 कोटी जमा करा

0
8

>> न्यायालयाचा मेघनाला आदेश, दोन आठवड्यांची मुदत

बाणस्तारी येथे 6 ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीस कारगाडीची मालक मेघना सिनाय सावर्डेकर हिला अपघातात बळी पडलेले कुटुंब आणि जखमींना वैद्यकीय खर्चापोटी 2 कोटी रुपये दोन आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल दिला. मात्र, या रकमेचा अपघाताच्या मूळ भरपाईच्या रकमेवर जो निर्णय होईल त्यावर काहीही परिणाम होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

म्हार्दोळ पोलिसांनी बाणस्तारी येथील अपघातप्रकरणी चौकशीसाठी कारगाडीची मालक मेघना सावर्डेकर हिला नोटीस बजावली होती. या नोटीसला मेघना हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. न्यायालयात ही आव्हान याचिका बुधवारी सुनावणीला आली. या अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींचे कुटुंब आणि जखमींना मदत करण्याची मेघना सावर्डेकर हिची इच्छा आहे. न्यायालयाने रक्कम निश्चित करावी, असे मेघना हिच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने दोन कोटी रुपये दोन आठवड्यात जमा करण्याचा निर्देश दिला. ही रक्कम अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे कुटुंबीय आणि जखमींना दिली जाणार आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी येत्या 6 सप्टेंबर रोजी होणार आहे.

बाणस्तारी येथील भीषण अपघातात दिवाडी येथील सुरेश आणि भावना फडते हे दाम्पत्य, बांदोडा येथील अरुप करमाकर अशा तिघांचा बळी गेला. तर, वनिता भंडारी (सांताक्रूझ-फोंडा), शंकर हळर्णकर (बाणस्तारी), राज माजगावकर (ताळगाव) असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, फोंडा येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात मेघना हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.