बाणस्तारीतील भीषण अपघातात तिघे ठार

0
5

>> भरधाव मर्सिडीज कारची पाच वाहनांना धडक

>> अपघातात चौघे गंभीर जखमी

बाणस्तारी येथील पुलावर काल रविवारी रात्री 8 च्या सुमारास एका भरधाव मर्सिडीज कारने पाच वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार आणि 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारार्थ बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एका दुचाकीवरील सुरेश फडते (58) व त्यांची पत्नी भावना फडते (52) या दिवाडी येथील पती-पत्नीचा तसेच दुसऱ्या दुचाकीवरील अनुप करमाकर (28) या बांदोडा येथील युवकाचा मृत्यू झाला.

अपघातात जखमी झालेल्यांमधील वनिता भंडारी (21, सांताक्रुझ फोंडा), शंकर हळर्णकर (67, बाणस्तारी), राज माजगावकर (27, ताळगाव) हे गंभीर असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू
आहेत.

या अपघातात पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यात एक स्विफ्ट व दोन अल्टो कारसह दोन दुचाकींचा समावेश आहे. दुचाकीवरील तिन्ही व्यक्ती अपघातात बळी पडल्याची माहिती यावेळी स्थानिकांकडून देण्यात आली.
दरम्यान, हा अपघात घडल्यानंतर कारचालकाने कारमधून बाहेर पडून घटनास्थळावरून पलायन केले. तर स्थानिकांनी चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.

या अपघातामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी मर्सिडीज गाडी अपघात स्थळावरून बाजूला काढण्यास विरोध केला. अपघातानंतर सदर कारगाडीतील एकाने स्थानिकांशी असभ्य वर्तन केल्याची नागरिकांनी तक्रार केली. त्यामुळे सदर कारगाडीच्या मालकाला अपघातस्थळी आणण्याची नागरिकांनी मागणी लावून धरली. सदर मर्सिडीज गाडी एक महिला भरधाव वेगाने चालवत होती. तसेच, कारगाडीमध्ये मद्याच्या बाटल्याही होत्या, अशी माहिती स्थानिकांनी यावेळी दिली.

अपघातास कारणीभूत ठरलेली सदर आलिशान मर्सिडीज कार चुकीच्या दिशेने आल्याने हा अपघात झाला, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

स्थानिक नागरिक संतप्त
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. या अपघातामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. अशा आलिशान गाड्या अरुंद रस्त्यांवरून भरधाव व बिनधास्तपणे चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली. या अपघातामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मृतांत दांपत्य
या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांमध्ये एका दांपत्याचा समावेश असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दिवाडी येथील सुरेश फडते (58) व त्यांची पत्नी भावना फडते (52) यांचा या अपघातात मृत्यू झाला. अपघातादरम्यान कारच्या धडकेने एक व्यक्ती उसळून पुलाखाली पडली. ही महिला पुलाच्या खाली फेकली गेली मात्र सदर महिलेबाबत सुरुवातीला कुणाला काहीच माहिती नव्हती. स्थानिकांना एक महिला पुलाखाली पडल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांना तशी माहिती देण्यात आली. या अपघातातील एक दुचाकी दोन कारच्या मध्ये सापडल्याने दुचाकीचा चुराडा झाला.