३ शॅक्स, झोपडी व मच्छीमारी बोट भक्ष्यस्थानी; घातपाताचा संशय
बागा-कळंगुट येथे काल पहाटे सव्वासहाच्या सुमारास ३ शॅक्स, १ झोपडी आणि त्यात असलेल्या एका छोट्या मच्छीमारी बोटीला आग लागून सुमारे ८० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. हा घातपात असावा असा संशय आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केला आहे.बागा येथे आग लागल्याची माहिती म्हापसा, पिळर्ण व पणजी अग्निशामक दलाला मिळताच पिळर्ण दलाचे अधिकारी नामदेव धारगळरकर तसेच जवान भारत गोवेकर, समीर शेट्ये, प्रशांत सावंत, धनंजय वस्त तसेच म्हापसा अग्निशामक दलाचे जवान महादेव राऊत, ख्रिस्तोफर डिसौझा, नरेंद्र शेट्ये, विष्णू राणे, राया वाय. नाईक तसेच पणजीच्या जवानांनी मिळून तीन पाण्याचे बंब नेऊन ही आग विझविली.
या दुर्घटनेत निनिन डिसोझा, ऍन्ड्र्यु फर्नांडिस व ख्रिस्ती नायक, रॉक व डुमिंगो डिसौझा यांच्या झोपडीला आणि त्यात असलेल्या एका मच्छीमारी बोटीला आग लागून ८० लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले. काल पहाटे ही आग येथील रांगेत असलेल्या एका शॅक्सला लागली आणि नंतर जवळपास असलेल्या इतर दोन शॅक्सना आगीने घेरल्याने तीनही शॅक्स तसेच झोपडी व तेथील मच्छीमारीसाठी वापरण्यात येणारी छोटी बोट जळून खाक झाली.
या शॅक्सना आग लागण्यामागे घातपाताचा संशय असावा असे स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ही आग या शॅक्सच्या मालकांनेच लावली असण्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. एका शॅक्सला आग लागल्यानंतर ती सरळ बाजूला असलेल्या इतर दोन शॅक्सना लागली. त्यामुळे या तिन्ही शॅक्सना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आमदार लोबो यांनी सांगितले. आमदार लोबो यांना शॅक्सना आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
शॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी माहिती देताना सांगितले की, काल ज्या शॅक्सना आग लागली ती कशी लागली हे निश्चित सांगता येणार नाही. पण हे शॅक्स तात्पुरत्या तत्त्वावर चालविले जात असून त्यांचा विमा उतरवला जात नाही. सध्या पर्यटन मोसम चालू आहे आणि त्यात शॅक्सना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शॅक्स पूर्णतः जळून खाक झाल्याने ते परत उभे करण्यास हा मोसम संपून जाईल असेही त्यांनी सांगितले. या आगीमुळे या शॅक्स मालकांना लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पर्यटन खात्याने पुढाकार घेऊन सरकारकडून शॅक्स मालकांना आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे अशी विनंती केली आहे.
दुर्घटनेमागे घातपात : लोबो
एका शॅकला आग लागल्यानंतर ती बाजूला असलेल्या इतर दोन शॅक्सना लागली. त्यामुळे ही आग शॅक मालकानेच लावल्याचा संशय येतो. यामागे घातपाताचा संशय असावा.
– आमदार मायकल लोबो

