बागा अपघातात पिता ठार, मुलगा गंभीर

0
12

बागा कळंगुट येथील मुख्य रस्त्यावर काल रविवारी दि. 30 रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चंदीगड येथील 55 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला.
कळंगुटच्या दिशेने बागाकडे जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या फॅसिनो स्टूटरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. स्कूटरवरील पिता-पुत्रांपैकी वडिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हा अपघात पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास बागा मुख्य रस्त्यावर घडला. प्राथमिक माहितीनुसार, चंदीगड येथील संजय जुनिजा (55) आणि त्यांचा मुलगा कुणाल जुनिजा हे रेंट अ- बाईकवरून प्रवास करीत होते. त्याचवेळी कळंगुटच्या दिशेने येणाऱ्या कारची त्यांच्या स्कूटरला समोरून जोरदार धडक बसली. यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

अपघातात स्कूटरच्या मागील बाजूस बसलेले संजय जुनिजायांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर स्कूटरचालक त्यांचा मुलगा कुणाल हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलीस ठाण्याचे पथक पोलीस उपनिरीक्षक स्नेहल मळीक यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत संजय जुनिजा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, टॅक्सी चालकाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे.