‘बाई’ ह्या शब्दाकडे अनेक अर्थांनी पाहिले जाते. परंतु ‘गुरू’ ह्या अर्थी हा शब्द वापरला जाई तो केवळ विजयाबाईंच्या संदर्भात. विजया मेहता.. रंगभूमीवरचे एक खणखणीत नाणे. गुणी अभिनेत्री आणि प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून त्यांनी एक युग रंगभूमीवर निर्माण केले. अभिनयाचे, दिग्दर्शनाचे नवे मानदंड प्रस्थापित केले, नवी रंगभाषा घडवली. साठच्या दशकात मराठी रंगकर्मींमध्ये नवे प्रयोगशील वारे त्यांनीच रुजवले. त्या प्रायोगिक रंगभूमीचे सुकाणू हाती धरले ते विजयाबाईंनी. ‘रंगायन’च्या माध्यमातून त्यांनी ती नाव नवनव्या दिशांना वल्हवत नेली, नव्या संकल्पनांच्या किनाऱ्याला लावली. इब्राहिम अल्काझी आणि अदि मर्झबान यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या तालमीत विजयाबाई तयार झाल्या होत्या. त्या भक्कम पायावर त्यांनी आपल्या मेहनतीने, प्रयोगशीलतेने कळस चढवला. ‘रंगायन’ ने खरोखरच त्या काळात इतिहास घडवला. विजय तेंडूलकर, अरविंद देशपांडे, डॉ. श्रीराम लागू आदी दिग्गजांच्या साथीने मराठी रंगभूमीवर एक वादळ तेव्हा घोंगावले. जवळजवळ दहा वर्षे ‘रंगायन’ चे हे वादळ घुमत होते, रंगभूमीवर नवी घुसळण करीत होते. दुर्दैवाने त्यानंतर ‘रंगायन’ फुटली. आधी विजय तेंडुलकरांनी आपल्यातील लेखकापेक्षा दिग्दर्शक वरचढ ठरत असल्याची तक्रार करीत वेगळी वाट धरली आणि नंतर संस्थाच फुटली. पण ‘रंगायन’च्या त्या मंतरलेल्या पर्वाच्या आणि त्यातील प्रयोगांच्या आठवणी आजही पुसल्या गेलेल्या नाहीत. ‘रंगायन’ ने मराठी रंगभूमीला एक नवी भविष्यवेधी मळवाट रचून दिली. प्रायोगिक आणि विजयाबाईंच्याच शब्दांत ‘लोकमान्य’ रंगभूमीवर आयुष्यभर वावरताना असंख्य नाटकांना त्यांचा परिसस्पर्श झाला. जयवंत दळवींच्या ‘संध्याछाया’तील ‘नानी’ने एक काळ गाजवला. दळवींच्याच ‘महासागर’, ‘बॅरिस्टर’, ‘पुरूष’, ‘सावित्री’ आदी नाटके आणि विजयाबाई हे एक अतूट समीकरण बनून गेले. कथासरित्सागरातील मिथकावर आधारित ‘हयवदन’ असो, अनिल बर्वेंचे ‘हमिदाबाईची कोठी’ असो, महेश एलकुंचवारांचे ‘वाडा चिरेबंदी’ असो, भासाचे ‘मुद्राराक्षस’ असो, कालिदासाचे ‘शाकुंतल’ असो अथवा कर्नाटकातील लोककथांवर आधारित गिरीश कर्नाडांचे ‘नागमंडल’; ह्या प्रत्येक नाटकातून एक अत्यंत कसदार, बांधीव नाट्यानुभव विजयाबाईंच्या प्रयोगशील दिग्दर्शनाने प्रेक्षकांना अनुभवायला दिला. ह्या नाटकांचे प्रयोग जर्मनीतही झाले. इंडो जर्मन थिएटर प्रोजेक्टखाली त्यांनी जर्मन कलावंतांना घेऊनदेखील नाटके बसवली, जर्मन दिग्दर्शकांसमवेत काम केले. चित्रपट आणि लघुपटांच्या क्षेत्रातही त्यांनी काम केले. तेथेही आपला ठसा उमटवला. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रां’ना, ‘रावसाहेब’ आणि ‘पेस्तनजीं’ना त्यांनी पडद्यावर उतरवले. देशविदेशांतील आधुनिक रंगप्रवाहांचा त्यांचा गाढा अभ्यास होता, परंतु त्यातील चांगल्या गोष्टी घेत असताना, भारतीय परंपरेत असलेली रंगभूमीची मुळे त्यांनी तुटू दिली नाहीत. म्हणूनच त्यांचा अभिनय किंवा त्यांचे दिग्दर्शन हे प्रेक्षकांना कधी परके, आयात केलेले वाटले नाही. ते ह्या मातीतलेच वाटले. विजयाबाईंनी भारतीय रंगभूमीवर अभिनयाचे नवे व्याकरण रचले असे म्हटले तर वावगे ठरू नये. संवादफेक करताना आधी ती भावना चेहऱ्यावर उमटवून मग संवाद म्हणण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत कलाकारांना संवाद म्हणताना मनातील भावनांचा अव्यक्त कल्लोळ त्यांनी प्रतिबिंबित करायला लावला. आपण जेव्हा रंगमंचावर अभिनय करतो, तेव्हा आपल्याला स्वतः एक व्यक्ती म्हणून, संहितेतील ती भूमिका म्हणून, प्रेक्षकांना रंगमंचावर दिसणारी – बोलणारी कलाकार म्हणून आणि ह्या सर्वांबरोबर आपल्या संवेदनक्षम इंद्रियाच्या चौथ्या कोनातूनही त्या भूमिकेकडे एकाचवेळी पाहता आले पाहिजे असा अभिनयाचा कानमंत्र त्यांनी ‘झिम्मा’ह्या त्यांच्या वाचनीय आत्मचरित्रात दिला आहे. रंगायनपासून एनसीपीएपर्यंतचा त्यांचा नाट्यप्रवास हा भारतीय रंगकर्मींसाठीचा चालताबोलता पाठ्यक्रमच म्हणावा लागेल. रंगमंचावरील प्रत्येक क्षण जिवंत, रसरशीत असला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. रिकामा मंचही बोलला पाहिजे हे त्यांचे सांगणे असे. कधीही स्वतःच्या प्रेमात पडू नका, सदैव अस्वस्थ राहा, अस्वस्थ असणे हा तुमचा स्थायीभाव ठेवा, नवे काही शिकण्यासाठी सदैव तयार राहा हा कानमंत्र त्यांनी कलाकारांना दिला होता. भपका आणि डामडौलापेक्षा अत्यल्प साधनांमध्येही संयमितपणे उत्तम, अस्सल रंगानुभव देता येतो हे विजयाबाईंनी दाखवून दिले. विजयाबाईंनी किती कलाकार, दिग्दर्शक, लेखक घडवले, कितीजणांना प्रेरणा दिली ह्याची मोजदाद नाही. म्हणूनच त्या रंगकर्मींच्या अनेक पिढ्यांच्या आदरास पात्र ठरल्या. रंगभूमीवर आपला ठसा कायमचा ठेवून गेल्या..

