पाच दिवसांत घडला तिसरा अपघात
पणजी-मडगाव राष्ट्रीय महामार्गावरील बांबोळी शनिवारी 8 नोव्हेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास आणखी एक अपघात घडला. गेल्या पाच दिवसांत या ठिकाणी झालेला हा तिसरा अपघात आहे. शनिवारी झालेल्या या अपघातात कार आणि ट्रक यांच्यात धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बांबोळी महामार्गावरील या वाढत्या अपघातांमुळे या भागातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा भाग सध्या अपघातप्रवण झाला आहे. गेल्या पाच दिवसांच्या कालावधीत या मार्गावर तीन मोठे अपघात घडले आहेत. या पाच अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. बांबोळीतील नियाझ रेस्टॉरंटजवळील उतारावर हे अपघात घडत आहेत.
या तीन अपघातांतील पहिला अपघात मंगळवारी उत्तर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास झाला. यात टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ‘रेंट अ कॅब’ला धडक दिली. या अपघातात ‘रेंट अ कॅब’मधील चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. दुसरा अपघात 6 नोव्हेंबर रोजी घडला. यात भरधाव वेगाने आलेल्या मासळीवाहू कंटेनरने दुभाजकाला धडक दिली. मात्र या घटनेत जीवितहानी झाली नाही.
मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
अपघातांची वाढती संख्या पाहून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत वाहतूक पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, आवश्यक त्या सुधारणा करण्याचे तसेच बॅरिकेड्स वगैरे लावण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही शनिवारी रात्री त्या ठिकाणी तिसरा अपघात घडला.

