बांगलादेशींना आश्रय देणार्‍यांची चौकशी

0
11

>> मुख्यमंत्र्यांचा इशारा; घरमालकांनी पोलिसांना माहिती दिली नसल्याचा ठपका

गोव्यात बेकायदेशीरपणे येऊन राहिलेल्या बांगलादेशी नागरिकांना आपल्या घरांच्या खोल्यात भाडेकरू म्हणून ठेवण्यापूर्वी घर मालकांनी पोलिसांना त्यांच्याविषयीची माहिती दिली नव्हती असे आढळून आले आहे. या घरमालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी स्पष्ट केले. पकडण्यात आलेल्या बांगलादेशींकडे आधारकार्ड असल्याचेही आढळून आले असल्याचे ते म्हणाले.

३२ बांगलादेशी ताब्यात
आतापर्यंत राज्यात बेकायदेशीर राहणार्‍या ३२ बांगलादेशींना पकडण्यात आले असून राज्यात आणखीही काही बांगलादेशी असून शकतात आणि त्यांचा शोध घेण्याचे काम चालू असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. या बांगलादेशींच्या स्थलांतरीतांविषयी केंद्रीय गृहमंत्रालयाला कल्पना देण्यात आली असल्याचे सावंत यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. या सर्व बांगलादेशींची लवकरच त्यांच्या मायदेशी परत पाठवणी करण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
राज्यात भंगार अड्डे उभारलेल्या व्यक्ती व प्लास्टिक गोळा करण्याच्या कामात गुंतलेल्या व्यक्ती यात मोठ्या प्रामाणात बांगलादेशी असल्याचे दिसून आले आहे. हेच लोक राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कृत्ये करीत असल्याचेही आढळून आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार दहशवादी विरोधी पथकाला सक्रीय करण्यात आले असून ठिकठिकाणी छापे मारणे सुरू आहे. राज्यभरातल्या विविध भागांत या बांगलादेशींचा वावर व वास्तव्य असून त्यांना अटक करून त्यांची कागदपत्रे मिळवून माहिती गोळा करण्यात येत आहे. या बांगलादेशींना आधारकर्डे कशी मिळाली असे विचारले असता आधारकार्ड देण्याची प्रक्रिया खासगी संस्थेकडे सोपवण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या १० दिवसांत ३२ बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. मागच्या तीन वर्षांत ४१ बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी ६ जणांना यापूर्वीच त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.