बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खलिदा झिया यांचे मंगळवारी सकाळी 6 च्या सुमारास निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. खलिदा झिया या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा होत्या.
खलिदा झिया यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून उपचार चालू होते. त्यांना यकृताचा आजार होता. शिवाय मधुमेह, आर्थ्रायटिस आणि हृदयाचाही आजार होता. त्यांना 23 डिसेंबर रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ढाका येथील एव्हरकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले.
खलिदा झिया या तीन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्यात 1991 ते 96, 1996 साली काही काळासाठी आणि 2001 ते 06 या काळात त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली. बांगलादेशात शैक्षणिक सुधारणा, आर्थिक सुधारणा व प्रशासकीय सुधारणांवर त्यांनी भर दिला होता. 1991 साली बांगलादेशातील लष्करी राजवट संपुष्टात आल्यानंतर देशात निवडणुका झाल्या व बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या उमेदवार खलिदा झिया या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.
आता खलिदा झिया यांच्या निधनानंतर पुत्र तारिक रेहमान हेच पक्षाचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. सध्या रेहमान पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. अवघ्या दोन महिन्यांत बांगलादेशमध्ये 12 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. त्याआधीच खलिदा झिया यांचे निधन झाल्यामुळे याचा बांगलादेशातील आगामी राजकीय समीकरणांवर नेमका कोणता प्रभाव पडणार, याबाबत अंदाज लावले जात आहेत.