जनगणनेच्या ताज्या आकडेवारीत देशातील शेतकर्यांची संख्या घटत चालल्याचे जे विदारक चित्र दिसत आहे, ते चिंताजनक म्हणावे लागेल. हा देश कृषिप्रधान आहे, बळीराजा हा या देशाचा प्राण आहे अशा भाबड्या समजुतीत आपण आजवर राहिलो, परंतु प्रत्यक्षात देशाचा प्राण असलेला हा बळीराजा शेतीपासून दूर चालला आहे, देशोधडीला लागत आहे असेच जनगणनेतील आकडेवारीचे विश्लेषण करता दिसून येते. वर्षभर केवळ शेतीवर अवलंबून असलेला आणि शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या शेतकर्यांचे प्रमाण आपल्या एकूण लोकसंख्येच्या केवळ आठ टक्क्यांहूनही कमी आहे असे ही जनगणना सांगते. शेतमजूर वगैरे जमेस धरले तरी शेतीवर पूर्णपणे अवलंबून असलेल्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या २२ टक्क्यांच्या आसपास भरेल. वर्षाचे केवळ काही महिनेच शेती करणार्या सीमांत कृषकांची (मार्जिनल फार्मर्स) संख्या मोठी असली, तरी ज्याला खर्या अर्थाने शेतकरी म्हणता येईल अशा पूर्णपणे शेतीला वाहून घेतलेल्या माणसांची संख्या रोडावत चालली आहे हा चिंतेचाच विषय आहे.
शेतीपासून लोक दूर दूर का चालले आहेत याच्या कारणांची येथे उजळणी करण्याचे काही कारण नसावे. आपल्या अवतीभवती जे काही घडते आहे, त्यावरून या विदारक सत्याची कारणे उघड होतात. शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, पावसापाण्यावर, वार्यावादळावर ती बेतलेली आहे, बाजारातील अस्थिरतेवर तिच्या फायद्या – तोट्याची गणिते ठरतात, या सार्या गोष्टींंमुळे शेतकरीवर्ग दिवसेंदिवस निरुत्साही बनत चाललेला आहे. शेतीमध्ये कराव्या लागणार्या गुंतवणुकीच्या तुलनेत लाभ कमी आहे आणि अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तर आपण कर्जाच्या डोंगराआड पिचत जाऊ या भीतीने शेतकर्यांना ग्रासले आहे. शिवाय नव्या पिढीमध्ये शिक्षणाचा प्रसार झाल्याने मुले शेतीच्या चिखलात स्वतःचे पाय मळवून घ्यायला तयार नाहीत. ‘शिवाजी जन्मावा पण दुसर्याच्या घरात’ असे म्हणतात, त्याप्रमाणे शेतकरी जन्मावा, पण दुसर्याच्या घरात ही समाजाची मनोवृत्ती बनत चाललेली आहे. या सार्या बदलत्या परिस्थितीत शेतकर्याच्या जमिनीवर दलालांचा डोळाही आहेच. त्यामुळे जसजशी जुनी पिढी लयाला चालली, तसतसा नव्या पिढीचा शेतीतला रस कमी कमी होत चालला आहे याचे जनगणनेतील हे आकडे निदर्शक आहेत. मनरेगासारख्या योजनांमुळे शेतीत काबाडकष्ट करण्यापेक्षा रोजच्या रोजीरोटीची हमी देणार्या कामांकडे शेतकरी वळू लागले असावेत. कारणे कोणतीही असोत, खर्या अर्थाने ज्याला शेतकरी म्हणावे, अशा बारमाही शेती करणार्या शेतकर्यांची संख्या घटतच चालली आहे. ९१ च्या जनगणनेनंतर २००१ मध्ये ही घट दिसून आली होती आणि आता २०११ च्या जनगणनेमध्येही हीच घसरण पुढे चालू आहे. अगदी आकडेवारीच्याच हिशेबात सांगायचे झाले तर गेली वीस वर्षे दिवसागणिक २०३५ जण शेतीतून बाहेर पडत आहेत, असा त्याचा अर्थ निघतो. पूर्णवेळ शेतीमधून बाहेर पडलेल्या व्यक्ती सेवा क्षेत्रात किंवा उद्योग क्षेत्रात कामगार बनण्यात धन्यता मानत आहेत, असा या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. त्यामुळेच सन २०११ च्या जनगणनेमध्ये पूर्णपणे शेती हाच उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या जनतेचे प्रमाण फक्त ९५.८ दशलक्ष उरले. म्हणजेच देशाच्या एकूण लोकसंख्येच्या आठ टक्क्यांहूनही कमी प्रमाणात खरा बळीराजा आज उरला आहे. २००१ च्या जनगणनेत ही संख्या १०३ दशलक्ष होती, तर त्यापूर्वी १९९१ च्या जनगणनेत ती संख्या ११० दशलक्ष म्हणजे अकरा कोटी होती. म्हणजे गेली वीस वर्षे सातत्याने ही संख्या घटत चालली आहे. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी काही दिवसांपूर्वी या परिस्थितीचे नेमके विश्लेषण केले होते. ते म्हणाले होते की जसे चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे सगळेच जण अभिनेते नसतात, तसेच शेतीचेही आहे. शेतीमध्ये वावरणारे सगळेच ‘शेतकरी’ नसतात. त्यामुळे या देशाचा कणा असलेला जो खरा शेतकरी आहे, त्याला प्रोत्साहित करणारे वातावरण निर्माण करण्याची आज खरी गरज आहे. गोवा सरकारने अलीकडेच शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी थोडेफार प्रयत्न केले. ‘किसान कार्ड’ सारखी नावीन्यपूर्ण योजना पुढे आणली गेली. परंतु एखाद दुसर्या प्रयत्नांपेक्षा संपूर्ण देशात अत्यंत तळमळीने शेतकरी वाचवण्याची मोहीम आता राबवावी लागेल. बळीराजा वाचला तरच देश वाचेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे!