बलात्कार पीडित युवतीचे सिंगापूरमध्ये निधन

0
57

दि. १६ रोजी युवती आपल्या मित्राबरोबर सिनेमा बघून परतीच्या वाटेवर असताना तिच्यावर दिल्लीत सहा जणांनी चालत्या बसमध्ये पाशवी बलात्कार करून नंतर रस्त्याच्या बाजूला ङ्गेकून दिले होते. तिच्यासोबत असलेल्या मित्रास मारहाण करून बसमधून बाहेर ङ्गेकण्यात आले होते.  या घटनेत ती जबर जखमी झाली होती व अनेक अवयव काम करायचे थांबले होते. बलात्कार झाल्यादिवसापासून सदर युवतीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले  होते. ही युवती फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती.

गुरुवारी पुढील उपचारांसाठी तिला दिल्लीच्या सफदारजंग इस्पितळातून सिंगापूरला हलविण्यात आले होते. सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ इस्पितळात आठ तज्ज्ञ डॉक्टर्सकडून तिच्यावर उपचार केले जात होते. मात्र उपचारांस प्रतिसाद लाभू शकला नाही. तिच्या शरीरास व मेंदुस गंभीर दुखापती झाल्या होत्या. शेवटी छातीत, ङ्गुफ्ङ्गुसात व आतड्यांमध्ये इन्ङ्गेक्शन पसरणे न थांबल्यामुळे तिची प्राणज्योत मालवली. तिचे पार्थिव भारतात विशेष चार्टर विमानाने शनिवारी मध्यरात्रीपर्यंत पोचणार होते.
निधनाची वार्ता समजताच दिल्लीसह, हैद्राबाद, बेंगलोर, मुंबई, भोपाळ, पटना, कोलकाता अदि ठिकाणी जमावाने या घटनेची तीव्र निर्भर्त्सना करत निदर्शने करण्यात आली. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत अतिमहनीयांची निवासस्थाने असलेल्या इंडिया गेट तसेच रायसीना हिल्स परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
पीडित युवतीच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त करण्यासाठी जंतरमंतर येथे गेलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांना निदर्शकांनी तेथून परतण्यास भाग पाडले.
दरम्यान, या युवतीस इतक्या नाजूक परिस्थितीत सिंगापूरला न्यायची गरजच काय होती असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारला केला आहे. भारतातील इस्पितळांमध्ये तेथील सोयींसारख्याच सोयी असताना इतक्या तातडीने तिला विमानातून देशाबाहेर का नेण्यात आले, असा प्रश्‍नही असोसिएशनने उपस्थित केला आहे. 

महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे : सोनिया गांधींची ग्वाही

बलात्कार पीडित युवतीच्या निधनाबद्दल खेद व्यक्त करून यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करण्यात येणार असल्याची ग्वाही देताना बलात्कार प्रकरणातील दोषींना कडक व यथायोग्य शिक्षा होईल, असे सांगितले.
युवतीने दिलेला लढा कुणीच विसरू शकणार नसल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, लोकांनी संयम पाळावा असे आवाहनही त्यांनी केले. निदर्शने करणार्‍यांना उद्देशून त्या म्हणाल्या, तुमच्या भावनांची दखल घेण्यात आलेली आहे.

भारताला बदलाची गरज : पंतप्रधान

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी युवतीच्या निधनाबाबत तीव्र दु:ख व्यक्त करताना  भारताला खरेच बदलाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. देश महिलांसाठी सुरक्षित बनावा यासाठी सरकार सर्व ते करेल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. या युवतीचा मृत्यू वाया जाणार नाही हे पाहणे आपली सर्वांचीच जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही युवतीच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. दिल्लीत घडलेल्या घटनेबाबत प्रत्येकाने आत्मचिंतन करावे तसेच स्त्रिच्या प्रतिष्ठेचा मान राखावा असे आवाहन राहूल गांधी यांनी केले. दरम्यान, या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर काल कॉंग्रेसच्या उच्चपदस्थ नेत्यांची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. त्याला पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

आरोपींवर खुनाचाही गुन्हा

बलात्कार प्रकरणात अटक केलेले सहा जण सध्या दिल्लीच्या तिहार कारागृहात असून पैकी एक अल्पवयीन असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्वांवर आता खुनाचा गुन्हाही ठेवण्यात येईल. हे सर्व दक्षिण दिल्लीतील झोपडपट्टीतील रहिवाशी आहेत. दरम्यान, या सहापैकी एका आरोपीला काल १२ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दंडाधिकार्‍यांनी दिला आहे. दरम्यान, या खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालाचे वकील दयान कृष्णन यांची नियुक्ती दिल्ली पोलिसांकडून करण्यात आली आहे. आरोपपत्र दि. ३ जानेवारी रोजी दाखल केले जाईल.