30.7 C
Panjim
Friday, February 26, 2021

बयो आणि बाई

  • सुरेखा सु. गावस-देसाई
    (धुळेर-म्हापसा)

सगळ्या शिक्षकांत त्या बयाने लहान. पण आत्मविश्‍वास दांडगा. त्यांच्या शिकवण्यात, वागण्यात नवखेपणा कधी जाणवलाच नाही. जितकं सुंदर रूप, तितकंच सुंदर मन होतं त्यांचं. हसतखेळत गणित, तालासुरात कविता, हावभाव करून गोष्टी सांगण्यात त्या रंगून जात.

तेव्हा ते फोटोफ्रेमसारखे नव्हते की एखादे पेंटिंग म्हणून वॉलहँगिंगसारखे भिंतीवर टांगता येईल किंवा आजच्यासारखे शेकडो वाहिन्यातून चोवीस तास कोसळतही नव्हता धबधब्यासारखा. त्याचे प्रसारण ठराविक वेळी सुरू होई व ठरलेल्या वेळी बंद होई. पण घरोघर तो विराजमान झालेला नव्हता आणि म्हणूनच ते ‘दूरदर्शन’ पाहण्यासाठी लोक घरापासून जरा दूर जात, ज्यांच्याकडे तो आहे त्यांच्याकडे!

त्यावेळी वेळ संपता संपता लागणारी एक मराठी मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. ती पाहण्यासाठी आमच्याही घरी मित्रमंडळी, शेजारी-पाजारी जमा होत.
त्या दिवशी मालिकेचा ठराविक भाग संपला. लोकांची पांगापांग झाली. बातम्या लागल्या होत्या. कान बातम्यांकडे तर हात सतरंज्यांच्या घड्या घालण्यात दंग! तेवढ्यात एका बातमीने लक्ष वेधून घेतले- शिक्षकदिनानिमित्त उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यात माननीय यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना श्रीमती प्रेमलता दारोळे – माझ्या हातून सतरंज्यांची टोकं निसटली; मी लगेच टेबलाजवळ गेले; गुडघे टेकले; बारकाईने पटावर दिसणारी छबी न्याहाळू लागले.

हो, त्याच त्या! आमच्याच दारोळे बाई! तोच गोरापान रंग, तसाच गोलाकार हसरा चेहरा आणि पांढरी शुभ्र साडी! फक्त थोड्या थकल्यासारख्या वाटत होत्या. कालाय तस्मै नमः! मी खटका दाबून दूरदर्शनचा आवाज कमी केला. हीच बातमी रेडिओवर ऐकली असती किंवा वर्तमानपत्रात (फोटोशिवाय) वाचली असती, तरी संशयाला वाव मिळाला असता, तोही साधारण एका टक्क्याचा. कारण ‘प्रेमलता’ आणि दारोळे ही नावेच इतकी ‘अ’सामान्य, की अशा नावाची दुसरी व्यक्ती असणे जवळजवळ अशक्य! सचिन तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, नारायण राणे, पु.ल. देशपांडे, दिलीप बोरकर इ. गाजलेल्या नावाची इतर अनेक माणसे भेटतात असपास.

मी पुन्हा सतरंजी हातात घेतली, घडी घालता घालता विचार करू लागले, कुठे असतील बाई आता? वरळीलाच की… कारण आम्ही सातवीच्या सुट्टीतच वरळीची चाळ सोडली व बांद्य्राला सरकारी वसाहतीत मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो. त्यामुळे सहवास तर दूरच, भेटीही दुर्मिळच!

आमची पहिल्यांदा भेट कशी आणि कधी झाली? अनेक आठवणींना माझ्याभोवती फेर धरला. त्यावेळी प्लेग्रुप, मॉंटेसरी, नर्सरी, शिशुविकासवर्ग असली फॅडं नव्हती. वयाची सहा वर्षे पूर्ण झाली की येत्या जूनमध्ये जवळच्या शाळेत नाव दाखल करायचे आणि पहिलीच्या वर्गात जाऊन बसायचे.

जूनमधील पहिल्या शुक्रवारी आम्ही- म्हणजे मी, माझी पाठची बहीण व आतेभाऊ निघालो बाबांबरोबर. बखोटीला आईने हाताने शिवलेली कापडी पिशवी; त्यात पाटी-पट्टी आणि पेन्सिली. शाळा वरळी सी-फेसवर! अनेक छोटे-मोठे उतार पार करत एका विस्तीर्ण उद्यानाजवळ पोहचलो. उद्यानाच्या अनेक पायर्‍या उतरत उतरत शाळेपाशी येऊन ठाकलो. लांबलचक- बैठी- कौलारू शाळा बाहेरून अनेकदा पाहिली होती. तेथील शिपायाने बाबांना मुख्याध्यापकाच्या दालनात नेले. बाहेरून दालनातील कपाटे दिसत होती. एक-दोन कपाटे पुस्तकांनी खचाखच भरलेली. पण बाजुच्याच कोनाड्यात साधारण माणसाच्या उंचीचा हाडांचा सांगाडा! मी घाबरून दचकून मान दुसरीकडे वळवली. त्याचवेळी बाबा बाहेर आले, शिपायाच्या हाती कागद देऊन निघून गेले. शिपाई पुढे व आम्ही मागून चाललो होतो. लांबरुंद, स्वच्छ, गुळगुळीत, गार-गार सिमेंटचा व्हरांडा, अर्धाअधिक व्हरांडा पार केल्यावर एक आत जाण्याचा भव्य दरवाजा दिसला. आत गेलो. पहिलाच वर्ग पहिली ‘अ’चा होता. शिपाई तेथे रेंगाळला. हवेशीर भरपूर प्रकाश असलेला तो वर्ग. मध्यवर्ती जागेत भिंतीशी टेबलखुर्ची; जवळच लाकडी स्टँडवर काळा चौतोनी कलता लाकडी फळा; भिंतीलगत बाकडी! त्यावर एका बाजूने मुली तर दुसर्‍या बाजूने मुलगे बसले होते.

इतक्यात मागच्या बाजूने कोणीतरी वेगाने येत असल्याचा भास झाला. मान वळवते न वळवते तोच – चटकन् चमकली चपला! विद्युल्लताच जणू! पांढर्‍या शुभ्र साडीचा शेव माझ्या केसांना, एका कानाला व गालाला स्पर्शून गेला. त्या आमच्या बाई होत्या. झरझर चालत त्या टेबलाजवळ गेल्या आणि वळल्या.
‘‘मुलांनो, आज आपल्याला तीन नवे सवंगडी मिळाले आहेत बरं का?’’ खुणेनेच त्यांनी आम्हाला आत बोलावले. शिपायाकडचा कागद घेऊन त्याला परत पाठवले. एका बाजूला आम्ही दोघी बहिणी, दुसर्‍या बाजूला भाऊ. बाईंनी आपले दोन्ही हात पसरून आमच्या खांद्यावर ठेवले, हलकेच थोपटत म्हणाल्या, ‘‘बाळांनो, आता तुमची नावे सांगा पाहू चट्‌चट्.’’

भावाने स स सुभाष असे अडखळत पण झटक्यात सांगितले. तीन-तीनदा विचारूनही बहिणीच्या तोंडून शब्दच फुटेनात. माझ्याकडे पाहून, ‘आणि तुझे गं?’ असे विचारताच ‘पुष्पलता’ असे पटकन् सांगून मोकळी झाले. आधीच हसतमुख बाई खळखळून हसल्या. ‘तू पुष्पलता आणि मी प्रेमलता’ काहीतरी आठवून त्यांनी मला पुन्हा विचारले, ‘‘अर्थ माहीत आहे का गं तुला तुझ्या नावाचा?’’ मी मोठ्ठा होकार भरत उद्गारले, ‘पुष्पलता म्हणजे फुलांची वेल’.

मी शाळेत गेले, बाईंना पाहिले, बाई माझ्याशी बोलल्या, हसल्या, मी त्यांच्या प्रश्‍नांची अचूक उत्तरे दिली. कोणी कोणाला जिंकले? – का मी गेल्यावर्षी ‘शाळेत जाणार नाही’चा धोशा लावला होता. पण आता मात्र मी निर्दार केला- आजपासून कध्धी कध्धी शाळा चुकवायची नाही. अशा जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर सुरवातीलाच बाई भेटल्या होत्या. त्यांच्यामुळे शाळेची ओढ लागली, अभ्यासाची गोडी लागली.

बाईंनी सर्वांना पार्ट्या काढायला सांगितले आणि त्या खुर्चीवर बसल्या. टेबलाच्या खणातून एक लांब वही काढली. एकेकाचे नाव घेऊन हजेरीपट भरू लागल्या. मी पाटी तर काढली, ओळी आखायच्या विसरून टक लावून बाईंकडेच पाहू लागले….
गुटगुटीत बाळासारखी देहयष्टी. पण स्थूल नव्हे तर सुडौल बांधा आणि अंगचणीला साजेशी भरपूर उंची; पौर्णिमेच्या चंद्रासारखा पूर्ण गोल वाटोळा चेहरा आणि वर्ण? काय वर्णावा? ताज्या, टवटवीत. तुकतुकीत, तजेलदार केवड्याच्या पातीचा! रुंद गोर्‍या कपाळावर काजळाने की काळ्या गंधाने रेखलेली छोटीशीच उभी चिरेसारखी रेघ! आखुड काळेशार केस- अंबाड्यावर घालतात तसल्या जाळीत व्यवस्थित सारून हेअरपिनांनी टाचून बसविलेले. केसांचा झुलता झुला! ही केशरचना त्यांना शोभूनही दिसायची. कानात- गळ्यात काही नाही. डाव्या मनगटावर घड्याळ- काळ्या चमकदार चामडी पट्‌ट्याचे. पांढरा ब्लाऊज व पांढरी शुभ्र साडी जॉर्जेट- सिफॉनसारखी. सदोदित हसरा चेहरा! मूल जन्माला येते ते रडतच. बाई हसत हसतच जन्माला आल्या की काय? पांढर्‍या शुभ्र दातामधून ओठांवर विलसणारे हसू म्हणजे चांदण्यांचा चुरा बरसतोय की इवल्या इवल्या नाजुक जुईच्या अर्धोन्मिलित कळ्यांचा सडा शिंपडला जातो आहे!

सगळ्या शिक्षकांत त्या बयाने लहान. पण आत्मविश्‍वास दांडगा. त्यांच्या शिकवण्यात, वागण्यात नवखेपणा कधी जाणवलाच नाही. जितकं सुंदर रूप, तितकंच सुंदर मन होतं त्यांचं. हसतखेळत गणित, तालासुरात कविता, हावभाव करून गोष्टी सांगण्यात त्या रंगून जात.
बृहन्मुंबईच्या त्या प्रभागात सहा शाळा होत्या. आंतरशालेय स्पर्धा असायच्या. स्वच्छ शाळा- सुंदर शाळा- क्रीडा निपुण शाळा- शैक्षणिक गुणवत्तापूर्ण शाळा- सांस्कृतिक कार्यक्रमात सरस… सर्वांत आपलीच शाळा सरस कशी ठरेल- हाच ध्यास आणि आस लागलेली असायची त्यांना!

शाळेचे स्नेहसंमेलन म्हणजे बाईंचा ‘वीक पॉईंट’. तेव्हा त्यांच्यात सळसळता उत्साह संचारायचा, एक नवी उर्जाच मिळायची जणु त्यांना. तेव्हा त्यांची धावपळ, धडपड, एकतानता पाहण्याजोगी! नृत्य- गीते- अभिनय हा त्यांचा खास प्रांत. नवनवीन उत्तम गाण्यांची निवड, लयबद्ध हालचाली, अचूक पदन्यास, लक्षवेधी साजेशी वेशभूषा व भरपूर सराव यावर त्या भर देत. त्यांची विशेष गट्टी मेस्त्री बाईंशी होती. दोघी मिळून सर्व नृत्ये बसवत- कोळी, शेतकरी, आदिवासी, टिपर्‍या. शाळेचे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यात नेहमीच त्यांचा सिंहाचा वाटा असे, हे निर्विवाद!
या सर्वांत बाईंमधील ठळक गुणवैशिष्ट्य म्हणजे जास्तीत जास्त मुलांना, किंबहुना सर्वच मुलांना स्नेहसंमेलनात सहभागी करून घ्यायचे. प्रत्येकाचे सुप्त गुण हेरण्यात त्या पारंगत होत्या. कुवत- क्षमता- आवड- प्रयत्नशीलता पाहून त्या मुलांना कामे वाटून देत.

आम्ही एकेक पायरी चढत वरच्या वर्गात जात होतो. कधीमधी बाईभक्त ‘आम्ही’ मधल्या सुट्टीत त्यांच्याशी गप्पा मारायला जात असू. खूप बोलणे होई. त्या म्हणत, ‘‘काय गं चिमण्यांनो, किती चिवचिवता तुम्ही? आणि सुट्टी संपल्याची घंटा होताच चिमणीएवढी तोंडं करता, हिरमुसून निघून जाता. काहीतरी सांगायचे राहून गेलेलेच असते तुमचे नेहमी.’’

६वीची परीक्षा संपली. निकाल हाती आले. पुढचे वर्ष शाळेतील शेवटचे व महत्त्वाचे वर्ष. त्यानंतर बाई कुठे भेटणार? आम्ही ८-९ जणींनी परस्पर ठरविले, आईवडलांची परवानगी घेतली, त्याप्रमाणे बाईंना सांगितले. दुसर्‍या दिवशी उन्हे कलल्यावर निघालो. सगळ्या खाणाखुणा ओळखून मोठ्या मैदानावर पोहचलो. समोरच मजबुत बांधकाम केलेल्या सिमेंटच्या चाळी. आम्ही दोन नंबर शोधत होतो तर समोर बाईच दिसल्या आमची वाट पाहणार्‍या. तळमजल्यावरच एकखणी खोली होती त्यांची. जवळच इमारतीचे प्रवेशद्वार. तेथेच बसलो आम्ही. थोड्या वेळाने त्या आत जाण्यासाठी उठल्या. समोरून एक माणूस येताना दिसला, ‘‘हा बघा दादा आला, बोला त्याच्याशी’’.
आम्ही दादाभोवती कोंडाळे करून बसलो. ‘तुमच्याएवढी होती बयो.. तेव्हा तिचे लग्न झाले…’, दादा बोलत होते आम्ही ऐकत होतो. बाईंच्या संसाराच्या सारीपाटाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच उधळला गेला होता. गावचे टगे-टवळे गाव गुंड आणि वाळकी खोडंही तिच्या मार्गावर आणि मागावर असायची. तिचा कोंडमारा होत होता. पण दादाच्या डोईवर भार आणि जिवाला घोर नको म्हणून ती ससेहोलपट साहत होती. शेवटी हितचिंतक आणि सासरच्या मंडळींनी मार्ग सुचवला. मदतीचा हात पुढे केला. शिकण्याचा सोस व्यवहारीपणाने पूर्ण करण्याचे ठरविले. तालुक्याच्या गावी वसतीगृहात राहून शिकू लागली. शिक्षक प्रशिक्षणाची पदविकाही मिळविली. लहान वयातच अनेक चटके सोसले होते. तावून सुलाखून निघालेली बयो खंबीर, कणखर बनली होती. दादाच्या मदतीने थेट मुंबई गाठली. आपल्या हिंमतीवर, हुशारीवर, हिरीरीने प्रयत्न करून घर आणि नोकरी मिळविली.

इतक्यात एका परातीत सरबताचे पेले मांडून बाई बाहेर आल्या. ‘काय रे, काय एवढं बोलणं चाललं होतं?’ उत्तरादाखल दादांनी धोतराच्या सोग्याने डोळे टिपले.
आम्ही उद्याचा वायदा करून निघालो. वाटेत कोणीच कोणाशी बोलत नव्हते. ज्यांच्याकडे पाहिल्यावर कोणालाही हेवा वाटावा असे ‘सौंदर्य’ त्यांच्यासाठी वरदान न ठरता शाप ठरले होते. दादांचे ते वाक्य पिच्छा सोडत नव्हते… ‘देवानं नक्षत्रावानी रुपडं दिलं, पण दैवानं दिलं फुटकं नशीब’. हेच का ते प्राक्तन! वा रे नियती!!
वाईंना भूतकाळ पुसून टाकायचा होता. म्हणून का त्या कामात स्वतःला झोकून द्यायच्या. कुठल्या ना कुठल्या कामात गुंतवून ठेवायच्या स्वतःला?
आज बाईंना पुरस्कार मिळाला. योग्य व्यक्तीला मिळालेला योग्य पुरस्कार! एक दार बंद झाले तर दुसरी अनेक दारं उघडली जातात. मला मात्र प्रश्‍न पडला- या पुरस्काराने बाईंचा गौरव केला गेला की बाईंमुळे या पुरस्काराला सन्मान प्राप्त झाला?

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सर्वथा अनुचित

पालिका प्रभाग आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयापुढे झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांचा मनमानी कारभार उघडा पडला आहे. पालिका आरक्षणासंदर्भात ज्या...

६० वर्षांवरील व्यक्तींना मार्चपासून कोविड लस

>> केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती, ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही गरजेनुसार लस देणार देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने...

नगरपालिका आरक्षण निवाडा राखीव

>> मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी पूर्ण गोवा नगरपालिका निवडणुकांसाठी गोवा सरकारने अधिसूचित केलेले प्रभाग आरक्षण व प्रभागांची...

गोमंतकीय दुसर्‍या लाटेचाही सामना करतील ः डॉ. बांदेकर

राज्यातील आरोग्य सेवकांना कोविडची लस देण्यात आलेली असल्याने आता राज्यात कोविडची दुसरी लाट आली तरी गोवा त्या लाटेचा चांगल्या प्रकारे सामना करू...

श्रीपाद नाईक यांना गोमेकॉतून डिस्चार्ज

मागील एक महिना आणि तेरा दिवस गोमेकॉत उपचार घेणारे उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र कार्यभार) व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद...

ALSO IN THIS SECTION

‘माझी रक्षा सिंधूत टाका…’

प्रा. रमेश सप्रे त्यांना स्पष्ट दिसत होतं एक काळ असा उगवेल ज्यावेळी संपूर्ण सिंधू नदी- जिच्या काठावर आपली...

स्वराज्यरक्षक राजा… राजा शिवछत्रपती

पल्लवी दि. भांडणकर प्रजेचा विश्वास जिंकून मावळ्यांना एकत्र आणणारे राजे आज आपल्या देशाला हवे आहेत. मग बाजीप्रभूसारखे सैनिक...

दुभंगलेली मने, तुटलेली नाती

ज. अ. रेडकर.सांताक्रूझ मुलाने मख्खपणे सगळे ऐकून घेतले पण त्याच्यावर कोणताच परिणाम झाला नाही आणि तो माघारी बंगळूरूला निघून गेला. निदान.. बाबा...

जीवन ः एक संघर्ष

प्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव - वाळपई) सून चांगली मिळाली. हसतमुख, सुस्वभावी, सुंदर. तिने या घरात येऊन सार्‍या घराची धुरा...

छत्रपती शिवाजी महाराज…परकीयांच्या नजरेतून…

सचिन मदगे अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूचा संपूर्ण पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी एकाही दिवसाची विश्रांती घेतली नाही की विजयही साजरा...