भाजप दोन गटांत विभागला गेला आहे – अस्सल व बनावट, आणि दुर्दैवाने सध्या पक्षाची धुरा बनावट लोकांच्या हातात गेली आहे, असे माजी परराष्ट्रमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांनी म्हटले आहे.
राजस्थानच्या बारमेर मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने नाराज बसलेले जसवंत यांनी भाजपमध्ये पक्षाच्या मूल्यांशी व प्रतिमेशी काहीही देणे-घेणे नसलेल्या ‘बाहेरच्या’ लोकांचे प्रस्त माजले असल्याचा आरोपही केला.
जसवंत यांना शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न भाजप नेत्यांकडून सध्या चालू असून, असे असले तरी जसवंत सिंग लवकरच पक्षाला रामराम करण्याची दाट शक्यता आहे. ते लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविणार असल्याचेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्याआधी ते बारमेर येथे भेट देऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतील. ‘बारमेर येथे कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतरच पुढील कृती ठरवणार आहे’ असे त्यांनी काल स्पष्ट केले.
जसवंत सिंग हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांचे निकटवर्तीय समजले जातात.
दरम्यान, भाजप अध्यक्ष जसवंत सिंग यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जसवंत यांचे स्थान तिकिटीवरून मोजले जाऊ शकत नाही. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांना पक्ष कधीही दूर करणार नाही.
दरम्यान, जसवंत सिंग हे गेल्या लोकसभेत दार्जिलींग मतदारसंघाचे खासदार होते. तेथे भाजपने यावेळी एस. एस. अहलूवालिया यांना तिकीट दिले आहे. जसवंत यांनी बारमेर मतदारसंघ मागितला होता, पण तेथे कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या कर्नल सोनाराम यांना तिकीट देण्यात आले.
दरम्यान, जसवंत यांना तिकीट नाकारल्याने त्यांचे कार्यकर्ते खवळले असून अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. राजस्थानात कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधात मोर्चा काढून निषेध केला. राजस्थानात भाजप कार्यालयावर हल्ला झाल्याचेही वृत्त होते.

