बनावट नाण्यांची प्राचीनता

0
119

– श. गो. धोपाटे

बनावट नाणी पाडण्याचे तंत्र केव्हा विकसित झाले हे सांगणे जरा कठीण असले तरी चलनी नाण्यांच्या तंत्राबरोबरच किंवा त्याच्या आसपासच हेही तंत्र विकसित झाले असणार यात शंका नसावी. मानवी स्वभावाचा विशेषच असा आहे की त्याला कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त सुखाची इच्छा असते. सर्व भौतिक सुखांची प्राप्ती द्रव्यप्राप्तीशी निगडीत आहे ही जाणीव त्याला नाणी प्रचारात येतायेताच झाली. प्राचीन काळी नाणी पाडली जात ती सोने, चांदी व तांबे या मौल्यवान समजल्या गेलेल्या धातूंची असत. ती आकाराने लहान पण किमतीला भारी होती. एका सोन्याच्या नाण्यामध्ये एका छोट्या कुटुंबाचा एक वर्षाचा चरितार्थ चाले. त्याच्या या सामर्थ्यामुळेच कमी श्रमात अधिक सुख हा विचारही आलाच.

सर्वसाधारणपणे बनावट नाणी म्हणजे तांब्याच्या नाण्यावर चांदीचा अथवा सोन्याचा मुलामा किंवा चांदीच्या नाण्यांवर सोन्याचा मुलामा देण्याचा प्रकार. फार प्राचीन काळापासून असा मुलामा देण्याच्या पद्धतीत सोने अथवा चांदी यांचे पार्‍याबरोबर मिश्रण करत असत. या मिश्रणाला ‘अमालगम’ अशी संज्ञा होती. आजही तीच संज्ञा आहे. या अमालगमचा थर ज्या वस्तूवर मुलामा द्यायचा आहे तिच्यावर चढवीत आणि नंतर ती वस्तू तापवून पारा काढून टाकत. ही प्रक्रिया तशी बरीच गुंतागुंतीची होती आणि तिचे तंत्र कष्टसाध्य असे होते.

लाकडे व कातड्यांचे तुकडे राख होईपर्यंत जाळून तयार झालेली राख मग पाण्यात विरघळवून व स्वच्छ पाणी गाळून या पाण्यातून शुद्ध पोटॅशियम सायनाइड काढून घेतात. या सायनाइडपासून विशिष्ट पद्धतीने पाण्यात विरघळणारे सोन्याचे अथवा चांदीचे सायनाइड बनवून त्याचा उपयोग तांब्यावर मुलामा देण्यासाठी केला जात असे. नाणे संग्रहकाला कधी ना कधी अशा खोट्या नाण्यांना सामोरे जाण्याचा प्रसंग येतो. आणि अशा नाण्यांचाही इतिहास लक्षात राहण्यासारखा संग्रह माझ्याजवळ जमा झाला त्याचा हा वृत्तांत.

प्राचीन, परंतु संपूर्ण भारतीय धाटणीची म्हणावीत अशी नाणी म्हणजे पंचमार्क नाणी. सुरुवातीला यांचा अभ्यास करणार्‍या युरोपीय शास्त्रज्ञांनी पंचमार्क नाव दिले. भारतीय भाषांत यांना ‘आहत’ नाणी म्हणतात. यांना जवळजवळ २५०० वर्षांचा इतिहास आहे. यांचे वैशिष्ट्य म्हणजे पुढील बाजूवर पाचसहा चिन्हांचे ठसे असतात व पाठीमागील बाजूस एखाद दुसरे चिन्ह टंकीत केलेले असते. सातत्याने ज्यांचा अभ्यास चालू असूनही त्यांच्यासंबंधीची माहिती आजही अपूर्णच आहे. याचे मुख्य कारण, यावर राजाचे नाव अथवा त्याचे घराणे यासारखा कसलाच लेख नसतो.

विष्णुगुप्त ऊर्फ कौटिल्य ज्याचा सचिव होता तो सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक (इसवी सनपूर्व तिसरे, दुसरे शतक) यांची नाणी पंचमार्कच होती.

नाणे क्र. १

 

 

 

पुढील बाजू पुढील बाजू

अ) इसवी सनपूर्व पाचवे शतक ते दुसरे शतकामधील चांदीचे खरे पंचमार्क नाणे.

ब) तांब्याच्या तुकड्यावर चांदीचा मुलामा चढवून बनवलेले बनावट पंचमार्क नाणे.

प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन व्यापारी भारतीय वस्तू खरेदी करण्याच्या निमित्ताने भारतात येत. विनिमयासाठी ते सोन्याचांदीची नाणी देत. भारताच्या दृष्टीने हा व्यापार अत्यंत किफायतशीर होत असे. आजच्या परिभाषेत याला ‘सरप्लस ट्रेड’ म्हणतात. त्याकाळी काही व्यापार्‍यांनी तर येथेच टाकसाळी उघडून हुबेहूब नाणी पाडण्यासही कमी केले नव्हते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमन सम्राज्ञी फौन्टिना हिच्या नावाचे भारतात मिळालेले चांदीचे पण बनावट नाणे पुढे दिले आहे. याच्या पुढील बाजूवरील मुकुट व गळ्याजवळील चांदी निघून गेल्यामुळे तांबे उघडे पडले आहे. भारतात ही चांदीची नाणी द्रम्म या नावाने ओळखली जात. मूळ द्रम्माचे वजन ३.५ ते ४.० ग्रॅम असे. पण सदरचे नाणे फक्त २.७० ग्रॅम वजनाचेच आहे. म्हणजे हे नाणे घडवताना कारागिराने दोन प्रकारे खोटेपणा केला आहे.

नाणे क्र. २

 

 

 

 

पुढील बाजू मागील बाजू

इसवी सनाच्या पहिल्या शतकात गुजरात, माळवा, उत्तर महाराष्ट्र व उत्तर कोकण या प्रदेशावर कुषाण सम्राटांचे प्रांताधिकारी स्वतंत्रपणे राज्य करू लागले होते. मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रचारात आणलेले २.० ते २.५ ग्रॅम वजनाचे चांदीचे कार्षापण विपुल प्रमाणात सापडले आहेत.

नाणे क्र. ३ महाक्षत्रप नहापान यांचे नाणे

अ)

 

 

 

 

पुढील बाजू मागील बाजू

इसवी सन पहिले शतक ते दुसरे शतकामधील चांदीचे खरे क्षत्रप कार्षापण नाणे.

ब)

 

 

 

 

पुढील बाजू मागील बाजू

तांब्याच्या तुकड्यावर चांदीचा मुलामा चढवून बनवलेले बनावट क्षपत्र कार्षापण.

इ. स. दुसर्‍या शतकात दक्षिण भारतात आपल्या साम्राज्याचा विस्तार करून सातवाहन घराण्याची कीर्ती व दरारा निर्माण करणारा बलाढ्य राजा यज्ञ सातकर्णी. याच्या काळातील आणि एकूणच सातवाहन राजांची ब्रॉंझ, पितळ, तांबे व शिसे अशा स्वस्त धातूंची अपरंपार म्हणावीत अशी नाणी आजही सापडतात. क्षत्रपांप्रमाणेच यांचे म्हणावे असे एकही सोन्याचे नाणे सापडलेले नाही. परंतु क्षत्रपाच्या तुलनेत सातवाहनांची चांदीची नाणी फारच कमी मिळाली आहेत.

खोटी नाणी तयार करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे कमीतकमी चांदी वापरून इतर तांबे व कथील अशा स्वस्त धातूंचे त्यात मिश्रण करून तयार धातू चांदीसारखा दिसेल त्याची नाणी पाडणे. मुळातच सातवाहनांची चांदीची नाणी तशी दुर्मीळच आहेत. पण त्यातही एक २० टक्के चांदी, ६० टक्के तांबे, १० टक्के कथील व १० टक्के लोखंड मिसळून तयार केलेले एक खोटे नाणे उजेडात आले आहे.

खोटी नाणी तयार करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे कमीत कमी चांदी वापरून इतर तांबे व कथील अशा स्वस्त धातूंचे त्यात मिश्रण करून तयार धातू चांदीसारखा दिसेल त्याची नाणी पाडणे. मुळातच सातवाहनांची चांदीची नाणी तशी दुर्मीळच आहेत, पण त्यातही एक २० टक्के चांदी, ६० टक्के तांबे, १० टक्के कथील व १० टक्के लोखंड मिसळून तयार केलेले एक खोटे नाणे उजेडात आले आहे.

नाणे क्र. ४

अ)

 

 

 

यज्ञ सातकर्णीचे शुद्ध चांदीचे नाणे.

ब)

 

 

 

यज्ञ सतकर्णीचे एक खोटे नाणे.

नाणे क्र. ५

इ. सनाच्या चौथ्या शतकात उत्तर भारतात एक बलाढ्य साम्राज्य उदयास आले होते. ही होती गुप्तांची राजवट. तीनेकशे वर्षांची यांची राजवट भारतीय इतिहासात सुवर्णकाळ म्हणून समजली जाते. यांची सोन्याची नाणी जगभर वाखाणलेली आहेत. गुप्तसम्राट ‘कुमार गुप्त’ याचे तांब्यावर चढवलेल्या चांदीच्या मुलाम्याचे खोटे नाणे. बर्‍याचशा भागावरील चांदीचा थर झिजून निघून गेल्याने मूळ तांबे धातू उघडा पडलेला दिसतो आहे.

 

 

 

 

 

पुढील बाजू मागील बाजू

तांब्याच्या तुकड्यावर चांदीचा मुलामा. ‘राजा करी दाम तैसे चामही चालती’ असा एक उल्लेख तुकाराम महाराजांच्या एका अभंगात आला आहे. लहानपणीच्या प्राथमिक शालेय शिक्षणात दिल्ली सुलतान महंमद तुघलक याचा पाठ शिकवताना इतिहासाचे शिक्षक चामड्याच्या नाण्यांनी सुलतानाचा खजिना भरून व सोन्याच्या नाण्यांनी रिकामा झाल्याचे रसभरित वर्णन सांगत. पण साताठशे वर्षांपासून प्रचलित असलेला हा समज बहुधा एक दंतकथाच असावी असे वाटते. कारण अनेक प्रकारच्या बनावट नाण्यांत चामड्याचे नाणे अजून तरी उजेडात आल्याची नोंद नाही.

नाणे क्र. ६

मोगल बादशहा महंमदशाह याचे बनावट नाणे.

 

 

 

 

 

 

पुढील बाजू मागील बाजू

मोगल बादशहा महंमदशाह (इ.स. १७१८-४८) याच्या कारकिर्दीमध्ये लोखंडाच्या तुकड्यावर चांदीचा पत्रा चढवून तयार केलेले एक रुपयाचे नाणे. कालांतलाने चांदीचा पत्रा फाटून लोखंड उघडे पडून गंजले आहे. अशा प्रकारची नाणी मोठ्या प्रमाणात तयार करणे शक्य होत नसे. कारण हे काम कलाकुसरीचे व वेळखाऊ असून एखादा सोन्याचांदीचा कारागीर असले एखाद दुसरे नाणे चलनात आणण्याची शक्यताच जास्त असे. खोटी नाणी तयार करण्याचा हा आणखी एक प्रकार. मोगलांच्या पडत्या काळात व उत्तर पेशवाईत या प्रकाराची नाणी खुद्द पुण्यात म्हणजे पेशव्यांच्या राजधानीत पुण्याजवळ सापडली आहेत.

नाणे क्र. ८

(अ)

 

 

 

 

 

पुढील बाजू मागील बाजू

वजन ः ११ ग्रॅम

(ब)

 

 

 

 

पुढील बाजू मागील बाजू

वजन ः ५ ग्रॅम

क्रमांक ८ (अ) या नाण्याचा धातू ९२ टक्के शुद्ध चांदीचा आहे. पेशव्यांचा प्रमाणित रुपया या शुद्धतेचा मानला जाई व वजन १०.८ ते ११.२ ग्रॅमच्या दरम्यान असे. हे पेशव्यांचे एक उत्तम नाणे. क्रमांक ८ (ब) नाणे अर्धा रुपया असून तांब्याच्या तुकड्यावर चांदीचा पातळ पत्रा चढवून तयार केलेले खोटे नाणे आहे. दोन्ही नाणी वाईच्या सराफ बाजारात आढळून आली. स्वतः राज्यकर्त्यांनीच रुपयाचे अवमूल्यन केल्याचा एक नमुना जेम्स प्रिन्सेप नावाच्या तत्कालीन ब्रिटिश नाणे अभ्यासकाने उत्तर पेशवाईतील आर्थिक दुरवस्थेचा मार्मिक अभ्यास नमुना सादर करून ठेवला आहे. तो खालील तक्त्यात दिला आहे. बंगालमधील फारुखाबाद या टाकसाळीचा रुपया ‘स्टॅण्डर्ड’ समजला जात असे. पेशवाईच्या वीस टाकसाळीच्या १०० रुपयांच्या बदल्यात मिळणारे फारुखाबाद ईस्ट इंडिया कंपनीचे रुपयांचे विनिमय दर दिले आहेत. त्यातील आठ निवडक व महत्त्वाच्या टाकसाळींचे दर खाली दिलेल्या कोष्टकात नमूद केले आहेत.

कोष्टक क्र. १

क्रमांक टाकसाळीचे नाव ब्रिटिश रुपये

१ पुणे (अंकुशी) जुना १०३.३

२ अंकुशी सुधारीत ९७.५

३ वाफगाव ९५.७

४ कित्तुर ९१.२

५ मिरज ८८.३

६ निपाणी ७९.४

७ तोरगल ६३.९

८ मुधोळ ६०.३

अशा अत्यंत बिकट आर्थिक दुरवस्थेचा व अनागोंदी राज्यकारभाराचा फायदा समाजकंटकांनी न घेतला तरच नवल. वेगवेगळ्या प्रकारे बनावट नाणी तयार करण्याचे उद्योग आपण वर पाहिलेच आहेत. पण भाजलेल्या मातीच्या गोलाकार तुकड्यावर पेशव्यांच्या रुपयाची हुबेहूब नक्कल करून त्यावर चांदीचा मुलामा देऊन बनावट रुपये तयार केल्याचा एक प्रकार माझ्या निदर्शनास आला तो वाचकांच्या माहितीसाठी खाली देत आहे. दाभोळचे अण्णासाहेब शिरगावकर एक सामाजिक कार्यकर्ते. कोकणच्या प्राचीन इतिहासाचे मर्मज्ञ जाणकार. ऐतिहासिक वस्तूंचा शोध घेऊन डेक्कन कॉलेज पुणे, प्राच्य विद्या अभ्यास संस्था ठाणे यांसारख्या संस्थांकडे सुपूर्द केल्या आहेत. गतवर्षी दाभोळला त्यांच्याकडे गेलो असताना त्यांचा वैयक्तिक संग्रह पाहावयास मिळाला. त्यामध्ये खाली वर्णनाची तीन नाणी माझ्या पाहण्यात आली. तीनही नाणी अत्यंत आश्‍चर्यकारक रीतीने तयार केलेली बनावट नाणी आहेत. यासाठी मातीच्या चकत्या करणारा कुंभार, पेशव्यांच्या रुपयाची नक्कल करणारा डायमेकर व सोन्या-चांदीचा मुलामा देणारा सोनार या तिघांच्या टोळीने हा उद्योग केला आहे.

नाणे क्र. ९

 

 

 

 

 

(अ) (ब) (क)

पुढील बाजू

 

 

 

 

 

(अ) (ब) (क)

मागील बाजू

तिन्ही नाण्यांचे वजन ८.२ ते ८.९ ग्रॅम, व्यास २.२ ते २.५ सें.मी., जाडी ०.४ सें.मी. या दरम्यान आहे. क्रमांक ‘अ’ हे नाणे उत्तम स्थितीत आहे. पण हवामानाच्या परिणामामुळे चांदी काळी पडली आहे. ‘ब’ नाण्यावरचा डाव्या बाजूचा मुलामा थोडा थोडा उडालेला दिसतो, तर ‘क’ नाण्यावरची चांदी उजव्या बाजूला बर्‍याच प्रमाणात निघून गेल्याने तिच्या खालची माती उघडी पडली आहे. किती नाणी, कशी पाडली, किती व्यवहारात गेली याचा अंदाज आज काहीच करता येणार नाही. पण एक मात्र खरे की त्या त्या काळातील खर्‍या नाण्यांइतकीच बनावट नाणी प्राचीन होत.

संदर्भ व टिपा

१) मुलाम्यासंदर्भात दिलेली माहिती मेलॉरच्या संकीर्ण रसायन पुस्तकाच्या आधाराने दिली आहे.

२) नमूद केलेली सर्व बनावट नाणी लेखकाच्या संग्रहातील आहेत.

३) बनावट नाणी श्री. शिरगावकर यांच्या सौजन्याने.

४) बनावट नाण्यांच्या संदर्भात प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचा इतिहास या निबंधात आला आहे.