बदनामीकारक व्हिडिओंचा राज्य सरकारच्या स्थैर्यावर परिणाम नाही

0
9

>> भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचा दावा; आरोप करण्यापूर्वी पुरावे सादर करा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची व्हिडिओंद्वारे राजकीय हेतूने करण्यात येणाऱ्या बदनामीचा भाजप सरकारच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना काल केला.
डॉ. प्रमोद सावंत हे भाजप सरकारचे प्रमुख असल्याने विरोधक त्यांनाच लक्ष्य करीत आहेत. मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करायला हवेत. कुणाचीही नाहक बदनामी करणे गैर आहे, असेही तानावडे यांनी नमूद केले.

सरकार ही सर्वांची
सामूहिक जबाबदारी

सरकार ही एकट्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही, तर ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. विधानसभेत ज्या काही मुद्द्यांवर चर्चा झाली, तेच मुद्दे विरोधकांनी व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत; परंतु त्याचा भाजप सरकार आणि पक्षाच्या स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यातील नागरिक सुज्ञ आहेत, असेही तानावडे यांनी सांगितले.

व्हिडिओंमध्ये तथ्य नाही : गुदिन्हो
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची बदनामी करणाऱ्या व्हिडिओमध्ये तथ्य नाही. मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ चांगले कार्य करीत आहे. विरोधकांकडून या चांगल्या कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिक सोशल मीडियावरील व्हिडिओंतील दाव्यांवर विश्वास ठेवणार नाही, असे वाहतूक तथा उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

भाजपची आज सदस्यता मोहीम
भाजपने बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी मेगा प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेवेळी खासदार विश्वेश्वर हेडगे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील प्रत्येक मतदारसंघांत मतदान केंद्रनिहाय प्राथमिक सदस्य नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे. थिवी, पर्वरी, वास्को, मुरगाव येथील सदस्य नोंदणी मोहिमेत हेगडे सहभागी होणार आहे, असे सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. भाजपने राज्यात आत्तापर्यंत 82 हजार प्राथमिक सदस्यांची नोंदणी केली आहे. श्रीगणेश चतुर्थीच्या सणामुळे भाजप प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेत खंड पडला होता. आता, ती पुन्हा राबविली जात आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.