Home Featured बजबजपुरी

बजबजपुरी

0

हडफडे येथील नाईटक्लबमधील अग्निकांडात पंचवीसजणांचे बळी गेल्यानंतर आणि येथील पर्यटनक्षेत्रातील बजबजपुरीबाबत देशभरातून छीः थू होऊ लागल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आहे. राज्याच्या पर्यटनक्षेत्रातील हॉटेल, रिसॉर्ट, शॅक्स आणि सार्वजनिक समारंभस्थळे सुरक्षित आहेत ह्याची कसून खातरजमा करण्याची ग्वाही सरकारने दिली आहे आणि त्यासाठी उच्चस्तरीय समितीही गठित केली आहे. मात्र, येथे केवळ तेथील सुरक्षात्मक उपाययोजना तपासणेच पुरेसे नाही. खरे म्हणजे सरकारने ह्या निमित्ताने राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायत आणि पालिका क्षेत्रामध्ये चालणारी पर्यटन आस्थापने वैध आहेत की अवैध आहेत, ह्याचीही खातरजमा करायला हवी. तसे झाले तर बऱ्याचजणांचे बुरखे फाटतील. गोव्यातील, विशेषतः किनारपट्टीतील ग्रामपंचायतींची बहुतेक पंच – सरपंच मंडळी गब्बर झाली आहेत ती कशाच्या जिवावर हेही त्यातून कळेल. गोमंतकीयांनी आपल्या जमिनी परप्रांतीयाना विकल्या वा आपले व्यवसाय परप्रांतीयांना चालवायला दिले. राज्यात गेल्या काही वर्षांत दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आदी राज्यांतील धनदांडगी मंडळी मोठ्या प्रमाणात गोव्यात उतरली आहेत आणि येथील किनारपट्टी भागामध्ये नाना तऱ्हेचे धंदे व्यवसाय चालवत आहेत. ह्या मंडळींना येथे थारा कसा मिळाला? कोणी दिला? स्थानिक आणि राजकीय वरदहस्ताविना हे व्यवसाय येथे उभे राहूच शकले नसते. गोव्यामध्ये बोकाळलेल्या हप्ता संस्कृतीला हे व्यावसायिकही खाजगीत दुजोरा देत असतात. पंचापासून पोलिसापर्यंत आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यापासून राजकारण्यापर्यंत जो तो येथे कसा खंडणी उकळायला टपलेला असतो ह्याचे मासले ते देतात. आज गोव्यात गावोगावी जे अवैध व्यवसायांचे पीक आलेले आहे ते ह्या हप्ता संस्कृतीचेच फळ आहे. त्यामुळे केवळ आस्थापनांचे सुरक्षा ऑडिट करणे पुरेसे नाही. मुळात हे जे व्यवसाय येथे चालतात, ते सर्व दृष्टींनी कायदेशीर आहेत का ह्याची खात्री सरकारने पटवायला हवी आणि नसतील तर ते बंद करण्याची हिंमतही दाखवायला हवी.
हडफडे अग्निकांड प्रकरणातील फुकेतला पळालेल्या दोघा मालकांनी काल दिल्लीतील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. अटकपूर्व जामीन देणार असाल तर आम्ही परत येऊ असे त्यात म्हटले आहे. हे तर सरळसरळ ब्लॅकमेलिंग झाले. हडफड्याचा नाईटक्लब आमचे भागीदार आणि दैनंदिन कामकाज पाहणारे व्यवस्थापक पाहत होते आणि आमचा त्या दुर्घटनेशी काही संबंध नाही असे हे फरार बंधू अटकपूर्व जामीन अर्जात म्हणतात. दुर्घटनेशी काही संबंध नव्हता, तर रातोरात पळून जाण्याचे आणि तेथून मृतांप्रती सहानुभूती दर्शवण्याचे नाटक करायचे कारणच काय? जर ह्या नाईटक्लबपासून मिळणाऱ्या आर्थिक फायद्याचे तुम्ही आजवरचे वाटेकरी असाल, तर तेथील दुर्घटनेची जबाबदारीही तुम्हाला घ्यावीच लागेल. केवळ आपल्या कर्मचाऱ्यांवर खापर फोडून मोकळे होता येणार नाही. ह्या नाईटक्लबचा आणखी एक भागीदार तर अटक टाळण्यासाठी पाठीचा कणा दुखावल्याचे निमित्त करून इस्पितळाच्या आश्रयाला गेला होता, जेथून त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. आणखी एक संबंधित आहे तो तर ब्रिटीश नागरिक आहे. येन केन प्रकारेण ह्या अग्निकांडापासून स्वतःची सुटका करून घेण्याची पराकोटीची धडपड ह्या सर्वांनी चालवलेली आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत ह्या अग्निकांडातील एकही आरोपी सुटता कामा नये. मग तो भ्रष्ट सरकारी अधिकारी असो, अथवा भागीदार असो. ज्या हडफडे नागवे ग्रामपंचायतीने ह्या नाईटक्लबला व्यवसाय परवाना दिला, त्यासाठी ज्यांनी ठराव केला, त्या पंचायत मंडळाच्याही मुसक्या खरे तर आवळल्या गेल्या पाहिजेत. केवळ सचिवावर शेकून चालणार नाही. काही आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांकडे बोटे दाखवली गेली आहेत, त्याचीही चौकशी झाली पाहिजे. ही जी दिल्लीवाली वरिष्ठ अधिकारी मंडळी गोव्यात येतात त्यांचे गोव्याच्या सुखदुःखाशी देणेघेणे असल्याचे कधीच दिसत नाही. येथे आल्यावर गोव्यात आपल्या मालमत्ता कशा करता येतील त्याकडेच त्यांचे लक्ष असते. मित्रांना हे लोक कसे मदत करतात ते तर आपण पाहिलेच आहे. स्थानिक सरपंचाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले तर ‘आप’चे एक नेते त्यांना सोडवायला धावले. अशा प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपाची आणि झुंडशाहीची तमा पोलिसांनी बाळगू नये. नाईटक्लब पाडण्याची नोटीस तर बजावायची पण सुनावणीवेळी पंचायत संचालनालयात वकील पाठवायचा नाही ह्यात काय गौडबंगाल आहे तेही पोलिसांनी शोधावे. वाईटातून कधीकधी चांगले निष्पन्न होत असते. गोव्याच्या पर्यटनक्षेत्राची झाडाझडती घेण्याची आणि जी बजबजपुरी माजली आहे, ती स्वच्छ करण्याची हीच तर वेळ आहे.