26 C
Panjim
Thursday, December 3, 2020

बचतीची वृत्ती ही हवीच!

  • शशांक मो. गुळगुळे

३१ ऑक्टोबर हा जागतिक पातळीवर ‘जागतिक बचत दिन’ म्हणून पाळला जातो पण ज्या देशात ३१ ऑक्टोबर हा दिवस सार्वजनिक सुटीचा आहे अशा देशात हा दिवस ३० ऑक्टोबर रोजी पाळला जातो.

बचत सावधानपूर्वक, शांत डोक्याने, सुरक्षित, कमी जोखमीत करा. परतावा ‘मार्केट ट्रेन्ड’प्रमाणे मिळेल त्याचा आनंद माना. मृगजळाप्रमाणे फसव्या योजनांत बचत करू नका!

जागतिक बचत दिवस- ३१ ऑक्टोबर १९२४ पासून अस्तित्वात आला. पहिली आंतरराष्ट्रीय बचत बँक कॉंग्रेस (वर्ल्ड सोसायटी ऑफ सेव्हिंग्ज बँक) मिलान, इटली येथे १९२४मध्ये आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत इटली येथील प्राध्यापक फिलिपो रॅव्हिझा यांनी ३१ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बचत दिवस म्हणून जाहीर केला. हा दिवस त्या परिषदेचा शेवटचा दिवस होता. प्राध्यापक फिलिपो रॅव्हिझा हे या दिवसाचे जनक!

थ्रिफ्ट (काटकसर) कॉंग्रेसच्या ठरावात असे ठरले की, जागतिक काटकसर दिवशी जगभर बचतीला प्रोत्साहन द्यावे. तसेच यासाठी शाळा, सांस्कृतिक संस्था, क्रीडा संस्था, व्यावसायिक, महिलांच्या संस्था इत्यादींची मदत घ्यावी असे ठरले. २९ देशातील प्रतिनिधींनी जगभरातील जनतेत बचतीचा विचार पोचवावा व बचतीचा अर्थव्यवस्थेला व वैयक्तिक होणारा फायदा त्यांना कळवावा असेही सदर कॉंग्रेसमध्ये ठरले होते. ३१ ऑक्टोबर हा जागतिक पातळीवर जागतिक बचत दिन म्हणून पाळला जातो पण ज्या देशात ३१ ऑक्टोबर हा दिवस सार्वजनिक सुटीचा आहे अशा देशात हा दिवस ३० ऑक्टोबर रोजी पाळला जातो. याचे कारण या दिवशी बँका उघड्या हव्यात हे आहे. कारण बँका उघड्या असल्या तरच फार मोठ्या प्रमाणावर बचत केली जाणार.
अर्थव्यवस्था सुधारावी व जनतेचे जीवनमान सुधारावे हा बचत दिवसामागचा मुख्य हेतू आहे. स्पेनमध्ये पहिला राष्ट्रीय काटकसर दिवस १९२१मध्ये पाळला गेला होता. जर्मनीमध्ये १९२३मध्ये मॉनेटरी सुधारणा अमलात आणल्या होत्या. त्यामुळे लोकांचा अर्थव्यवस्थेबद्दलचा आत्मविश्‍वास कमी झाला होता तो परत निर्माण व्हावा म्हणून बचत सुलभ कारवाई सुरू करण्यात आली होती.
दुसर्‍या महायुद्धानंतर १९५५ ते १९७० या काळात जागतिक काटकसर दिवस जगभर फार लोकप्रिय होता.

बचतीची वृत्ती ही प्रत्येकात हवीच! एखाद्याचे किंवा संस्थेचे एकूण उत्पन्न व त्याच्या एकूण खर्च यातून जी रक्कम शिल्लक राहते ती बचतीसाठी उपयोगी पडते. बचत जास्त होण्यासाठी उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत व खर्चात काटकसर करावयास हवी. योग्य खर्चच करावयास हवा. अनावश्यक खर्च टाळावयास हवा. पण सध्या कोरोनामुळे मात्र आपली अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. जनतेचे उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी जनतेची क्रयशक्ती (खरेदी करण्याची क्षमता) कमी झाली पण केंद्र सरकार मात्र लोकांची क्रयशक्ती वाढावी, लोकांनी जास्तीत जास्त खरेदी करावी व यासाठी लोकांच्या हातात पैसा यावा यासाठी प्रयत्नशील आहे. यानेच भारतीय अर्थव्यवस्था सुधारेल हे केंद्र सरकारला माहीत आहे. त्यामुळे आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता केंद्र सरकारला बचत वाढण्यापेक्षा खरेदी वाढणे गरजेचे वाटते आहे. कोरोनाच्या काळात बँकांकडे फार मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या सुदैवाने दसर्‍याच्या दिवशी भारतभर लोकांनी चांगली खरेदी केल्याचे चित्र स्पष्ट दिसते आहे.
पूर्वीच्या काळी उत्पन्नातून खर्च करून राहिलेली जी किडूकमिडूक रक्कम असे ती रक्कम त्या काळातील लोक जमिनीत हंड्यात घालून पुरून ठेवीत किंवा उशीच्या आत घालून ठेवीत व ती उशी चारही बाजूंनी शिवून टाकीत. पाश्‍चिमात्त्य देशात औद्योगिक क्रांती झाली. त्याचे चांगले-वाईट परिणाम आपल्या देशावरही झाले. पाश्चिमात्त्य देशात बँका आल्या. नंतर त्या भारतातही आल्या. विचारवंत लोकांनी पतपेढ्या सुरू केल्या, या पतपेढ्या सहकारी क्षेत्रात सुरू करण्यात आल्या. या पतपेढ्यांचे पुढे बँकांत रूपांतर झाले. सहकारी पतपेढ्या सुरू करण्यात महाराष्ट्र आघाडीवर होता. या पतपेढ्या सामान्य व कमी उत्पन्न लोकांच्या कर्जाच्या व ठेवींच्या गरजा भागवू लागल्या. आज आशियातली सर्वांत मोठी नागरी सहकारी बँक असलेली सारस्वत सहकारी बँक ही सुरुवातीस पतपेढीच होती.

पण सध्याच्या आधुनिक जगात ‘ग्लोबल व्हिलेज’च्या काळात बरेच बचतीचे पर्याय उपलब्ध आहेत ते म्हणजे – बँक ठेवी, बँक बचत खाते, कंपनी ठेवी, म्युच्युअल फंड योजना, सोन्यात गुंतवणूक, जीवनविमा, आरोग्यविमा, सदनिकांत गुंतवणूक, शेतीत गुंतवणूक वगैरे वगैरे.
बँक बचत खाते – प्रत्येक भारतीयाचे बचत खाते हवेच यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. आर्थिक सर्वसमावेशकता साधण्यासाठी ते गरजेचे आहे. आपल्या देशात गरजूंना बर्‍याच सबसिडी दिल्या जातात. सध्याच्या केंद्र सरकारने सर्व सबसिडींची रक्कम खात्यातच जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. बचत खात्यावर खातेदाराला व्याज दिले जाते. प्रत्येक बँक स्वतःला परवडेल या दराने बचत खातेदारांना व्याज देते. दरसाल दर शेकडा ३ ते ४ टक्क्यांपासून ७ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. आयडीएफसी फर्स्ट ही न्यू जनरेशन बँक बचत खात्यात जर १ लाख रुपयांहून अधिक रक्कम असेल तर ७ टक्के दराने व्याज देते. बँक बचत खात्यातील शिल्लक रकमेवर व्याज मिळत असते तरी हे खाते हा गुंतवणुकीचा पर्याय न समजता गरज म्हणून समजावा लागतो. सध्याच्या कोरोना काळात लोकालोकांतील संपर्क टाळण्यासाठी ‘डिजिटल’ व्यवहार वाढावेत म्हणूनही केंद्र सरकार प्रयत्नशील आहे व डिजिटल व्यवहार वाढण्यासाठी बँक खाते असावेच लागते. पतसंस्थांचीही बचत खाती असतात. पोस्टाचेही बचत खाते आहेच पण बँक बचत खात्यात जेवढ्या विविध सुविधा मिळतात तेवढ्या सुविधा इतर बचत खात्यात मिळतात? ‘लोकमान्य’सारख्या मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह संस्थांतही बचत खाते उघडता येते पण प्रत्येक भारतीयाचे विशेषतः सार्वजनिक उद्योगातील बँकांत खाते हवेच.

बँक ठेवी – बँकांत ठेवींवर व्याज मिळते. भारतीयांचे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना बँकांच्या गुंतवणूक योजनातच बचत करण्यास आवडते. देशात अगोदरपासूनच आर्थिक मंदी होती. कोरोनामुळे यात भर पडली. अर्थव्यवस्था ठप्प झाली. उद्योगधंदे ठप्प झाले. उद्योगधंदे कार्यरत व्हावेत व कर्जाची मागणी उद्योगधंद्यांकडून वाढावी म्हणून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, रिझर्व्ह बँकेला कर्जावरील व्याजदर कमी करावे लागते. कर्जावरील व्याजदर कमी झाल्यामुळे, ठेवींवरील व्याजदरही कमी झाले. बँका ठेवी ठरावीक मुदतीसाठी स्वीकारतात. सध्या साधारणपणे बँकांत केलेल्या एक वर्षाच्या बचतीवर ५ ते ६ टक्के व्याज मिळते. व्याजदर कमी होऊन, लोक बँकांच्या ठेव योजनेत गुंतवणूक करण्यासच प्राधान्य देतात. कारण सार्वजनिक उद्योगातील बँकांत बचत केल्यास जोखीम कमी. अडचण निर्माण झाल्यास ठेव मोडून तात्काळ पैसे मिळू शकतात. तसेच ठेव मोडायची नसल्यास, ठेवींच्या ७५ टक्क्यांपासून, ९० टक्क्यांपर्यंतच्या रकमेवर कर्जही मिळते. ठेवींवर ज्या दराने व्याज दिले जाते त्यावर १ ते २ टक्के अधिक दराने कर्जावर व्याज आकारले जाते. बँकांत ठेवी ठेवताना सार्वजनिक उद्योगातील बँकांनाच प्राधान्य द्यावे. सहकारी बँकांत ठेवी ठेवताना प्रचंड काळजी घ्यावी. पीएमसी बँकेचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवावे. सारस्वत, एनकेजीएसबी, एसव्हीसी या बँका किंवा संघाच्या विचारसरणीच्या लोकांची टीजेएसबी बँक किंवा कामगार वर्गातील लोकप्रिय अपना बँक वगैरे कमी जोखीम असलेल्या बँकांतच ठेवी ठेवाव्यात. कोणत्याही सहकारी बँकेत ठेवू नयेत. त्यामुळे भविष्यात पश्‍चात्ताप होऊ शकतो. पतपेढ्यांतही मुदत ठेवी ठेवता येतात पण यात जोखीम आहे. एक- दोन टक्के दराने अधिक व्याजाला बळी पडून कोणत्याही पतपेढीत गुंतवणूक करू नये. पोस्टाच्या ठेव योजना बर्‍याच आहेत. या सर्व अल्पबचत संचालनालयाच्या ठेव योजना आहेत. या योजनांत डोळे झाकून गुंतवणूक करावी. जोखीम फारच कमी. या योजनांवर मिळणारे व्याज दर तीन महिन्यांनी जाहीर करण्यात येतात. ‘लोकमान्य’सारख्या मल्टिपर्पज सोसायटीही ठेवी स्वीकारतात. यात बचत करतानाही सावधानता बाळगावयास हवी. ‘लोकमान्य’ आज आर्थिक सुव्यवस्थेत आहे. भविष्यातही अशीच राहील याची शाश्‍वती कोण देणार? त्यामुळे एक-दोन टक्के अधिक मिळणार्‍या व्याजाला न भुलता सार्वजनिक उद्योगातील बँकांतच बचत करावी. एक-दोन टक्के व्याज कमी मिळाले तरी ठीक! पण आपली मुद्दल तरी शिल्लक राहील. जास्त व्याजाच्या आमिषाने मुद्दल गोत्यात जाणार नाही हे पाहावे.
कंपनी ठेवी – काही कंपन्या ठेवी स्वीकारतात पण यात बर्‍याच बचतदारांना वाईट अनुभव आला आहे. डीएसके बांधकाम उद्योग कंपनीत गुंतवणूक केलेले आज रडत आहेत. कंपनी ठेवी बचतदाराच्या दृष्टीने सुरक्षित नसतात व जोखीमही अधिक असते. टाटा समूह, गोदरेज समूह, महिन्द्रा अँड महिन्द्रा समूह, एल.आय.सी. हाउसिंग फायनान्स अशा दर्जेदार कंपन्यांत बचत करण्यास हरकत नाही. पण सध्या ‘कोरोना’चा आधार घेऊन या कंपन्यांनी ठेवींवरील व्याज दिले नाही तर? तर बचतदार म्हणून तुम्ही काहीही करू शकणार नाही. प्रत्येक गुंतवणूकदाराने कुठेही बचत करण्यापूर्वी ‘मार्केट ट्रेंड’ लक्षात घ्यावा. ‘मार्केट ट्रेंड’पेक्षा कोणीही अधिक व्याज देत असेल तर त्यात आनंद न मानता तो धोका समजावा.

म्युच्युअल फंड योजना शेअर बाजार – शेअर बाजारात बराच परतावा मिळविलेले व मिळविणारे असंख्य लोक आहेत पण त्यासाठी शेअर बाजारचा अभ्यास पाहिजे. ज्या कंपनीचे शेअर विकत घेणार आहे त्या कंपनीचा अभ्यास पाहिजे. त्या कंपनीचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ माहिती पाहिजे. ती कंपनी ज्या उद्योगात आहे त्या उद्योगाच्या भवितव्याविषयी पूर्ण माहिती हवी. अशांनीच शेअर बाजारात थेट व्यवहार करावेत. शेअर बाजारात असंख्य पैसा कमावलेले जसे लोक आहेत तसेच बरबाद झालेलेही असंख्य लोक आहेत. आता शेअरबाजारचे व्यवहार ऑनलाइन स्वतःचे स्वतः करता येतात. विशेषतः तरुण व मध्यमवयाच्या लोकांनीच शेअरबाजाराचे व्यवहार करावेत. ज्यांना शेअरबाजारात व्यवहार करण्याचे कौशल्य हस्तगत नाहीत अशांसाठी म्युच्युअल फंड हा पर्याय आहे. सध्या सर्व वयोगटातील लोकांची म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूक वाढली आहे. म्युच्युअल फंडाच्या बर्‍याच कंपन्या आहेत आणि या कंपन्यांच्या विविध गुंतवणूक योजना असतात. म्युच्युअल फंड कंपन्या जाहीर केलेल्या योजनेत बचत करण्यासाठी लोकांकडून पैसे जमवितात व ते पैसे कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवतात व म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला परतावा देतात. काही म्युच्युअल फंड योजना ‘ओपनएन्डेड’ असतात. त्यांना कालावधी नसतो. त्या अखंड कार्यरत राहतात. तर काही क्लोज एन्डेड असतात. त्या ठरावीक कालावधीनंतर बंद होतात. म्युच्युअल फंडात जमा झालेली काही योजनांत पूर्ण रक्कम शेअरमध्ये गुंतवली जाते. यात जोखीम असते. पण परतावा चांगला मिळतो. काही योजनांत पूर्ण रक्कम ‘डेट्’ (सरकारी कर्जरोखे, बॉण्ड्‌स इत्यादी) मध्ये गुंतवली जाते. यात जोखीम कमी म्हणजे परतावा कमी. बचतीचे एक मुख्य तत्त्व आहे- जितकी जोखीम जास्त तितका परतावा जास्त. काही योजनांत ठरावीक टक्के रक्कम शेअरमध्ये व ठरावीक टक्के रक्कम ‘डेट्’मध्ये गुंतवली जाते. यात गुंतवणूक केल्यास जोखमीचे प्रमाण कमी व डेट्‌मधील गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंड योजना सर्व प्रकारच्या कंपन्यांत गुंतवणूक करण्यास असतात. काही फक्त उद्योगानुसारच गुंतवणूक करणार्‍या असतात. म्हणजे एखादी योजना सर्व गुंतवणूक फक्त औषध उत्पादक कंपन्यातच गुंतवली जाते.
सरकारी कर्जरोखे – भारत सरकार, रिझर्व्ह बँक, भारत सरकारची ‘नाबार्ड’सारखी संस्था व अन्य काही संस्था जनतेला बचतीची संधी देण्यासाठी कर्जरोखे विक्रीस काढतात पण ही बचत दीर्घकालीन असते. जे आपला निधी दीर्घकाळासाठी गुंतवू शकतात त्यांनीच हा पर्याय स्वीकारावा. ही बचत पूर्णतः सुरक्षित असते. जोखीम शून्य पण परतावा बेताचा.

सोने – सोने गुंतवणूक करणार्‍या म्युच्युअल फंडाच्याही योजना आहेत. केंद्र सरकारच्याही सुरक्षित, कमी जोखमीच्या व काही अंशी परतावा देणार्‍या योजना आहे. सोन्याचे दागिने बनवून घरी ठेवल्यास चोरीचा धोका असतो. लॉकरमध्ये ठेवल्यास त्याचे भाडे भरावे लागत नाही व परतावाही मिळत नाही. पण केंद्र सरकारची सध्याची जी सोन्यात गुंतवणुकीची मासिक मासिक थोड्या थोड्या महिन्यांनी बचतीसाठी उपलब्ध असते त्यात अडीच टक्के दराने व्याज देण्यात येते व मुदतीअंती त्यावेळच्या सोन्याच्या दराने परतावा मिळणार. सोने भविष्यात चढतच राहणार म्हणून बचतीसाठी उपलब्ध रकमेच्या १० ते १५ टक्के रक्कम सोन्यात गुंतवावी. जीवन विम्याकडे बचत म्हणून पाहू नये. जीवनात आकस्मिक वाईट घडल्यास कुटुंबाची काळजी म्हणून विमा उतरवावा. कोणत्याही विमा योजनेत ५ ते ६ टक्क्यांहून जास्त परतावा मिळतच नाही, हे लक्षात ठेवावे. प्रत्येक कमावत्या किंवा घर चालवणार्‍या माणसाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० पट इतक्या रकमेचा ‘टर्म इन्शुरन्स प्लान’ घ्यावा.

आरोग्यविमा – आरोग्यविमा ही बचत नव्हे पण आत्यंतिक गरज आहे हे कोरोनाने सिद्ध केलेले आहे. भारतात अजूनही आरोग्यविमा न उतरविणार्‍यांचे प्रमाण फार मोठे आहे, यात बदल व्हायला हवा. आरोग्य विमाही थेट बचत नसली तरी यासाठी भरलेल्या प्रिमिअम रकमेमुळे आयकराची बचत होते. खाजगी कंपन्यांत हाताच्या बोटावर पोट असणार्‍यांना, कारागिरांना, व्यावसायिकांना पेन्शन योजना नसते. सरकारी व निम्न सरकारी कर्मचार्‍यांचा सेवानिवृत्तीचा फायदा म्हणून पेन्शन मिळते व पेन्शन म्हणजे वयाच्या साठीनंतर दर महिन्याला मिळणारे उत्पन्न. पेन्शन योजना बचतीसाठी बर्‍याच उपलब्ध आहेत. सर्व विमा कंपन्यांच्या पेन्शन योजना आहेत. केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना आहे. यात गुंतवणूक करावी व यात तरुणपणी किंवा मध्यम वयावर केलेली गुंतवणूक म्हातारपणी म्हणजे ६० वर्षानंतर दर महिन्याला उत्पन्न मिळवून देणार. भारतातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुसह्य होण्यासाठी सार्वजनिक उद्योगातील बँकेत बचत खाते उघडावे. निदान सरकार पुरस्कृत जनधन खातेतरी उघडावे.
जीवन विमा उतरवावा. अटल पेन्शन योजना सुरू करावी व सध्याच्या केंद्र सरकारची एक अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये देणारी विमा योजना आहे हिचा वार्षिक प्रिमियम फक्त रुपये १२/- आहे, ती उतरवावी. तसेच नैसर्गिक मृत्यू आल्यास २ लाख रुपये देणारी आणखी एक विमा योजना आहे हिचा वार्षिक प्रिमियम फक्त रुपये ३३०/- आहे, ही विमा योजना उतरवावी. असे केल्यास जीवन सुसह्य होऊ शकेल.

प्रॉपर्टीत गुंतवणूक – काही वर्षांपूर्वी प्रॉपर्टींचे भाव विशेषतः महानगरात सपासप वर जात होते तेव्हा कित्येकांनी यात केलेल्या बचतीवर प्रचंड पैसा कमविला पण गेली कित्येक वर्षे प्रॉपर्टी उद्योग अडचणीत असून, कोरोनामुळे यात प्रचंड भर पडली आहे. कित्येक न विकल्या गेलेल्या सदनिका पडलेल्या असून, बांधकाम उद्योजक हवे तितके भाव खाली आणीत नसून या बांधकाम उद्योगातील कंपन्यांमुळे बँकांची बुडीत कर्जे वाढली आहेत. सध्याचा काळ गुंतवणूक/बचतीच्या दृष्टीने पॉपर्टी हा चांगला पर्याय नाही. फार फार दीर्घकाळ या बचतीतून बाहेर पडायचे नसेल तरच याचा विचार करावा. पण सदनिकेतील बचत ही सदनिका विकून जास्त पैसे मिळविण्यासाठी सध्या तरी करू नये. लिव्ह अँड लायसन्सने सदनिका घ्यावयाची असल्यास त्या विभागात मिळणार्‍या भाड्याकडून केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक ७ ते ८ टक्क्यांहून जास्त परतावा मिळण्याची शक्यता असेल तर याचा विचार करावा. महानगरांबाबत हा पर्याय यशस्वी होऊ शकतो.

शेती – भूखंडात गुंतवणूक करा. झाडे लावा. अमुक उत्पन्न मिळवा. शेळी पालनात बचत करा. प्रचंड कमवा. छोटी कोळंबी उत्पादनात गुंतवणूक करा. मालामाल व्हा. जंगलात झाडे लावा, प्रचंड पैसा कमवा. या सर्व बचतींत लोकांनी हात पोळून घेतले आहेत. परिणामी यात बचत करायचा बिलकूल विचार करू नका.
बचत सावधानपूर्वक, शांत डोक्याने, सुरक्षित, कमी जोखमीत करा. परतावा ‘मार्केट ट्रेन्ड’प्रमाणे मिळेल त्याचा आनंद माना. मृगजळाप्रमाणे फसव्या योजनांत बचत करू नका!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...

शाळा सुरू करताना…

विलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड

शशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...

दुरपती

पौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...

कार्तिकातला दीपराग

मीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...

ALSO IN THIS SECTION

तुळशी विवाह

श्री. तुळशीदास गांजेकर तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार्थ...

भगवंत चराचरात आहे…

पल्लवी दि. भांडणकर माणसाच्या स्वभावातील प्रेम, जिव्हाळा, आदर, खरेपणा हे सर्व गुण म्हणजे साक्षात भगवंतच आहे. आपल्या मनात...

गाठ कापून टाकावी

ज.अ. ऊर्फ शरदचंद्र रेडकर.(सांताक्रूझ) जीवनात अशी अनेक माणसे येतात. ती आपली सहप्रवासी असतात. प्रत्येकाचे उतरण्याचे स्टेशन ठरलेले असते....

श्रम एव देव

नागेश गोसावी(मुख्याध्यापक, वळपे-विर्नोडा) त्यांच्या एकंदरीत कामकाजावरून माझ्या लक्षात आले की ते फार मोठ्या पदावर नाहीत पण जनसामान्यांच्या मनात...

टेलिव्हिजन – टेलिविषम् की टेलिअमृतम्?

प्रा. रमेश सप्रे सदैव काहीतरी मागायच्या- घ्यायच्या टोकाला (डिसिव्हिंग किंवा बेगिंग एंड)ला बसल्यामुळे स्वतंत्र विचारबुद्धी, निर्णयक्षमता, जीवनातले चढउतार...