प्लॅस्टिकपासून तयार करण्यात येणार्या राष्ट्रध्वजांवर सरकारने बंदी घातलेली असतानाही राजधानी पणजीसह विविध शहरांत सध्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या राष्ट्रध्वजांची विक्री चालू आहे. मात्र अद्याप या ध्वज विक्रेत्यांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
सरकारने दोन दिवसांपूर्वी काढलेल्या एका पत्रकातून प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्यात आली असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच लोकांनी असे ध्वज खरेदी करण्यापासून दूर रहावे व असे ध्वज विकणारे दृष्टीस पडल्यास पोलिसांनी कळवावे, असे आवाहन केले होते. प्लॅस्टिकपासून बनवलेले हे ध्वज स्वातंत्र्यदिनानंतर रस्त्यावर व अन्य ठिकाणी टाकून देण्यात येत असल्याचे दिसून आल्याने सरकारने वरील निर्णय घेतला आहे. राष्ट्रध्वज मैदानावर, कचरापेटी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी फेकून त्याचा अनादर करू नये, असे आवाहनही सरकारने केले आहे. दरम्यान प्लॅस्टिक ध्वज बनविणारी अथवा विकणारी व्यक्ती सापडल्यास अटक करण्यात येणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले होते, मात्र, तसे असले तरी अशा ध्वजांची विक्री चालू असतानाही अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान या संदर्भात पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई याना विचारले असता प्लॅस्टिकपासून बनवलेले ध्वज विकणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसाना असल्याचे ते म्हणाले. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यसैनिकानीही यापूर्वी अशा ध्वजांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. पणजीचे पोलिस निरीक्षक यांनी प्लॅस्टिक ध्वज विक्रेत्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले असले तरी पणजी पोलिस स्थानकापासून जवळ असलेल्या नगरपालिका मार्केटमध्ये अशा ध्वजांची विक्री होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.