बंगाल, ओरिसातील कामगारांना दोन रेल्वेंची गरज ः लोबो

0
176

लॉकडाऊनमुळे राज्यातील किनारी भागात अडकून पडलेल्या पश्‍चिम बंगाल, ओरिसामधील कामगारांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी दोन खास रेल्वेगाड्यांची गरज असून हॉटेल व्यावसायिकांकडून रेल्वे तिकिटांच्या रक्कमेचा भरणा केला जाणार आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ई मेलद्वारे पत्र पाठवून रेल्वेतून येणार्‍या कामगारांना प्रवेश देण्याची विनंती केली जाणार आहे, अशी माहिती बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

उत्तर गोव्यातील किनारी भागातील हॉटेल, शॅक, रेस्टॉरंटमध्ये काम करणार्‍या पश्‍चिम बंगाल, ओरिसा राज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी हॉटेल व्यावसायिक तिकिटांचे शुल्क देण्यास तयार आहेत, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

किनारी भागातील हॉटेल, शॅकमध्ये काम करणारे १५०० कामगार अडकून पडले आहेत. त्याचबरोबर हजारो मजूर किनारी भागात अडकून पडले आहेत. हॉटेल कामगारांना परत पाठविण्यासाठी रेल्वेच्या बुकिंगसाठी हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या कर्मचार्‍यांच्या तिकिटाचे शुल्क भरण्याची तयारी ठेवली आहे. व्यावसायिकांनी तिकिटासाठी गोळा केलेले पैसे रेल्वेकडे भरले जाणार आहे. ज्या कामगारांकडे तिकिटासाठी पैसे नाहीत त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. रेल्वे सुरू केल्यानंतर कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने रेल्वे मंत्रालयाला रेल्वे गाडीसाठी गोव्यात थांबा देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.