बंकीपूरचे रहस्य

0
12

विजय आणि पराभव ह्या राजकारणाच्या नाण्याच्या दोन बाजू जरी असल्या, तरी काही पराभव जिव्हारी लागणारे असतात. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या बंकीपूरच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा नवोदित जनसुराज पक्षाचे नेते व सुप्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलेला दणदणीत पराभव हा असाच सत्ताधारी भाजपच्या जिव्हारी लागणारा आहे. ज्या मतदारसंघाला पूर्वी पश्चिम पटना संबोधले जायचे, त्या बंकीपूरमधील हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागण्याचे कारण म्हणजे पक्षाचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा हा पारंपरिक बालेकिल्ला. नितीन नबीन यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली तेव्हा तेथून राजीनामा देऊन राज्यसभेच्या मार्गाने ते केंद्रीय राजकारणात आले. तत्पूर्वी दीर्घकाळ ते आणि त्याच्या आधी त्यांचे वडील ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आले होते. त्यामुळे बिहारमध्ये आणि केंद्रात भाजपची सत्ता असूनही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातील पोटनिवडणुकीमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा झालेला दणदणीत पराभव नक्कीच जिव्हारी लागणारा आहे. ज्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत दणकून पराभव झाला होता, ज्यांच्या पक्षाच्या नव्वद टक्के उमेदवारांना आपली अनामतही वाचवता आली नव्हती, त्या पक्षाने ही पोटनिवडणूक जिंकणे अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली आहे. आपापल्या परीने प्रशांत किशोर यांच्या ह्या विजयाचे आणि तेथील भाजपच्या पराभवाचे विश्लेषण त्यामुळे सध्या चालले आहे. नितीन नबीन यांनी बंकीपूरचे पाचवेळा प्रतिनिधित्व केले. त्याच्याही आधी त्यांचे वडील नबीनकिशोरप्रसाद सिन्हा हे दोन वेळा तेथून निवडून आले होते. एवढी भक्कम पार्श्वभूमी असतानाही ह्यावेळी असे काय घडले की मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला नाकारून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या आपल्या नेत्याची अप्रतिष्ठा केली? सर्वांत आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे गेल्या पोटनिवडणुकीत येथे अत्यल्प म्हणजे अवघे 34 टक्के मतदान झाले होते. अनेकांनी मतदान न करणेच पसंत केले. राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार ह्या निवडणुकीत होत्या, परंतु त्यांची मते मोठ्या प्रमाणात कमी झालेली आणि ती जनसुराजच्या पारड्यात पडलेली पाहायला मिळाली. म्हणजेच यादव, मुस्लीम मतदारांनी ह्यावेळी भाजपच्या पाडावासाठी प्रशांत किशोर यांच्या पारड्यात मतदान केले असे येथे म्हणता येते. भाजपची तथाकथित उच्चवर्णीय मतपेढी म्हणजे ब्राह्मण व कायस्थ ह्या निवडणुकीत स्वतः ब्राह्मण असलेल्या प्रशांत किशोर यांच्या पाठीशी उभी राहिली असेही काही राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. कारण काही असो, प्रशांत किशोर यांनी एकोणीस हजार मतांच्या घसघशीत आघाडीने ह्या निवडणुकीत विजय मिळवला. नुकतेच ‘नीट’ पेपरफुटीसंदर्भात बिहारमध्ये युवकांचे झालेले उग्र आंदोलन, भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातील अँटी इन्कम्बन्सी ह्याचा ह्या निवडणुकीत किती परिणाम झाला हे सांगणे अवघड आहे. जनसुराज पक्षाला मिळालेले हे यश मानायचे की केवळ प्रशांत किशोर यांच्यासारख्या राष्ट्रीय प्रसिद्धी असलेल्या व्यक्तीचे हे यश आहे हाही विचार करायला लावणारा प्रश्न आहे. भाजपने ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी कोणतीही कमी केली नव्हती. जवळजवळ चाळीस स्टार प्रचारक भाजपने प्रचारात उतरवले होते. मुख्यमंत्री सम्राट चौधरी, केंद्रीय मंत्री गिरीराजसिंग, नित्यानंद राय वगैरेंनी प्रचाराचा धडाका लावला होता. परंतु तरीही मतदार प्रशांत किशोर यांच्या बाजूने उभे राहिले. हा मतदारसंघ भाजप जिंकत आला असला, तरी तो वैचारिकदृष्ट्या भाजपचा मतदारसंघ नसून केवळ नबीन कुटुंबाचा पारंपरिक बालेकिल्ला होता, असे स्पष्टिकरणही काही राजकीय निरीक्षक देत आहेत. प्रशांत किशोर यांनी ही पोटनिवडणूक लढताना स्थानिक उमेदवारापेक्षा गेल्या एप्रिलमध्ये नितीशकुमार यांच्याकडून मुख्यमंत्रिपद पटकावलेल्या भाजपच्या सम्राट चौधरींनाच लक्ष्य केले होते. त्यांच्यावरील गुन्हेगारी प्रकरणे, त्यांची शैक्षणिक पात्रता अशा अनेक विषयांवरून प्रशांत किशोर यांनी त्यांना लक्ष्य केले होते. सम्राट चौधरींनी बिहारचे मुख्यमंत्रिपद हाती घेतल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लढवली व सत्ता हाती असूनही ती जागा गमावली. त्यामुळे चौधरींच्या नेतृत्वक्षमतेवरही ह्या निवडणुकीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशांत किशोर यांची राजकीय रणनीतीकार म्हणून राष्ट्रीय स्तरावर कीर्ती ह्या विजयामुळे पुनःप्रस्थापित जरी झाली असली, तरी केवळ वैयक्तिक करिष्म्यावर ते ही पोटनिवडणूक जिंकले आहेत की त्यांच्या पक्षालाही मतदार स्वीकारणार आहेत हे अधिक महत्त्वाचे असेल.